संपूर्ण जगात शांतता नांदण्यासाठी गाझामध्ये युद्धविरामाची आवश्यकता !
कतार सरकारने केलेले प्रयत्न आणि युद्ध करणार्या दोन्ही पक्षांनी मानवतेविषयी दाखवलेली आस्था यांमुळे गाझा येथे सध्या काही काळापुरता युद्धविराम घोषित झाला; परंतु ही स्थिती काही तेवढी समाधानाची नाही. केवळ हमास आणि इस्रायल सैन्याने ओलीस ठेवलेल्या लोकांची सोय करता यावी, या दृष्टीने हा युद्धविराम केल्याचे इस्रायलने स्पष्ट केले आहे. तरीही या छोट्याशा विश्रांतीच्या काळात अरब देश, चीन आणि रशिया यांचा पाठिंबा असलेले हमास, हिजबुल्ला अन् हौती मिलीटीया या आतंकवादी संघटना आणि अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, कॅनडा अन् युरोपियन युनियन यांचा पाठिंबा असलेला इस्रायल या दोन्ही बाजूंकडील मानसिक स्तरावर भडकलेली आग थंड होण्याची शक्यता आहे. असे असले, तरी सध्या असलेला युद्धविराम पुष्कळ काळाकरता राहील, असा निष्कर्ष काढता येणार नाही.
१. युद्धावर शांततामय मार्गाने उपाय काढण्यासाठी सर्व स्तरांच्या पुढे जाऊन प्रयत्न करणे आवश्यक !
इस्रायलने एकदम स्पष्ट केले आहे की, गाझा पट्टीतून हमासचे पूर्णपणे उच्चाटन आणि हमासला पाठिंबा देणार्या आतंकवादी गटांना वठणीवर आणण्यासाठी इस्रायलचे सैन्य सतत कार्यरत राहील. याविषयी राष्ट्रहिताच्या दृष्टीने गाझा पट्टीमध्ये सतत हिंसाचार घडवून आणणार्या हमासच्या आतंकवादी आक्रमणात फसलेल्या इस्रायलच्या बाजूने आपल्या सरकारने भक्कम पाठिंबा देण्याची भारताची भूमिका जरी वरचढ वाटली, तरी अधिक न्याय्य ठरली असती. तथाकथित पॅलेस्टाईन सरकार हमासच्या हिंसाचाराकडे डोळेझाक करत आहे. खरे म्हणजे तेथील घटनात्मक सरकार निष्पाप लोकांची ढाल करणार्या हमासला आतून आणि उघड उघडपणे पाठिंबा देत आहे; परंतु शांतताप्रिय देश म्हणून या वाढत जाणार्या युद्धावर शांततामय मार्गाने उपाय काढण्यासाठी सर्व बाजूंनी नव्हे, तर त्याच्याही पुढे जाऊन प्रयत्न करायला हवेत. युद्ध पुकारणारे, निष्ठूर राजकारणी आणि विस्तारवादी महाशक्तीशाली देश यांनी राष्ट्र, सरकार, लष्कर अन् संपत्ती हे मानवता वाचली, तरच अस्तित्वात राहील, हे लक्षात ठेवायला हवे.
२. शांततेविषयीची बोलणी म्हणजे केवळ औपचारिकता नव्हे !
आतापर्यंत रशिया आणि युक्रेन अन् हमास आणि इस्रायल यांच्यामध्ये झालेल्या युद्धांमुळे मोठ्या प्रमाणात झालेली जीवित अन् मालमत्ता यांची हानी जगाने पाहिली आहे. हे युद्ध दोन लढणार्या देशांमध्ये सीमित नसून महाशक्ती आणि आण्विक शक्ती असलेल्या त्यांना पाठिंबा देणार्या देशांनाही त्याने ग्रासले आहे. त्यामुळे पृथ्वीवरील जीवसृष्टी नष्ट होण्यासाठी एक कळ दाबणे एवढ्या अंतरावर आले आहे. एकदा जर अणुयुद्ध चालू झाले, तर ते थांबवता येणार नाही. वर्ष १९४५ मध्ये ‘फॅट बॉय’ आणि ‘लिटल बॉय’ या नावाने जपानच्या युद्धात वापरल्या गेलेल्या अणूबाँबमुळे काय आपत्ती आली ? ज्याचे परिणाम आजही दिसून येत आहेत आणि हा इतिहास ताजा आहे. केवळ माणूसच नव्हे, तर सर्व सजीव प्राण्यांमध्ये जगण्याची आणि वाचण्याची इच्छा असते, हे आपण विसरू नये. तात्पर्य, शांततेविषयीची बोलणी केवळ औपचारिकता किंवा मूर्खपणाची ठरू नयेत.
३. शांततेची बोलणी गंभीरतेने आणि प्रामाणिकपणे व्हावीत !
या वेळी इजिप्तमध्ये वापरल्या जाणार्या अरबी भाषेतील वाक्प्रचाराची आठवण येते. अरबी भाषेत ‘उझुमित मार्कबाय’, म्हणजे इंग्रजीमध्ये ‘बोट्समन्स इनव्हिटेशन’ असे आहे. यासंबंधीची एक कथा आहे. समुद्रात एका बोटीमध्ये असलेला खलाशी दुसर्या समुद्रात तरंगणार्या बोटीवरच्या खलाशाला ‘चहा घ्यायला ये’, असे आमंत्रण देतो. दुसर्या बोटीतील खलाशाला चहा घेण्याचे आमंत्रण स्वीकारणे शक्य नाही, हे आमंत्रण देणार्याला पूर्णपणे ठाऊक असते; कारण दोन्ही बोटी समुद्रात तरंगत असतात. तात्पर्य, जगामध्ये शांतता निर्माण होऊन ती टिकून रहावी; म्हणून ही शांततेची बोलणी गंभीरतेने आणि प्रामाणिकपणे व्हावीत.
लेखक : अधिवक्ता डॉ. एच्.सी. उपाध्याय, भाग्यनगर, तेलंगाणा.