नामदेव महाराज दिंडीच्या मार्गातील खड्डे बुजवण्याच्या वारकर्यांनी केलेल्या मागणीकडे प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष !
|
पुणे, ६ डिसेंबर (वार्ता.) – मागील २ वर्षांपूर्वी २०१९ ला दिवेघाटातून सोहळा मार्गक्रमण करीत असतांना पंढरपूरहून निघालेल्या नामदेव महाराज दिंडीचा अपघात झाला होता. या वेळी वारकर्यांचे प्रतिनिधी श्री. अतुल नाझरे यांनी रस्त्यांवरील खड्डे बुजवून घ्यावेत आणि खोदकाम त्वरित उरकून घ्यावे यासाठी मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले होते; मात्र याकडे शासनाने पूर्णपणे दुर्लक्ष केले. या वेळीही सोहळा चालू होण्याच्या ३ आठवडे आधी म्हणजे २० ऑक्टोबर २०२३ ला मुख्यमंत्र्यांना निवेदन दिले होते; मात्र याकडे दुर्लक्ष करून प्रशासनाने अशी कोणतीही व्यवस्था न राबवल्यामुळे ३ डिसेंबरला पंढरपूरहून निघालेल्या दिंडीला पुन्हा अपघात होऊन झाला. त्यामध्ये एका तरुण वारकर्याचा गंभीर घायाळ होऊन दुर्दैवी मृत्यू झाला, तर ३ वारकरी घायाळ झाले आहेत. त्याच दिवशी दुपारी ४ वाजता शिर्डीहून आळंदी येथे निघालेल्या दिंडीत भरधाव कंटेनर घुसून झालेल्या अपघातात ४ वारकरी ठार, तर ८ वारकरी घायाळ झाले आहेत.
संत नामदेव महाराजांचे विद्यमान वंशज श्री. मुकुंद नामदास यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि धर्मवीर आध्यात्मिक सेनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष, संत साहित्याचे अभ्यासक अन् वारकरी संप्रदायातील युवकांचे मार्गदर्शक ह.भ.प. अक्षय महाराज भोसले यांना २० ऑक्टोबर २०२३ ला निवेदनाद्वारे काही मागण्या केल्या आहेत.
निवेदनात म्हटले आहे की,
१. श्री संत नामदेव महाराज पालखी सोहळा पंढरपूर ते आळंदी आणि आळंदी ते पंढरपूर श्री संत ज्ञानेश्वर महाराज यांचा संजीवन समाधी सोहळा साजरा करण्यासाठी प्रतिवर्षी जात असतो. हा सोहळा गेली १५० ते २०० वर्षांपासून आजतागायत नामदास महाराज चालवतात. (नामदास महाराज हे संत नामदेव महाराजांचे विद्यमान वंशज आहेत.) वर्ष २००० पासून या सोहळ्यास मोठे स्वरूप प्राप्त झालेले आहे. सोहळ्यामध्ये ‘श्रीं’च्या रथापुढे मागे ६० ते ७० दिंड्या आहेत. त्यामध्ये ७ ते १० सहस्र वारकरी समाज असतो.
२. संत शिरोमणी नामदेव महाराज पालखी सोहळा हा महाराष्ट्रातील प्रमुख पालखी सोहळ्यामधील एक असून आजपर्यंत प्रशासनाच्या उदासीन धोरणांमुळे दुर्लक्षित राहिला आहे. आम्ही पुष्कळ वेळा प्रशासनाकडून साहाय्याच्या अपेक्षा ठेवल्या होत्या, शासनाला पत्रव्यवहारही केला होता; पण कुठूनही सहकार्य मिळाले नाही.
३. प्रतिवर्षी श्री संत शिरोमणी नामदेव महाराज पालखी सोहळा कार्तिक शुक्ल पौर्णिमेला श्री संत नामदेव महाराज (जन्मस्थान) पंढरपूर येथून प्रस्थान करत असतो. हा सोहळा पंढरपूरवरून आळंदीकडे मार्गक्रमण करत असतांना सोहळ्यासमवेत प्रशासनाचा सहभाग असावा.
४. सोहळ्यासाठी प्रशस्त सर्व सोयींनी सज्ज अशी रुग्णवाहिका आधुनिक वैद्यांसहित असावी.
५. सोहळा मार्गक्रमण करीत असतांना पोलीस बंदोबस्त सोहळ्यासह असणे आवश्यक आहे.
६. पिण्याच्या पाण्यासाठी टँकरची व्यवस्था असावी.
७. आपल्या कारकीर्दीत संत नामदेव महाराज पालखी सोहळा पंढरपूर (नामदास महाराज) अशी सरकारी दफ्तरी नोंद घ्यावी.
संपादकीय भूमिकाप्रशासनाच्या दुर्लक्षामुळे वारकर्यांचा नाहक मृत्यू झाला आहे. अजून किती वारकरी दगवल्यानंतर प्रशासन जागे होणार आहे ? |