संस्कृत भाषेचे सौंदर्य
सुभाषितांचा रसास्वाद
संसारकटुवृक्षस्य द्वे फले ह्ममृतोपमे।
सुभाषितरसास्वादः संगतिः सुजनैः सह॥
अर्थ : संसाररूपी कटु वृक्षाची दोनच फळे अमृतासम आहेत. एक सुभाषितांचा रसास्वाद आणि दुसरे सज्जनांची संगती !
द्राक्षा म्लानमुखी जाता शर्करा चाश्मतां गता।
सुभाषितरसस्याग्रे सुधा भीता दिवं गता॥
अर्थ : सुभाषितांच्या गोड रसापुढे द्राक्षांनी लाजेने मान खाली घातली, साखर दगडासारखी झाली आणि अमृत घाबरले अन् स्वर्गवासी झाले.
सुभाषितरसास्वादबद्धरोमांचकंचुकाः।
विनापि कामिनीसंगं कवयः सुखमासते॥
अर्थ : सुभाषित रसास्वादामुळे अंगावर जे रोमांच फुलतात, त्यामुळे कवींना कामिनीच्या संगाशिवाय स्पर्शसुखाचा अनुभव येतो.
सुभाषितेन गीतेन युवतीनां च लीलया।
मनो न भिद्यते यस्य स योगी ह्यथवा पशुः॥
अर्थ : सुभाषिताने, गीताने आणि तरुणींच्या लीलेने ज्याचे मन भेदले जात नाही, तो एक तर योगी असतो, नाही तर पशू.
शिशुर्वेत्ति पशुर्वेत्ति वेत्ति गानरसं फणी।
साहित्यरसमाधुर्यं शंकरो वेत्ति वा न वा॥
अर्थ : अहो, गाण्याचा रस लहान मुलाला कळतो, अंगाई गीताने ते रडायचे थांबते. पशूंना कळतो, कृष्णाच्या मुरलीने गायी धावत होत्या. तो सर्पाला कळतो, पुंगीने तो डोलतो; पण साहित्याचा रस शंकराला तरी कळतो कि नाही कुणास ठाऊक ?