शरद पवार गटाकडून उपरोधिक फलकबाजी करून १० दिवसांच्या अधिवेशनाची खिल्ली !
नागपूर, ६ डिसेंबर (वार्ता.) – ७ ते २० डिसेंबर या काळात होणार्या राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनासाठी विविध पक्षांचे नेते आणि आमदार येथे आले आहेत. अधिवेशनापूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाकडून ‘१० दिवसांच्या या अधिवेशनाला येणार्या सर्व मान्यवरांचे स्वागत’ असा उपरोधिक आशय असलेले अनेक फलक शहरात लावण्यात आले आहेत. ‘विदर्भात होणारे अधिवेशन किमान ६ आठवड्यांचे असावे’, अशी मागणी विरोधकांकडून होत असते. या अधिवेशनात फक्त १० दिवस कामकाज होणार आहे. त्यामुळे याची खिल्ली उडवण्यासाठी हे फलक लावण्यात आले आहेत.
नागपूर येथे मोठा बंदोबस्त, ११ सहस्र पोलीस तैनात !
अधिवेशनाच्या काळात मराठा आणि धनगर आरक्षणासंबंधी होणारी विविध आंदोलने लक्षात घेऊन नागपूर येथे मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या काळात १०० मोर्चे निघतील, असा अंदाज आहे. त्यामुळे सुरक्षेसाठी तब्बल ११ सहस्र पोलीस, २४ घंटे राज्य राखीव पोलीस दलाची तुकडी आणि दंगा नियंत्रण पथक यांसह सीसीटीव्ही, ड्रोन आणि मोबाईल सर्व्हिस व्हॅनही असणार आहेत, तसेच वाहतूक नियंत्रणासाठी प्रयत्न होतील.
मराठा आरक्षण, शेतकर्यांच्या पिकांची हानी, भ्रष्टाचार सूत्रांवर अधिवेशन गाजणार !
अवकाळी पावसामुळे राज्यातील २५ जिल्ह्यांमध्ये शेतकर्यांच्या पिकांची झालेली हानी, सहकारी पतसंस्था, सोसायट्या यामध्ये झालेला भ्रष्टाचार, मराठा आणि धनगर आरक्षण, विविध मागण्यांसाठी विविध संघटनांचे निघणारे १०० मोर्चे अशा विविध प्रश्नांविषयी विरोधक सरकारला कोंडीत पकडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हे अधिवेशन गाजणार आहे.