पाकिस्तानी हिंदु क्रिकेट पटूने काँग्रेसला विचारले, ‘पनौती कोण आहे ?’
(‘पनौती’ म्हणजे पांढर्या पायाचा किंवा अशुभ)
भारत क्रिकेटमध्ये विश्वचषक स्पर्धा हरल्यानंतर काँग्रेसचे युवराज राहुल गांधी यांनी पंतप्रधान मोदी यांना ‘पनौती’ म्हणून हिणवले होते. राजस्थानमधील विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या वेळी राहुल गांधी म्हणाले होते, ‘‘भारतीय संघ चांगला खेळत होता; पण पनौतीने भारताला पराभूत केले.’’ मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड येथील विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या झालेल्या पराभवानंतर पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया यांनी राहुल गांधी यांच्या विधानाला प्रत्युत्तर दिले आहे.
आता विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेसच्या मतदानाचा टक्का घसरल्यानंतर ‘पनौती नेमके कोण आहे’, हे अनेकांकडून विचारले जात आहे. पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू दानिश कनेरिया यांनी सामजिक माध्यम ‘एक्स’वर विचारले आहे, ‘पनौती कोण आहे ?’
दानिश कनेरिया हे भारतीय वंशाचे माजी पाकिस्तानी क्रिकेटपटू असून त्यांच्यावर धर्मांतर करण्यासाठी अनेक वेळा दबाव आणण्यात आला. एका मुलाखतीत कनेरिया यांनी सांगितले, ‘‘मी इस्लाम स्वीकारण्याचा विचारही करू शकत नाही. इतके अधःपतन मला अशक्य आहे. मी मोदींचे अभिनंदन करतो. भारताचा विकास झाला आहे. मी भारतीय नागरिकत्व घेण्याचा किंवा न घेण्याचा प्रश्न नाही. जेव्हा संधी मिळेल, तेव्हा ते घेईन. मी जर इस्लाम स्वीकारला असता, तर माझी क्रिकेट कारकीर्द काय झाली असती ? कदाचित् मी कर्णधार असतो. अनेक विक्रम मोडले असते; पण मला ते नको आहे. माझ्यासाठी धर्म अधिक महत्त्वाचा आहे. परिस्थिती काहीही असो. मला धर्मांतरासाठी अनेक वेळा बोलावण्यात आले; पण मी ‘जय श्रीराम’ म्हटले.’’