सेवेची तीव्र तळमळ असणारे आणि सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यावर अढळ श्रद्धा असणारे पनवेल येथील कै. प्रभाकर भालचंद्र प्रभुदेसाई (वय ८१ वर्षे) !
देवद, पनवेल येथील प्रभाकर प्रभुदेसाई यांचे २७.११.२०२३ या दिवशी वयाच्या ८१ व्या वर्षी कर्करोगामुळे निधन झाले. ६.१२.२०२३ या दिवशी त्यांचा दशक्रिया विधी आहे. त्या निमित्ताने त्यांच्या कुटुंबियांना त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे पुढे दिली आहेत.
राष्ट्र आणि धर्म कार्याची आवड असणारे कै. प्रभाकर प्रभुदेसाई !१. अल्प अहं असणे : ‘प्रभुदेसाईकाका उच्च पदावर नोकरी करत होते; परंतु याचा त्यांना कोणताही अहं नव्हता. ते आश्रमात ‘चहा बनवणे, पूजेसाठी फुले काढणे, रुग्णाईत साधकांना तपासणीसाठी रुग्णालयात नेणे’, अशी कोणतीही सेवा करण्यासाठी सिद्ध असत. २. काकांना राष्ट्र आणि धर्म कार्याची पुष्कळ आवड होती. त्यासाठी काहीतरी करण्याची त्यांच्या मनात तीव्र इच्छा होती.’ – पू. रमेश गडकरी, सनातन आश्रम, देवद, पनवेल. |
१. श्रीमती उल्का प्रभाकर प्रभुदेसाई (कै. प्रभाकर प्रभुदेसाई यांच्या पत्नी, वय ७४ वर्षे)
१ अ. कुटुंबियांशी प्रेमाने वागणे : ‘माझे पती कै. प्रभाकर प्रभुदेसाई यांचा स्वभाव शांत आणि मितभाषी होता. यजमानांचे वडील लहानपणीच वारल्याने यजमानांवर त्यांच्या पुढच्या ७ भावंडांचे दायित्व आले. त्या भावंडांचे शिक्षण, त्यांना चाकरी मिळवून देणे, त्यांचे विवाह करणे इत्यादी सर्व त्यांनी पार पाडले. ते त्यांच्या भावंडांमध्ये सर्वांचे लाडके होते.
१ आ. सनातन संस्थेच्या माध्यमातून साधनेस प्रारंभ झाल्यावर दैनिक ‘सनातन प्रभात’शी संबंधित आणि इतरही अनेक सेवा आनंदाने अन् उत्साहाने करणे : वर्ष १९९७ पासून त्यांनी सनातन संस्थेच्या माध्यमातून साधना चालू केली. आरंभीच्या काळात त्यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’शी संबंधित सेवा केली. त्यानंतर वर्ष २०१५ ते २०२३ या काळात त्यांनी देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात सात्त्विक उत्पादनांच्या बांधणीची सेवा केली. वयाच्या ८१ व्या वर्षापर्यंत त्यांनी सर्व सेवा आनंदाने आणि उत्साहाने केल्या. त्यांना सेवेचा कधी कंटाळा येत नसे की, कधी ते ‘मी थकलो आहे’, असे म्हणत नसत.
१ इ. त्यांच्या कृती पाहिल्यावर सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांची आठवण होणे : ते घरातील स्वतःची भांडी घासणे, कपडे धुणे ही कामे स्वतःच करत. त्यांच्या कृतीतून सातत्याने मला गुरुदेवांचीच (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचीच) आठवण होत असे. ‘गुरुदेव, तुम्हीच माझ्या डोळ्यांसमोर त्यांच्या रूपात २४ घंटे दिसत होता.’
‘हे गुरुदेवा, आपल्या कृपेने त्यांना पुढची चांगली गती मिळो आणि त्यांची आध्यात्मिक उन्नती होवो’, हीच आपल्या चरणी प्रार्थना !’
२. अधिवक्त्या तनुजा प्रभुदेसाई (मुलगी)
अ. ‘बाबांमध्ये तत्परता हा गुण होता. ते कधीच आळसावलेले दिसले नाहीत.
आ. त्यांना सेवेप्रती पुष्कळ तळमळ होती. त्यांना आश्रमजीवन आवडायचे.
इ. बाबांनी अनेक जणांना शारीरिक, मानसिक आणि आर्थिक साहाय्य केले.’
३. श्री. योगेश प्रभाकर प्रभुदेसाई (मुलगा)
३ अ. महावितरण कंपनीत संचालक पदावर असूनही कोणत्याही सेवेसाठी सिद्ध असणे : ‘बाबा पूर्वी नोकरीत असतांना राज्य विद्युत् मंडळाच्या संचालक पदावर होते. त्यांची तेव्हाही आणि निवृत्तीनंतरही कोणत्याही प्रकारची सेवा करण्याची सिद्धता असे. कर्करोग होईपर्यंत ते कोणतीही सेवा तळमळीने आणि आनंदाने करत होते.
३ आ. त्यांची गुरुदेव (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले) आणि सर्व संत यांच्याप्रती पुष्कळ श्रद्धा होती.’
४. सौ. राधा योगेश प्रभुदेसाई (सून)
४ अ. वडिलांप्रमाणे काळजी घेणे : ‘कै. प्रभाकर प्रभुदेसाई यांच्यामध्ये एवढा प्रेमभाव होता की, मला असे कधीच जाणवले नाही की, ते माझे सासरे आहेत. ते माझी वडिलांप्रमाणे काळजी घेत होते.
४ आ. इतरांचा विचार करणे : बाबा नेहमी दुसर्यांचा विचार करत असत.
४ इ. सकारात्मकता : कुणी कसेही असले, तरी ते त्याच्याविषयी कधीही नकारात्मक विचार करत नव्हते.
४ ई. सहनशील असणे : बाबांमध्ये सहनशीलता पुष्कळ होती. जेव्हा ते ‘रेडिएशन’ (किरणोपचार) आणि ‘केमोथेरपी’चे (रसायनोपचारचे) उपचार घेत होते, तेव्हा त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे पुष्कळ त्रास होत होते; परंतु तरीही बाबा शांत आणि स्थिर असत. त्या वेळी मला जाणवत होते की, साक्षात् प.पू. गुरुदेव बाबांच्या समवेत असल्यामुळे ते स्थिर आहेत.’
५. सौ. स्मिता सुधाकर प्रभुदेसाई (मोठ्या भावाची पत्नी), आध्यात्मिक पातळी ६३ टक्के, वय ७६ वर्षे)
५ अ. सनातन संस्थेच्या माध्यमातून साधनेला आरंभ करणे आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर अढळ श्रद्धा असणे : ‘वर्ष १९९७ मध्ये ते आणि त्यांचे सर्व कुटुंबीय सनातन संस्थेच्या संपर्कात येऊन साधनेला लागले. त्यांच्या घरी सत्संग होत असत. त्यांची परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्यावर अढळ श्रद्धा होती. त्यांना त्यांचे गाव आणि त्यांचे घर यांचा विचार अधिक असल्याने मधल्या काळात ते संस्थेपासून दूर गेले होते; परंतु पुन्हा ते सनातनशी जोडले गेले, ते शेवटपर्यंत !
५ आ. परोपकारी वृत्ती : ‘परोपकारासाठीच हे शरीर आहे’, या तत्त्वावर त्यांची जीवनमार्गक्रमणा होती. त्यामुळे उच्च पदावर असूनही त्यांनी स्वतः उपभोग न घेता आपली संपत्ती इतरांसाठी व्यय केली.
त्यांच्यातील गुणांमुळेच त्यांना ईश्वराचे अवतार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले गुरु म्हणून लाभले. आश्रमासारख्या चैतन्यमय वातावरणात रहाण्याची संधी मिळाली. अंत्यसंस्कारही आश्रमाजवळ झाले. यासारखे भाग्य ते कोणते ? खरोखर गुरुकृपेने त्यांच्या जीवनाचे सार्थक झाले. त्यांचे जीवन आम्हाला प्रेरणादायी राहील.’
(सर्व सूत्रांचा दिनांक : ३०.११.२०२३)