Mysterious Pneumonia : भारतातही आढळले चीनमध्ये झपाट्याने पसरत असलेल्या रहस्यमय न्यूमोनियाचे ७ रुग्ण !
|
बीजिंग (चीन) – चीनमध्ये गेल्या काही आठवड्यांत रहस्यमय न्यूमोनियाचे अनेक रुग्ण आढळले आहेत. हा संसर्ग तेथे झपाट्याने पसरत असून त्याचा जोर उत्तर चीनमध्ये अधिक आहे. शेजारील व्हिएतनाममध्येही याचे रुग्ण आढळून आले असून ‘देहली एम्स’मध्येही चीनच्या या गूढ आजाराचे ७ रुग्ण आढळले; मात्र एम्सने ‘या रुग्णांचा चीनमधील न्यूमोनियाशी संबंध नाही’, असे म्हटले आहे.
𝐌𝐲𝐭𝐡 𝐯𝐬. 𝐅𝐚𝐜𝐭𝐬
Media reports claiming detection of bacterial cases in AIIMS Delhi linked to the recent surge in Pneumonia cases in China are misleading and inaccurate
Mycoplasma pneumonia is the commonest bacterial cause of community acquired… pic.twitter.com/hsO8c3xNQ6
— Ministry of Health (@MoHFW_INDIA) December 7, 2023
१. चीनमध्ये ऑक्टोबर २०२३ मध्येच ‘मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया’ या नावाने असलेल्या या आजाराचे रुग्ण आढळून आले. २३ नोव्हेंबर या दिवशी चिनी माध्यमांनी प्रथमच शाळांमध्ये गूढ आजार पसरल्याची माहिती दिली होती. ‘अल् जझीरा’ वृत्तसंस्थेच्या म्हणण्यानुसार बीजिंगमधील रुग्णालयात प्रतिदिन या आजाराने ग्रस्त अनुमाने १ सहस्र २०० रुग्ण आपत्कालीन स्थितीत भरती होत आहेत. भारतीय आरोग्य मंत्रालयानेही १० दिवसांपूर्वीच या आजाराच्या संदर्भात राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना सल्ला दिला होता.
२. केंद्रशासनाने निवेदन प्रसारित करून म्हटले आहे की, एम्स रुग्णालयात भरती झालेले ७ रुग्ण न्युमोनियाचे आहेत; परंतु याचा चीनमधील आजाराशी काहीही संबंध नाही. जानेवारी २०२३ पासून एम्सच्या मायक्रो बायोलॉजी विभागात ६११ नमुन्यांची चाचणी करण्यात आली आणि त्यांपैकी कोणत्याही चाचणीत मायक्रोप्लाझ्मा न्यूमोनिया आढळलेला नाही. केंद्रशासन आणि आरोग्य विभाग यावर लक्ष ठेवून आहे.
गूढ आजाराची ही आहेत लक्षणे !
रोगप्रतिकारशक्ती अल्प असलेल्यांना हा आजार होत असल्याचे समोर आले आहे. विशेषकरून मुलांची प्रतिकारशक्ती कमकुवत असल्याने ते या आजाराला लगेच बळी पडतात. ही आहेत या आजाराची लक्षणे :
- खोकला
- वेदना किंवा घसा खवखवणे
- ताप
- फुफ्फुसात सूज येणे
- श्वसनमार्गाची सूज
हा संसर्गजन्य रोग असून पीडित रुग्णाच्या संपर्कात आल्याने हा आजार पसरतो. त्यामुळेच हा आजार पसरण्याची शक्यता बळावली आहे.
‘लॅन्सेट मायक्रोब’ नावाच्या वैद्यकीय नियतकालिकामध्ये प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार ‘पीसीआर्’ चाचणीमुळे भारतात आढळलेले एक प्रकरण समोर आले आहे. उर्वरित ६ प्रकरणे ‘IgM ELISA’ नावाच्या चाचणीद्वारे आढळून आली. ही एक प्रकारची रक्त तपासणी आहे. ही संक्रमणाच्या नंतरच्या टप्प्यावर केले जाते.
कोरोनाप्रमाणेच चीन या वेळीही या गूढ आजाराविषयीची आकडेवारी प्रसारित करत नाही आहे. जागतिक आरोग्य संघटनेने चीन सरकारला या आजाराविषयी अनेकदा विचारले आहे. हा रोग जीवाणूच्या संसर्गाने पसरतो. या जीवाणूला ‘मायको प्लाझ्मा न्यूमोनिया बॅक्टेरिया’ म्हणतात. तथापि, गेल्या मासात १५ नोव्हेंबरला ‘प्रो-मेड’ नावाच्या सर्वेक्षण करणार्या संघटनेने चीनमधील न्यूमोनियाच्या संदर्भात जगभरात ‘अलर्ट’ प्रसारित केला होता. याच संघटनेने वर्ष २०१९ मध्येही कोरोनाच्या संदर्भात सतर्कतेची चेतावणी दिली होती. या संघटनेचे म्हणणे आहे की, बीजिंगमध्ये एका दिवसात १३ सहस्र मुलांना रुग्णालयात भरती करण्यात आले आहे. प्रतिदिन ७ सहस्रांहून अधिक मुले रुग्णालयात येत आहेत. हे सर्व वर्ष २०१९ च्या कोरोनासदृश परिस्थितीची आठवण करून देणारे आहे. हे सर्व पाहता ‘हा केवळ सामान्य न्यूमोनिया आहे’, असे वाटत नाही. |