संपादकीय : गोरखा सैनिकांची व्यथा !
रशियाच्या सैन्यात भरती असलेले २०० गोरखा सैनिक युक्रेनच्या विरोधातील युद्धात लढत आहेत. त्यांतील ६ सैनिकांचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह तेथेच पुरण्यात आल्याने नेपाळमध्ये खळबळ माजली आहे. नेपाळ सरकारने या सैनिकांचे मृतदेह परत मागितले आहेत. जेणेकरून त्यांचे हिंदु पद्धतीने अंत्यसंस्कार करता येतील. नेपाळमधील गोरखा तरुण रशियाच्या सैन्यात जाणे हा मुळात भारतासाठी मोठा धक्का आहे.
वर्ष २०२२ मध्ये भारतीय सैन्याने ‘अग्नीवीर’ ही योजना सैनिकांसाठी लागू केल्यानंतर नेपाळमधील गोरखा तरुणांना ती रूचली नाही आणि त्यांनी अन्य पर्यायांचा शोध चालू केला अन् त्यातून ते मोठ्या संख्येने रशियाच्या सैन्यात भरती होण्याचा प्रयत्न करू लागले आहेत. सध्यातरी २०० गोरखा रशियाच्या सैन्यात भरती झाले असले, तरी भविष्यात ही संख्या सहस्रोंच्या संख्येत गेली, तर आश्चर्य वाटू नये. केवळ रशियाच नव्हे, तर अन्य देशांतूनही त्यांना चांगले वेतन आणि सुविधा मिळाल्या, तर ते अन्य देशांच्या सैन्यात भरती होण्याची शक्यता आहे. ही स्थिती अग्नीवीर योजनेमुळे आल्याचे नेपाळी लोकांचे म्हणणे आहे.
ब्रिटिशांच्या काळापासून भारतीय सैन्यात गोरखांची भरती केली जात आहे. सध्या भारतीय सैन्यात गोरखा सैनिकांच्या ११ रेजिमेंट आहेत. यात अनुमाने ४२ सहस्र गोरखा सैनिक कार्यरत आहेत. ही पुष्कळ मोठी संख्या आहे. केवळ संख्या नाही, तर युद्ध करण्याच्या क्षमतेमध्येही ते अन्य सैनिकांच्या तुलनेत विशेषतः हिमालयाच्या पर्वतांमध्ये अतिशय वरचढ आहेत. हे जाणूनच ब्रिटिशांनी १८ व्या शतकात त्यांची भारतीय सैन्यात भरती चालू केली होती. वर्ष १९४७ मध्ये ब्रिटीश भारत सोडून जातांना भारत, नेपाळ आणि ब्रिटन यांच्यात त्रिपक्षीय करार झाला. त्यानुसार त्या वेळेचे १० रेजिमेंटपैकी ४ ब्रिटीश सैन्यात, तर ६ भारतीय सैन्यात राहिले आहेत. त्यांतही अनेक गोरखा ब्रिटनमध्ये जाण्यास सिद्ध नव्हते. त्यामुळे त्यांनाही भारतीय सैन्यात ठेवण्यात आले; मात्र आज ७५ वर्षांनंतर गोरखा तरुण भारतीय सैन्यात भरती होऊ इच्छित नाहीत. ही स्थिती भारत आणि नेपाळ यांसाठी चिंताजनक आहे. याचा दोन्ही देशांनी विचार करण्याची आवश्यकता आहे. ४२ सहस्र गोरखा सैनिक आणि दीड लाख निवृत्त सैनिक यांचे वेतन आणि निवृत्तीवेतन यांवर भारत अनुमाने ४ सहस्र २०० कोटी रुपये खर्च करतो. ही रक्कम नेपाळच्या संरक्षण तरतुदीपेक्षा अधिक आहे. त्यामुळे निवृत्तीवेतन थांबवल्यास नेपाळच्या अर्थव्यवस्थेला हानी होणार आहे. ही हानी भरून काढण्यासाठी गोरखा प्रयत्न करत आहेत. नेपाळ सरकार अग्नीवीर योजनेला विरोध करत गोरखांना त्यात सहभागी होऊ नये, असे सांगत आहे.
रशियात जाण्यासाठी प्रयत्न
अग्नीवीर योजनेनुसार १७ ते २१ वयोगटातील युवकांना सैन्यात भरती केले जाते आणि ते केवळ ४ वर्षांची सेवा देतात. त्यानंतर त्यांना ठराविक रक्कम देऊन काढण्यात येते. सध्या गोरखा सैनिकांना निवृत्तीवेतन मिळते. अग्नीविरांना तसे निवृत्ती वेतन मिळणार नाही आणि ते अनेक वर्षांपर्यंत सैन्यात कामही करू शकणार नाहीत. त्यामुळे गोरखांना ही योजना मान्य नसल्याने ते अन्य पर्यायांचा शोध घेत आहेत. त्यातूनच ते रशियाच्या सैन्यात भरती होऊ लागले आहेत. नेपाळचे रशियातील राजदूत मिलन राज तुलाधर यांनी सांगितले, ‘रशियाच्या सैन्यात सेवा करणार्या कोणत्याही नेपाळी नागरिकाला जो माझ्या संपर्कात येतो त्याला युक्रेन युद्धाच्या धोक्यांविषयी सांगितले जात आहे आणि त्यांना तातडीने काठमांडूला परत जाण्यास सांगितले जात आहे. नेपाळमधील तरुणांना भरपूर पैसे देण्याचे आश्वासन दिले जात आहे आणि त्यांपैकी बहुतेकांना रशियाला पाठवले जात आहे. एवढेच नाही, तर प्रत्येक नेपाळी तरुण दलालांना (एजंटला) १० लाख रुपये देऊन तस्करीच्या माध्यमातून रशिया गाठत आहे. आम्ही प्रतिदिन किमान एका तरुणाला नेपाळला परत पाठवत आहोत. या सर्वांना रशियाच्या सैन्यात भरती होण्याचे आमीष देण्यात आले. नेपाळमधील अनेक नागरिक टुरिस्ट व्हिसा घेऊन तेथील सैन्यात भरती होत आहेत.’
भारताने पुनर्विचार करावा !
यातून लक्षात येते की, स्वतःच्या देशापासून प्रचंड दूर आणि वेगळ्या संस्कृतीत जाऊन काम करण्यास आणि प्रसंगी प्राण देण्यासही नेपाळचे गोरखा सिद्ध आहेत; मात्र भारतीय सैन्यात ते जाऊ इच्छित नाहीत. जरी अग्नीवीर योजनेमुळे त्यांना निवृत्ती वेतन किंवा अधिकची वर्षे काम करण्याची संधी मिळणार नसली, तरी ४ वर्षांनंतर ते अन्य काम करू शकणार आहेत. त्यांना ठराविक रक्कम मिळणारही आहे. त्याचा वापर ते अन्य काही काम किंवा व्यवसाय करण्यासाठी करू शकणार आहेत. तसेच ते स्वतःच्या देशातही राहू शकणार आहेत. या गोष्टींचा त्यांनी विचार करायला हवा. यासह भारतानेही अग्नीवीर योजनेच्या संदर्भात पुनर्विचार करण्याची आवश्यकता आहे, असेही वाटते. त्या दृष्टीने प्रयत्न करायला हवेत. गोरखा सैनिकांना जे हिंदु आहेत आणि आपल्या संस्कृतीतील आहेत अन् त्यांच्या अनेक पिढ्यांनी भारतासाठी प्राण अर्पण केलेले आहेत, हे पहाता या सर्व गोष्टींचा विचार करणे आवश्यक आहे. गोरखा रेजिमेंटमधून भारताचे पहिले फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ पुढे आले, तसेच चीन-पाकिस्तानला प्रत्येक वेळी चेतावणी देणारे दिवंगत चीफ डिफेन्स स्टाफ बिपिन रावत हेही याच रेजिमेंट मधले होते. ‘गोरखांमुळे ब्रिटीश कधीच नेपाळला जिंकू शकले नाहीत’, हेही लक्षात घ्यायला हवे. आजही ब्रिटीश सैन्यात गोरखा भरती होत असतात; मात्र त्यांना इंग्रजांपेक्षा अल्प निवृत्ती वेतन दिले जाते. तेथे त्यांच्याशी भेदभाव केला जातो; मात्र भारतात असे होत नाही. याचा विचार गोरखांनी केला पाहिजे. गोरखा सैनिकांमुळे नेपाळच्या अर्थव्यवस्थेला लाभ होत आहे. नेपाळ हिंदूबहुल राष्ट्र आहे. ते पूर्वी एकमेव हिंदु राष्ट्र होते आणि आता जरी ते नसले, तरी भविष्यात ते पुन्हा हिंदु राष्ट्र होऊ शकते. ही सर्व स्थिती पहाता भारताने ही गोरखांचा विचार करणे आवश्यक आहे.
हिंदु असलेले नेपाळमधील गोरखा भारतीय सैन्यात कसे टिकून रहातील, या दृष्टीने भारताने विचार करणे आवश्यक ! |