दिंडीला पोलीस बंदोबस्त देण्याची वारकर्यांची मागणी !
कार्तिकी वारीला पुणे-मुंबई महामार्गावरून आळंदीकडे येणार्या वारकर्यांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर !
पुणे – संत ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधीच्या पार्श्वभूमीवर भरणार्या कार्तिकी वारीला पुणे-मुंबई महामार्गावरून आळंदीला जाणार्या कोकणातील दिंड्यांच्या संख्या अधिक असून त्यांच्या रस्ते सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. भरधाव वेगाने वहाणार्या या महामार्गावर वारकर्यांच्या सुरक्षेला धोका असल्याने पुणे-मुंबई महामार्गावर कार्तिकी दिंड्यांची वाट अपघाती ठरत आहे. शेकडो वर्षांची दिंडीची परंपरा महामार्गावर वाढलेल्या रहदारीमुळे होणार्या अपघातांनी धोक्यात आली आहे. त्यामुळे दिंडी काळात अवजड वाहनांच्या रहदारीचे योग्य नियमन व्हावे, यांसह पोलीस बंदोबस्त देण्याची मागणी होत आहे.
वारकर्यांनी उपस्थित केलेली सूत्रे !
१. सहस्रो वारकरी प्रतीवर्षी पालखीसह दिंड्या काढून कार्तिकीला आळंदीला येतात. खोपोलीहून जुन्या घाटरस्त्याहून लोणावळ्यात येतात. अतीवर्दळीचा, रहदारीचा, धोकादायक अपघातप्रवण पट्ट्यात दिंडीकरी जीव मुठीत धरून चालतात.
२. दिंडीत मागील बाजूने सहजासहजी लक्ष वेधणारे चेतावणी फलक नसतात, त्यामुळे दिंडी उशिरा लक्षात येते. महामार्गावर चुकीच्या बाजूने वाहन ओलांडणारी भरधाव वाहने दिंडीत घुसल्याचे आतापर्यंत झालेल्या अपघातातून लक्षात येते.
३. रस्ता ओलांडून अंधारात प्रातर्विधीसाठी जागा शोधणार्या वारकर्यांचेही बर्याच वेळा अपघात होतात.
४. दिंड्या पहाटे मार्गस्थ होतात. वाहनचालकांची साखरझोपेची वेळ अपघातास कारणीभूत ठरते. आजपर्यंत आळंदी कार्तिकी यात्रा नियोजनाच्या बैठकीत दिंड्यांच्या रस्ते सुरक्षेच्या उपाययोजनांचा विषय प्राधान्याने चर्चिला गेला नाही.
५. सरकारने दिंडी मार्गांवर रस्ते सुरक्षेची आणि तात्पुरत्या सुविधांची हमी द्यावी, यासाठी वारकरी खंत व्यक्त करत आहेत.
यावर वाहतूक विभागाचे साहाय्यक पोलीस निरीक्षक गजरमल यांनी सांगितले की, तळेगाव वाहतूक विभागाने वारीसाठी गस्ती पथक नियुक्त केले असून, दिंड्यांना रस्ता ओलांडण्यासाठी वाहतूक पोलीस साहाय्य करणार आहेत, तसेच पोलीस आणि वाहतूक साहाय्यक बंदोबस्तासाठी नियुक्त केले आहेत.