Goa Mandir Parishad : मंदिर परिषदेला बार्देश, पेडणे आणि डिचोली येथून १५० हून अधिक मंदिरांचे विश्वस्त सहभागी होणार
गोमंतक मंदिर महासंघ आणि हिंदु जनजागृती समिती यांचा संयुक्त उपक्रम
म्हापसा, ६ डिसेंबर : गोमंतक मंदिर महासंघ आणि हिंदु जनजागृती समिती यांनी संयुक्तपणे रविवार, १० डिसेंबर २०२३ या दिवशी सकाळी १० ते सायंकाळी ६.३० या कालावधीत म्हार्दोळ येथील श्री महालसा मंदिर परिसरातील सिंहपुरुष सभागृहात मंदिरांचे सुव्यवस्थापन करणे आणि मंदिर संस्कृतीचे रक्षण करणे, या हेतूने एका राज्यस्तरीय मंदिर परिषदेचे आयोजन केले आहे. या मंदिर परिषदेला बार्देश, पेडणे आणि डिचोली येथून सुमारे १५० हून अधिक मंदिरांचे विश्वस्त सहभागी होणार आहेत, अशी माहिती गोमंतक मंदिर महासंघाचे सचिव श्री. जयेश थळी यांनी येथे आयोजित केलेल्या एका पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला श्री. आनंद पांढरे, अध्यक्ष, श्री विश्वाटी विश्वेश्वर मंदिर, काणका, म्हापसा; श्री. सत्यवान भिवशेट, श्री गणेश मंदिर, गणेशपुरी, म्हापसा; श्री. चंद्रकांत (भाई) पंडित, अध्यक्ष, गोमंतक मंदिर महासंघ; श्री. सुशांत दळवी, हिंदु जनजागृती समिती; श्री. विश्वास पिळर्णकर, पदाधिकारी, श्री शांतादुर्गा देवस्थान, धारगळ, पेडणे आणि श्री. सुदेश किनळेकर, प्रतिनिधी, श्री विश्वाटी विश्वेश्वर मंदिर, काणका, म्हापसा यांचीही उपस्थिती होती.
श्री. जयेश थळी पुढे म्हणाले, ‘‘मंदिर परिषदेच्या प्रचाराच्या अनुषंगाने बार्देश, पेडणे आणि डिचोली, तसेच गोव्यातील सर्व मंदिरांच्या विश्वस्तांची भेट घेऊन त्यांना परिषदेचे निमंत्रण देण्यात येत आहे. त्याचप्रमाणे देवस्थानचे विश्वस्त आणि भक्तगण यांच्या विविध ठिकाणी बैठकाही घेण्यात आल्या आहेत. परिषदेत सहभागी होण्यासंबंधी बहुतांश विश्वस्तांनी सकारात्मक प्रतिसाद दर्शवला आहे. मंदिरांमधून धर्मशिक्षणाची व्यवस्था होण्यासाठी प्रयत्न करणे, मंदिरांच्या समस्यांकडे सरकारचे लक्ष वेधणे, मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू व्हावी यासाठी प्रयत्न करणे, मंदिर सरकारीकरणाच्या दुष्परिणामांविषयी प्रबोधन करणे, पोर्तुगिजांनी उद्ध्वस्त केलेल्या मंदिरांच्या पुनर्बांधणीसाठी प्रयत्न करणे आदी प्रश्नांवर ऊहापोह होऊन त्यावर पुढील ध्येयधोरण निश्चित केले जाणार आहे. पोर्तुगीज काळात गोव्यात मंदिरांवर अनेक आक्रमणे झाली, तरीही पूर्वजांनी हा चैतन्याचा वारसा म्हणजे मंदिरे जपून ठेवलेली आहेत. मंदिरांचे पुढे संवर्धन करणे, हे प्रत्येकाचे दायित्व आहे. मंदिरांमधून धर्म, संस्कार आणि धर्माचरण करण्याविषयी शिक्षण देण्याचा विचार व्हावा, या उद्देशाने मंदिर परिषदचे आयोजन करण्यात आले आहे.’’
गोमंतक मंदिर महासंघाचे अध्यक्ष श्री. चंद्रकांत (भाई) पंडित यांनी ‘मदिरांच्या विश्वस्तांनी मोठ्या संख्येने परिषदेमध्ये सहभागी व्हावे’, असे आवाहन केले, तसेच या पत्रकार परिषदेला उपस्थित असलेल्या इतर मंदिरांच्यां प्रतिनिधींनीही ‘गोव्यातील समस्त देवस्थानांच्या पदाधिकार्यांनी या गोवा राज्यस्तरीय मंदिर परिषदेला उपस्थित रहावे’, असे आवाहन केले. हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुशांत दळवी म्हणाले, ‘‘मंदिर संस्कृतीच्या रक्षणासाठी समिती कटीबद्ध आहे. परिषदेच्या आयोजनामध्ये समितीचा सक्रीय सहभाग आहे.’’
हे ही वाचा –
♦ Goa State Mandir Parishad : म्हार्दोळ येथे १० डिसेंबर या दिवशी होणार्या राज्यस्तरीय मंदिर परिषदेच्या प्रचाराला गती !
https://sanatanprabhat.org/marathi/742299.html