ओझर, जिल्हा पुणे येथे झालेल्या २ दिवसांच्या राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदे’च्या थेट प्रक्षेपणामध्ये आलेले अडथळे, आध्यात्मिक स्तरावरील उपाय केल्यावर दूर होणे
‘दिनांक २ आणि ३ डिसेंबर २०२३ या दिवशी ओझर, जिल्हा पुणे येथे राज्यस्तरीय ‘महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषद’ आयोजित करण्यात आली होती. ‘श्री विघ्नहर गणपति मंदिर देवस्थान’च्या श्री विघ्नहर सांस्कृतिक भवन येथे ही परिषद आयोजित करण्यात आली होती. महाराष्ट्र राज्यातील मंदिरांचे रक्षण आणि संवर्धन ही परिषदेची उद्दिष्टे होती. या परिषदेचे आयोजन श्री विघ्नहर गणपति मंदिर देवस्थान (ओझर), श्री लेण्याद्री गणपति मंदिर देवस्थान (लेण्याद्री), श्रीक्षेत्र भीमाशंकर ज्योतिर्लिंग देवस्थान, हिंदु जनजागृती समिती आणि महाराष्ट्र मंदिर महासंघ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते.
या महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदेचे ‘यू ट्यूब’वरून थेट प्रक्षेपण करण्यात सूक्ष्मातील वाईट शक्तींमुळे पुढील अडथळे आले. त्यांच्या निवारणार्थ केलेल्या आध्यात्मिक स्तरांवरील उपायांमुळे त्या अडथळ्यांवर मात करता आली. त्याचा वृत्तांत येथे देत आहोत.
२ डिसेंबर २०२३
महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदेचे थेट प्रक्षेपण करत असतांना ते मधे मधे तुटक येणे, ‘समोरच्या दिशेने येणारी काळी (त्रासदायक) शक्ती’ हे त्याचे कारण असणे आणि आध्यात्मिक स्तरावरील उपायासाठी समोरच्या दिशेने खोके लावल्यावर तो अडथळा दूर होणे : दुपारी १२.३० वाजता या परिषदेचे थेट प्रक्षेपण करत असतांना ते मधे मधे तुटक येत होते. ही अडचण परिषदेच्या स्थळी असलेल्या साधकाने मला कळवली. तेव्हा मला जाणवले, ‘ही सेवा संगणकांवर करणार्या साधकांच्या समोरून त्यांच्यावर वाईट शक्ती काळी (त्रासदायक) शक्ती सोडत आहेत.’ त्यावर आध्यात्मिक उपाय म्हणून तेथील साधकांना त्या संगणकांच्या पुढे समोरच्या दिशेने तोंड करून एक बाजू उघडी असलेले रिकामे २ खोके लावायला सांगितले. हे खोके लावण्याचा ‘समोरच्या दिशेकडून येणारी त्रासदायक शक्ती रिकाम्या खोक्यांमध्ये आकर्षित होऊन तिचा प्रभाव नष्ट होईल आणि तसे झाल्याने परिषदेचे थेट प्रक्षेपण करण्यात संगणकांना येणारी अडचण दूर होईल’, हा उद्देश होता.
साधकाने मी सांगितल्याप्रमाणे खोके लावल्याने खरोखरच थेट प्रक्षेपण करण्यात येणारी अडचण २ – ३ मिनिटांत दूर झाली. साधकांनी समोरच्या दिशेने विभूतीही फुंकरली.
३ डिसेंबर २०२३
महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदेचे ‘गुगल लिंक’द्वारे थेट प्रक्षेपण पहाण्यात धर्मप्रेमींना अडचण निर्माण होणे आणि २० मिनिटे आध्यात्मिक स्तरावरील उपाय केल्यावर थेट प्रक्षेपण पहाण्यातील बहुतांश अडथळे दूर होणे : या परिषदेचे ‘यू ट्यूब’वरून थेट प्रक्षेपण पहाता येण्याच्या दृष्टीने धर्मप्रेमींना एक ‘गुगल लिंक’ तयार करून पाठवली होती. परिषदेला आरंभ झाल्यानंतर सकाळी १०.१५ वाजता या ‘गुगल लिंक’द्वारे थेट प्रक्षेपण पहाण्यात अडचण निर्माण झाली. त्यामुळे तत्परतेने एक पर्यायी व्यवस्था करून नवीन ‘गुगल लिंक’ पाठवण्यात आली. त्यावरून थेट प्रक्षेपण चालू झाले; पण त्याची गुणवत्ता पहिल्या व्यवस्थेतून मिळत होती, तशी मिळत नव्हती. ही अडचण थेट प्रक्षेपणाची सेवा करणार्या साधकाने मला लगेच कळवली.
जेव्हा मला एखादा साधक सेवेमधील अडथळा कळवतो, तेव्हा त्या अडथळ्याशी संबंधित सूक्ष्मातील त्रास मला माझ्या देहावर एखाद्या ठिकाणी दाबाच्या स्वरूपात जाणवतो. या वेळी मला माझ्या चेहर्याभोवती दाब (त्रासदायक शक्तीचे आवरण) जाणवला. तो दूर करण्यासाठी मी नामजप शोधला असता, ‘महाशून्य’ हा नामजप मिळाला. मी तो नामजप केल्यावर माझ्या चेहर्याभोवतीचा दाब दूर झाला. त्यानंतर मला माझे अनाहतचक्र आणि आज्ञाचक्र यांवर दाब जाणवू लागला. मी माझ्या उजव्या हाताचा तळवा आज्ञाचक्रावर आणि डाव्या हाताचा तळवा अनाहतचक्रावर ठेवून ‘महाशून्य’ हा जप ५ मिनिटे केला. त्यानंतर तो दाब दूर झाला.
हे सर्व उपाय करायला मला एकूण ९ मिनिटे लागली. आता मला माझ्या देहावर कोणताही त्रास जाणवत नव्हता. त्यामुळे ‘पहिल्या ‘गुगल लिंक’द्वारे थेट प्रक्षेपण करण्यातील अडथळा दूर झाला आहे’, असे मला जाणवले. याची निश्चिती करण्यासाठी मी सकाळी १०.२४ वाजता साधकाला संपर्क करून पहिल्या ‘गुगल लिंक’द्वारे थेट प्रक्षेपण करून पहाण्यास सांगितले. त्याने सकाळी १०.३० वाजता ‘आता पहिल्या ‘गुगल लिंक’द्वारे थेट प्रक्षेपण होत आहे; पण थेट प्रक्षेपणात खाली जाड काळी रेष येत आहे’, असे कळवले. त्या साधकाने ही अडचण कळवल्यावर मला माझ्या ओठांवर दाब जाणवू लागला. मी ‘शून्य’ हा नामजप करत ओठांसमोर उजव्या हाताचा तळवा ठेवून ५ मिनिटे उपाय केले. त्यानंतर माझ्या ओठांवरील दाब दूर झाला. तेव्हा थेट प्रक्षेपणामध्ये येत असलेली जाड काळी रेष अगदी बारिक शिल्लक राहिल्याचे साधकाने कळवले. ती रेष खाली असल्याने तिचा फारसा अडथळा जाणवत नव्हता.
अशा रितीने २० मिनिटे आध्यात्मिक उपाय केल्यावर महाराष्ट्र मंदिर-न्यास परिषदेचे ‘यू ट्यूब’वरून थेट प्रक्षेपण करण्यातील बहुतांश अडथळे दूर झाले. त्यानंतर पुन्हा अन्य कोणतेही अडथळे आले नाहीत.’
– (सद्गुरु) डॉ. मुकुल गाडगीळ, पीएच्.डी., महर्षि अध्यात्म विश्वविद्यालय, गोवा. (४.१२.२०२३)