पुणे येथील ससून रुग्णालयातील बंद असलेली ‘एच्.एम्.आय.एस्.’ प्रणाली पुन्हा चालू !
पुणे – राज्यातील सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांशी संलग्न असलेल्या रुग्णालयांमधील कामकाज पूर्वी ‘हेल्थकेअर मॅनेजमेंट इन्फर्मेशन सिस्टीम’ (‘एच्.एम्.आय.एस्.’) प्रणालीद्वारे चालत होते; मात्र जुलै २०२२ मध्ये अचानक ही प्रणाली बंद करण्याचा निर्णय वैद्यकीय शिक्षण विभागाने घेतला. तेव्हापासून सर्व रुग्णालयांमधील ‘एच्.एम्.आय.एस्.’ प्रणाली बंद आहे; परंतु आता दीड वर्षानंतर पुन्हा सर्व रुग्णालयांमध्ये ‘एच्.एम्.आय.एस्.’ प्रणाली चालू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. ससून रुग्णालय बी.जे. वैद्यकीय महाविद्यालयाशी संलग्न असल्याने ‘ससून’मधील ‘एच्.एम्.आय.एस्.’ प्रणाली चालू होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. त्यामुळे आधुनिक वैद्य आणि कर्मचार्यांना रुग्णांची माहिती हाताते न लिहिता ‘एच्.एम्.आय.एस्.’ प्रणालीद्वारे ऑनलाईन नोंदवता येणार आहे. यामुळे दीड वर्षानंतर ‘ससून’मधील कारभार पुन्हा ऑनलाईन होणार आहे. (ही प्रणाली जर एवढी उपयुक्त होती, तर ती बंद करण्याचा निर्णय चुकला आहे का ? हे वैद्यकीय शिक्षण विभागाने पाहिले पाहिजे. – संपादक)