Gomantak Mahakavya : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या ‘गोमांतक’ महाकाव्याचे कोकणीत रूपांतर – आज प्रकाशन
स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर लिखित ‘गोमांतक’ महाकाव्य आणि डॉ. भूषण भावे यांनी त्याचे केलेले कोकणी गद्यात रूपांतर !
पणजी : स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर लिखित ‘गोमांतक’ या महाकाव्याच्या कोकणी भाषेतील गद्य रूपांतराचे प्रकाशन ७ डिसेंबरला सायंकाळी ५ वाजता पाटो, पणजी येथील कला आणि संस्कृती संचालनालयाच्या बहुउद्देशीय सभागृहात गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या हस्ते होणार आहे. या कार्यक्रमाला सन्माननीय पाहुणे म्हणून माजी खासदार आणि गोवा सरकारच्या अनिवासी भारतीय आयोगाचे विद्यमान आयुक्त अधिवक्ता नरेंद्र सावईकर उपस्थित रहाणार आहेत.
या पुस्तकाचे प्रकाशन पुणे येथील प्रगतीपथ एज्युकेशनल फाऊंडेशन या नामांकित संस्थेने केले आहे. ही संस्था मिलेनियम स्कूल या नावे पुण्यात सहस्रो विद्यार्थ्यांना सर्वांगीण शिक्षण देण्यात अग्रेसर आहे. या संस्थेचे विश्वस्त श्री. अन्वित फाटक या कार्यक्रमाला विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित रहाणार आहेत.
अंदमानच्या कोठडीत प्रदीर्घ कारावास भोगतांना आणि हाती कागद अन् पेनही नसतांना स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी २ महत्त्वाच्या (कमला आणि गोमांतक) काव्यांची निर्मिती केली. दिवसभर काथ्या कुटणे आणि तेल काढायचे घाणे ओढणे यांसारखी कष्टाची कामे करून रात्री अंधार कोठडीत परतल्यानंतर मनाचा कठोर निग्रह, प्रखर राष्ट्रप्रेम आणि कुशाग्र प्रतिभाशक्ती यांच्या आधारे स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी काव्याच्या पंक्ती रचल्या. जळक्या कोळशाने कारावासाच्या भिंतीवर अंधुक उजेडात त्या लिहून काढल्या, मुखोद्गत केल्या, वॉर्डर येण्यापूर्वी त्या पुसून टाकल्या. ही प्रक्रिया सतत ११ वर्षे केल्यानंतर पुढे अंदमानातून सुटका झाल्यावर रत्नागिरी येथे स्थानबद्धतेच्या काळात त्यांनी या काव्यकृती लेखनबद्ध केल्या.
‘गोमांतक’ काव्याची पृष्ठभूमी पोर्तुगीज राजवटीच्या काळाची असून त्यात धर्मांध पोर्तुगीज सत्तेने हिंदूंवर केलेले अनन्वित अत्याचार आणि हिंदूंनी त्याविरुद्ध दिलेला चिवट लढा यांचे वर्णन केले आहे. हे महाकाव्य वर्ष १७३० नंतरच्या गोमंतकाच्या इतिहासावर आधारित आहे.