विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात खडाजंगी !
विधान परिषदेतून…
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक सत्ताधारी बाकावर बसल्याचे प्रकरण
नागपूर, ७ डिसेंबर (वार्ता.) – राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नवाब मलिक यांच्या सत्ताधारी बाकावर बसण्याच्या निर्णयावरून ७ डिसेंबर या दिवशी विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात खडाजंगी झाली. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी हे सूत्र उपस्थित केले, तसेच त्यांनी सत्ताधार्यांना नवाब मलिक यांच्या विरोधात केलेल्या वक्तव्यांची आठवण करून दिली. त्यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले, ‘‘तुमच्या नेत्यांनी मलिक कारागृहात असतांना त्यांचे मंत्रीपद का काढले नाही ? त्याचे उत्तर द्या, मग आम्हाला प्रश्न विचारा.’’
कारागृहातून सुटल्यानंतर नवाब मलिक राज्य विधीमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला उपस्थित राहिले. त्यांनी विधानसभेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाच्या सत्ताधारी बाकावर बसले. याचे तीव्र पडसाद विधान परिषदेत उमटले.
अंबादास दानवे म्हणाले की, मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी विधानसभेच्या एका सदस्यांच्या विरोधात सातत्याने जाहीर भूमिका घेत ‘आम्ही देशद्रोह्यांच्या मांडीला मांडी’ लावून बसू शकत नाही’, असे म्हटले होते; पण आज तेच तसे बसले आहेत.
सौजन्य : Zee 24 Taas
यावर सत्ताधारी बाकावरील मंत्री शंभुराज देसाई यांच्यासह इतर आमदारांनी गदारोळ केला. त्यावर दानवे म्हणाले, ‘‘मला बंधन घालणारे तुम्ही कोण ? या प्रकरणी कुख्यात आंतरराष्ट्रीय आतंकवादी दाऊद इब्राहिम याच्याशी कोणते व्यवहार झाले ? एवढेच आमची जाणून घेण्याची इच्छा आहे.’’ या वेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चोख प्रत्युत्तर देत म्हणाले, ‘‘प्रत्यक्ष व्यक्ती कारागृहात असतांनाही तिला मंत्रीपदावरून न काढण्याची भूमिका ज्यांच्या नेत्यांनी घेतली होती, तेच आता भूमिका मांडत आहेत, याचे आश्चर्य वाटते. आम्ही कुणाच्याही मांडीला मांडी लावून बसलो नाही. मी आणि मुख्यमंत्री एकमेकांच्या मांडीला मांडी लावून बसलो आहोत. आमच्या बाजूला अजित पवार मांडीला मांडी लावून बसले आहेत. त्यांच्या बाजूला मंत्री छगन भुजबळ बसले आहेत. त्यामुळे आमची काळजी करू नका.’’