Deaths NCRB : कोरोनानंतर अचानक मृत्यू होण्याच्या घटनांत ११.६ टक्क्यांनी वाढ ! – राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभाग

  • ‘राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागा’कडून वर्ष २०२२ ची आकडेवारी प्रसिद्ध !

  • गुन्हेगारीच्या प्रमाणात ४.५ टक्के घट, तर सायबर गुन्ह्यांत २४ टक्के वाढ !

नवी देहली – कोरोना काळानंतर वर्ष २०२१ च्या तुलनेत २०२२ मध्ये अचानक होणार्‍या मृत्यूंचे प्रमाण ११.६ टक्क्यांनी वाढले. देशभरातील एकूण गुन्ह्यांत घट झाली असली, तरी मुले आणि महिला यांच्याविषयीच्या गुन्ह्यांत मात्र वाढ झाली आहे. वर्ष २०२२ मध्ये एकूण ५८ लाख २४ सहस्र ९५६ गुन्हे नोंद झाले. वर्ष २०२१ च्या ६० लाख ९६ सहस्र ३१० च्या तुलनेत ही संख्या ४.५ टक्के अल्प आहे, अशी माहिती ‘राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागा’ने दिली. ही आकडेवारी वर्ष २०२२ मधील आहे.

सौजन्य इंडिया डेली लाईव 

अहवालातील अन्य आकडेवारी !

१. वर्ष २०२२ मध्ये एकूण ६५ सहस्र ९८३ सायबर गुन्हे नोंदवले गेले. हे प्रमाण वर्ष २०२१ च्या तुलनेत २४ टक्क्यांनी अधिक आहे. वर्ष २०२१ मध्ये ५२ सहस्र ९७४ गुन्हे घडले होते. मुळात ही संख्याही वर्ष २०२० च्या तुलनेत ११.८ टक्क्यांनी अधिक होती.

२. वृद्धांसंदर्भातील गुन्ह्यांत ९.३ टक्क्यांनी वाढ झाली आहे.

३. देशात प्रत्येक घंट्याला महिलांविरुद्ध ५१ गुन्हे घडतात. वर्ष २०२२ मध्ये असे ४.४५ लाख गुन्हे नोंद झाले. वर्ष २०२१ च्या तुलनेत त्यांत ४ टक्के वाढ झाली. यांत १९.२ टक्के अपहरण, तर ७ टक्के अत्याचाराशी संबंधित गुन्हे आहेत. एकूण ३१ सहस्र ५१६ अत्याचारांच्या घटनांपैकी राजस्थानमध्ये सर्वाधिक ५ सहस्र ३९९ एवढे गुन्हे घडले. (आताच झालेल्या राजस्थान विधानसभेच्या निवडणुकीत कायदा-सुव्यवस्थेच्या अशा दुरवस्थेमुळेच जनतेने काँग्रेसला नाकारले, असे कुणी म्हटल्यास चूक ते काय ? – संपादक)

आत्महत्यांच्या घटनांत ४.२ टक्के वाढ !

देशात आत्महत्येचे प्रमाण ४.२ टक्क्यांनी वाढले. वर्ष २०२२ मध्ये १३ सहस्र विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. यामागे परीक्षेतील अपयश हे मुख्य कारण असल्याचे सांगण्यात आले. यातही महाराष्ट्रात सर्वाधिक, म्हणजे ३७८ विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली.

संपादकीय भूमिका 

  • गुन्हेगारांना अधिकाधिक कठोर शिक्षा देण्याची पद्धत अंमलात आणल्यासच गुन्हेगारीचे प्रमाण अल्प होऊ शकते !
  • ‘काळानुसार गुन्ह्यांचे स्वरूप पालटते; मात्र गुन्हेगारांच्या वृत्तीत पालट होत नाही’, हेच सायबर गुन्ह्यांच्या प्रचंड वाढीतून दिसून येते. त्यामुळे समाजाला साधना शिकवणे किती आवश्यक आहे ?, हे या आकडेवारीतून लक्षात येते !