‘श्री शिवप्रतापदिना’चे नियोजन समन्वयाने करावे ! – जितेंद्र डुडी, जिल्हाधिकारी, सातारा
सातारा, ६ डिसेंबर (वार्ता.) – प्रतापगड येथे १९ डिसेंबर या दिवशी शिवप्रतापदिन सोहळा आयोजित करण्यात आला आहे. हा सोहळा शांततेत आणि उत्साहात साजरा होण्यासाठी नागरिकांना आवश्यक त्या सोयी सुविधा सर्व शासकीय विभागांनी उपलब्ध करून द्याव्यात. शिवप्रतापदिनाचे नियोजन सर्व शासकीय विभागांनी समन्वयाने करावे, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी दिले. शिवप्रतापदिन सोहळ्याच्या नियोजनाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालय येथे पार पडली. या वेळी ते बोलत होते.
जिल्हाधिकारी डुडी पुढे म्हणाले, ‘‘शिवप्रतापदिनासाठी संपूर्ण महाराष्ट्रातून मोठ्या प्रमाणात शिवभक्त येतात. यासाठी अधिकच्या एस्.टी. बसेस सोडाव्यात. पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहांची व्यवस्था आदी मूलभूत सोयी-सुविधांचे नियोजन होणे आवश्यक आहे. पोलीस विभागाने पुरेसा बंदोबस्त ठेवावा. वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, आरोग्य पथके यांच्यासह रुग्णवाहिका सज्ज ठेवाव्यात. छत्रपती शिवाजी महाराज यांची पूर्णाकृती मूर्ती आणि परिसरात आकर्षक प्रकाशव्यवस्था, तसेच फुलांची सजावट करण्यात यावी. प्रतिवर्षीप्रमाणे हेलिकॅप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्याची व्यवस्था करावी. साहसी खेळांचे प्रकार सादर करण्यासाठी योग्य तो समन्वय करावा. वीजपुरवठा अखंडित कसा राहील या दृष्टीने नियोजन करावे.