(म्हणे) ‘भारताकडून होणार्या अन्वेषणाचा निकाल लागण्याची वाट पाहू !’ – अमेरिका
अमेरिकेतील खलिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याच्या हत्येच्या कथित कटात भारत सरकार सहभागी असल्याच्या आरोपाचे प्रकरण
वॉशिंग्टन (अमेरिका) – खालिस्तानी आतंकवादी गुरपतवंत सिंह पन्नू याच्या हत्येच्या कथित कटात भारत सरकारचा हात असल्याचा आरोप अमेरिकेने केला होता. भारताने ‘आम्ही या घटनेचे अन्वेषण करू’, असे स्पष्ट केले होते. आता अमेरिकेने पुन्हा या सूत्रावर वक्तव्य केले आहे. अमेरिकेच्या परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते मॅथ्यू मिलर यांनी म्हटले की, आम्ही या प्रकरणी भारताच्या अन्वेषणाच्या निकालाची प्रतीक्षा करू.
मिलर पुढे म्हणाले की, आमचे परराष्ट्रमंत्री अँटनी ब्लिंकन यांनी भारताचे परराष्ट्रमंत्री डॉ. एस्. जयशंकर यांच्याशी या विषयावर चर्चा केली आहे. त्यावर डॉ. जयशंकर यांनी या प्रकरणाचे अन्वेषण करण्याचे आश्वासन दिले आहे. आम्ही त्यांचे अन्वेषण पूर्ण होण्याची आणि निकाल लागण्याची वाट पाहू.
मिलर याआधी म्हणाले होते की, कोणत्याही प्रकारचा आंतरराष्ट्रीय छळ आम्ही सहन करू शकत नाही. भारताने कॅनडातील खलिस्तानी आतंकवादी हरदीप सिंह निज्जर याच्या हत्येच्या अन्वेषणातही सहकार्य करावे. (भारताने कॅनडाच्या संदर्भात काय करावे आणि काय करू नये ?, हे अमेरिकेने सांगण्याची आवश्यकता नाही, हे भारताने त्याला कठोर शब्दांत सांगायला हवे ! – संपादक)
संपादकीय भूमिकापन्नू भारताच्या अखंडतेला सुरुंग लावण्याचा कशा प्रकारे अटोकाट प्रयत्न करत आहे ?, याचे पुरावे भारताकडे आहेतच. ते जगासमोर ठेवून भारतानेही मुत्सद्देगिरीने ‘अमेरिकेने पन्नूच्या विरोधात कारवाई केली पाहिजे’, अशी भूमिका आता घेतली पाहिजे ! |