अयोध्येतील श्रीराममंदिरात पूजा करण्यासाठी २४ पुजार्यांच्या प्रशिक्षणाला आरंभ !
अयोध्या (उत्तरप्रदेश) – कोट्यवधी हिंदूंच्या आस्थेचे प्रतीक असलेल्या अयोध्येतील भव्य राममंदिराचे बांधकाम वेगाने चालू आहे. मंदिराचे ८० टक्के बांधकाम पूर्ण झाले असून पुढील महिन्यात होणार्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची व्यवस्थाही गतीने चालू आहे. अशातच मंदिरात पूजाअर्चा करण्यासाठी २४ पुजार्यांना प्रशिक्षण देण्याचे कार्य चालू करण्यात आले आहे. त्यांच्या रहाण्याची आणि भोजनाची व्यवस्था विनामूल्य करण्यात आली असून हे सर्व श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासाच्या वतीने करण्यात येत आहे. त्या सर्वांना प्रतिमहिना २ सहस्र रुपये मानधनही देण्यात येणार असून प्रशिक्षणानंतर त्यांची नियुक्ती होईल कि नाही, हे मात्र निश्चित नाही. आवश्यकतेनुसार नियुक्ती होईल; परंतु प्रशिक्षणानंतर त्यांना प्रमाणपत्र देण्यात येईल. त्याच्याआधारे भविष्यात त्यांना या सेवेसाठी बोलावण्यात येऊ शकते, अशी माहिती मंदिर न्यासाचे स्वामी गोविंददेवगिरी महाराजांनी दिली आहे.
प्रशिक्षणार्थींच्या संदर्भातील महत्त्वपूर्ण माहिती !
- मंदिर न्यासाकडून सर्वांसाठी वस्त्रसंहिता लागू !
- ६ डिसेंबरला प्रशिक्षणास आरंभ; ६ महिने चालणार प्रशिक्षण !
- पहिल्याच दिवशी प्रशिक्षणार्थींनी विविध संत आणि प्रमुख आचार्य यांच्याकडून ग्रहण केली दीक्षा !
- वैदिक पद्धतीने सर्व अनुष्ठान संपादित करण्याचा करवला जात आहे अभ्यास !
- तामसिक आचरण आणि आहार न करण्याची सूचना !
- श्रीरामजन्मभूमी तीर्थ क्षेत्र न्यासाच्या कार्यालयात चालू आहे प्रशिक्षण !