‘मित्र’ संस्थेला कार्यालयासाठी महागडी जागा आणि अधिकार्यांना गाडी अन् बंगला देण्याच्या संदर्भात विरोधकांकडून प्रश्न उपस्थित !
मुंबई – महाराष्ट्र इन्स्टिट्यूशन फॉर ट्रान्सफॉर्मेशन (मित्र) संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी प्रवीण परदेशी यांच्यासाठी १५ लाख रुपयांची कार खरेदी करण्याचा ठराव सरकारने संमत केला आहे. या संस्थेसाठी नरिमन पॉइंट येथील महागड्या गगनचुंबी इमारतीत जवळपास आठ सहस्र चौरस फुटांचे कार्यालय मासिक २१ लाख रुपये दराने जागा भाड्यावर घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. नियोजन विभागाने त्यांच्या निवासासाठी मलबार हिल येथील बी.एम्.सी.च्या बंगल्याचे वाटप केले.
विरोधकांनी याला आक्षेप घेऊन या संस्थेचा उपयोग आणि योगदान काय ? असा प्रश्न उपस्थित केला आहे. विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते आणि उद्धव गटाचे नेते अंबादास दानवे आगामी हिवाळी अधिवेशनात ‘मित्र’च्या कामगिरीचा मुद्दा उपस्थित करणार आहेत.
ठाण्यातील विकासक आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सहकारी अजय आशर हे ‘मित्र’चे उपाध्यक्ष आहेत, तर शिंदे या संस्थेच्या अध्यक्षस्थानी आहेत. ‘मित्र’चा उद्देश डेटा विश्लेषणावर लक्ष केंद्रित करणे आणि प्रमुख क्षेत्रांविषयी माहितीपूर्ण निर्णय घेणे, हा आहे. त्याचे सीईओ प्रवीण परदेशी हे पंतप्रधान कार्यालयाने स्थापन केलेल्या क्षमता निर्मिती आयोगाचेही प्रमुख आहेत.
प्रवीण परदेशी म्हणाले की, ‘मित्र’ला जवळपास ६० तज्ञांना सामावून घेण्यासाठी कार्यालयाची जागा संमत केली होती, तर अतिरिक्त मुख्य सचिवांच्या स्तरावर एक कार आणि एक घर संमत केले जाते.