पाकिस्तानमध्ये खलिस्तानी आतंकवादी लखबीर रोडे याचा मृत्यू
‘खलिस्तान लिबरेशन फोर्स’चा होता प्रमुख, तर जर्नेलसिंह भिंद्रनवाले याचा पुतण्या
इस्लामाबाद (पाकिस्तान) – भारतात बंदी घातलेली खलिस्तानी आतंकवादी संघटना ‘खलिस्तान लिबरेशन फोर्स’ आणि ‘इंटरनॅशनल सीख यूथ फेडरेशन’ यांचा प्रमुख आतंकवादी लखबीर सिंह रोडे (वय ७२ वर्षे) याचा पाकिस्तानमध्ये मृत्यू झाला आहे. २ डिसेंबर या दिवशी हृदयविकाराच्या झटक्याने त्याचा मृत्यू झाला. रोडे हा खलिस्तानी आतंकवादी जर्नेलसिंह भिंद्रनवाले याचा पुतण्या होता. अकाल तख्तचे माजी जथ्थेदार जसबीर सिंह रोडे यांनी त्याच्या मृत्यूला दुजोरा दिला. ४ डिसेंबर या दिवशी पंजाबमधील मोगा येथे राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेच्या पथकाने रोडे याची सवा पाच एकर भूमी जप्त केली होती.
१. भारत सरकारने लखबीर सिंह रोडे याला आतंकवादी घोषित केल्यानंतर तो पाकिस्तानात पळून गेला होता. वर्ष २०२१ मध्ये पंजाबच्या लुधियाना न्यायालयात झालेल्या स्फोटात रोडे याचे नावही समोर आले होते. वर्ष १९८५ मध्ये एअर इंडियाच्या कनिष्क विमानातील बाँबस्फोटातही रोडे याला आरोपी करण्यात आले होते.
२. रोडे पंजाबमध्ये ‘स्लीपर सेल’ (आतंकवाद्यांना साहाय्य करणारे स्थानिक गट) बनवत होता. त्याने अमृतसरमध्ये सीमेवरून ग्रेनेड आणि बाँबही पाठवले होते. रोडे याला पाकिस्तानची गुप्तचर संस्था आय.एस्.आय.चे साहाय्य करत होती. आतंकवादी रिंदा हाही रोडे याच्या संपर्कात होता.
३. या स्लीपर सेलमध्ये १५० हून अधिक सदस्य आहेत. स्लीपर सेलमधील एकही सदस्य एकमेकांना ओळखत नाही. स्लीपर सेल सदस्याचा भ्रमणभाष क्रमांकही कुणाकडे नाही. जेव्हा पाकमधून पंजाबमध्ये शस्त्रे पाठवली जातात, तेव्हा १ किंवा २ स्लीपर सेल सदस्यांना हे ठाऊक असते.