पाटणा महाविद्यालयाच्या वसतीगृहांत विद्यार्थ्यांच्या वादातून गावठी बाँबचे स्फोट
गोळीबाराचीही घटना
पाटलीपुत्र (बिहार) – येथील पाटणा महाविद्यालयात ४ डिसेंबरला सकाळी गावठी बाँब फेकण्यात आले. तसेच गोळीबारही करण्यात आला. येथील मौलाना अबुल हसन अली नदवी अल्पसंख्याक वसतीगृह आणि इक्बाल वसतीगृह येथे ही घटना घडली. यात एक जण गंभीररित्या घायाळ झाला. मयंक असे त्याचे नाव असून तो मूळचा जहानाबाद जिल्ह्यातील आहे. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले. याप्रकरणी पोलिसांनी ४ आरोपी विद्यार्थ्यांना अटक केली आहे. घटनास्थळावरून गावठी बाँबही जप्त करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले. तसेच पोलिसांना लोखंडी सळ्या आणि काठ्या सापडल्या. जुन्या वादातून मिंटू आणि जॅक्सन या विद्यार्थ्यांनी नदवी आणि इक्बाल वसतीगृहांवर बाँबस्फोट केल्याचे सांगण्यात येत आहे.
उप पोलीस अधीक्षक अशोक सिंह म्हणाले की, पाटणा महाविद्यालयाच्या आवारामध्ये घडलेले ही पहिली घटना नाही. यापूर्वीही असे प्रकार घडले आहेत. महाविद्यालय प्रशासनाने खोडसाळ विद्यार्थ्यांची ओळख पटवून त्यांची हकालपट्टी करावी.
अशा विद्यार्थ्यांवर कारवाई करणे आवश्यक आहे. जोपर्यंत आरोपी विद्यार्थ्यांवर शिस्तभंगाची कारवाई किंवा नावनोंदणी रहित होत नाही, तोपर्यंत अशा घटनांना आळा घालणे कठीण आहे.
संपादकीय भूमिकाबिहार म्हणजे जंगलराज ! महाविद्यालयीन विद्यार्थी शिक्षण घेण्याऐवजी असे कृत्य करत असतील, तर ते भविष्यात काय करणार आहेत, हे स्पष्ट होते ! |