NCERT : ‘इंडिया’ आणि ‘भारत’ यांच्यात भेद करत नाही ! – एन्.सी.ई.आर्.टी.
नवीन अभ्यासक्रम आणि पुस्तके बनवण्याची प्रक्रिया चालू असल्याने यावर आता बोलणे घाईचे ठरणार असल्याचे स्पष्टीकरण
नवी देहली – राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद (एन्.सी.ई.आर्.टी.) ‘इंडिया’ आणि ‘भारत’ यांच्यात भेद करत नाही, अशी माहिती केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने संसदेत दिली. केंद्रीय शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी राज्यसभेत म्हणाल्या, ‘‘आपला देश वसाहतवादी मानसिकतेतून बाहेर पडत आहे. आम्ही भारतीय भाषेतील शब्द वापरण्यास प्रोत्साहन देत आहोत.’’ विशेष म्हणजे एन्.सी.ई.आर्.टी.च्या समितीने यावर्षी ऑक्टोबरमध्ये पुस्तकांमधून ‘इंडिया’ हा शब्द काढून टाकण्याची शिफारस केली होती. ‘समितीच्या शिफारसीवर अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. नवीन अभ्यासक्रम आणि पुस्तके बनवण्याची प्रक्रिया चालू आहे. या विषयावर आताच काही बोलणे घाईचे आहे’, असे एन्.सी.ई.आर्.टी.ने म्हटले आहे.
१. एन्.सी.ई.आर्.टी.ने नवीन शैक्षणिक धोरणांतर्गत अभ्यासक्रम पालटण्यासाठी १९ सदस्यांची समिती स्थापन केली होती. या समितीनेच देशाचे नाव ‘इंडिया’ऐवजी ‘भारत’ असे लिहिण्याची सूचना केली होती. तसेच अभ्यासक्रमातून प्राचीन इतिहास काढून शास्त्रीय इतिहास आणि हिंदु योद्ध्यांच्या विजयाच्या कथांचा समावेश करण्याची शिफारसही केली होती.
२. या समितीचे अध्यक्ष सी.आय. इसाक यांनी सांगितले होते की, भारताचा उल्लेख विष्णुपुराणसारख्या ग्रंथांमध्ये आहे, जे ७ सहस्र वर्षे प्राचीन आहे. वर्ष १७५७ च्या प्लासीच्या युद्धानंतर ‘इंडिया’ हे नाव सामान्यतः वापरले जाऊ लागले. अशा परिस्थितीत देशासाठी केवळ ‘भारत’ हे नाव वापरायला हवे. ब्रिटिशांनी भारतीय इतिहासाची प्राचीन, मध्ययुगीन आणि आधुनिक अशी विभागणी केली. प्राचीन इतिहास सांगतो की, देश अंधारात होता, त्यात वैज्ञानिक जाणीव नव्हती. मुलांना मध्ययुगीन आणि आधुनिक इतिहासासमवेत शास्त्रीय इतिहासही शिकवला पाहिजे.