संतांच्या आशीर्वादाने सोलापूर येथे होणार्या भव्य हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या प्रसाराला प्रारंभ !
श्री श्री श्री १००८ जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्व आराध्य शिवाचार्य महास्वामीजी यांचे समस्त हिंदु समाजाला सभेसाठी उपस्थित रहाण्याचे आवाहन !
सोलापूर, ४ डिसेंबर (वार्ता.) – येथे हिंदु जनजागृती समिती आयोजित हिंदु राष्ट्र-जागृती सभेच्या प्रसाराचा प्रारंभ संतांच्या आशीर्वादाने करण्यात आला. हिंदु जनजागृती समितीचे श्री. विक्रम घोडके, उद्योजक श्री. बसवराज इटकळे, श्री. संदीप ढगे, सनातन संस्थेच्या पू. दीपाली मतकर, श्री. हिरालाल तिवारी यांनी श्री श्री श्री १००८ जगद्गुरु डॉ. मल्लिकार्जुन विश्व आराध्य शिवाचार्य महास्वामीजींची भेट घेऊन ३ जानेवारी २०२४ या दिवशी होणार्या सभेची माहिती दिली. या वेळी महास्वामीजींनी समितीच्या कार्याचे कौतुक केले. ते म्हणाले की, आपण जे धर्मरक्षणाचे कार्य करत आहात, ते पुष्कळ आवश्यक आहे आणि ती काळाची आवश्यकता बनली असून मी सदैव आपल्या समवेत आहे. सध्या हिंदु समाजाला धर्मशिक्षण देण्याची आवश्यकता आहे. हिंदु राष्ट्र स्थापन होणे, ही काळाची आवश्यकता आहे. यासाठी समस्त हिंदु समाजाला या सभेला उपस्थित रहाण्याचे मी आवाहन करतो.
आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते सभेच्या भित्तीपत्रकाचे अनावरण !विद्यमान आमदार श्री. विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते जोशी गल्ली येथील जुन्या विठ्ठल मंदिरात श्रीफळ वाढवण्यात आले. या प्रसंगी नगरसेवक श्री. संजय कोळी, नगरसेवक श्री. अमर पुदाले, हिंदुत्वनिष्ठ राजकुमार पाटील, श्री. बसवराज इटकळे इत्यादी उपस्थित होते, तसेच सनातन संस्थेच्या संत पू. दीपाली मतकर यांचीसुद्धा वंदनीय उपस्थिती लाभली. या वेळी श्री विठुरायाच्या चरणी सामूहिक प्रार्थना करण्यात आली. तसेच सभेच्या प्रसाराच्या निमित्ताने बनवण्यात आलेल्या भित्तीपत्रकाचे अनावरणही आमदार विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते करण्यात आले. उपस्थित सर्वांनी सभेच्या प्रसार कार्याची माहिती जाणून घेतली आणि सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. |
श्री १०८ ष.ब्र. वीरमहांत शिवाचार्य महास्वामी, चीनमगेरी, चौडापूर यांच्या हस्ते सभेच्या निमंत्रण पत्रिकेचे अनावरण !घोंगडे वस्ती येथील नगरसेवक श्री. सुरेश पाटील यांच्या निवासस्थानी श्री १०८ ष.ब्र. वीरमहांत शिवाचार्य महास्वामी, चीनमगेरी, चौडापूर यांच्या हस्ते सभेच्या निमंत्रण पत्रिकेचे अनावरण करण्यात आले. या वेळी नगरसेवक श्री. सुरेश पाटील, धर्मप्रेमी श्री. बिपिन पाटील, श्री. अप्पा शहापुरे, सनातन संस्थेचे श्री. हिरालाल तिवारी इत्यादी उपस्थित होते. या प्रसंगी स्वामींनी सभेच्या प्रसार कार्याची माहिती जाणून घेतली आणि समितीच्या पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या. |