तुष्टीकरणाचे राजकारण करणार्या पक्षांना घरचा अहेर : तेलंगाणात मोठा फटका !
१. सत्ताधारी ‘भारत राष्ट्र समिती’चा दारूण पराभव !
मध्यप्रदेश, छत्तीसगड, राजस्थान आणि तेलंगाणा या राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत यंदा मोठा पालट दिसून आला. तुष्टीकरणाचे राजकारण करणार्या पक्षांना जनतेने घरचा अहेर दिला. वर्ष २०१३ मध्ये स्वतंत्र तेलंगाणा राज्याची स्थापना झाल्यापासून तेथे ही तिसरी निवडणूक झाली. गेल्या २ वेळा मुख्यमंत्री राहिलेले ‘भारत राष्ट्र समिती’चे (‘बी.आर्.एस्.’चे) के. चंद्रशेखर राव यांना या वेळी काँग्रेसने कडवी टक्कर दिली. मतमोजणी चालू झाल्यापासूनच काँग्रेस आघाडीवर होती. काँग्रेसने शेवटपर्यंत ही विजयी आघाडी कायम राखत ६४ जागा पटकावल्या. सत्ताधारी ‘बी.आर्.एस्.’ला अवघ्या ३९ जागांवर समाधान मानावे लागले, भाजपने ८ जागांवर विजय मिळवला, तर ‘एम्.आय.एम्.’ पक्षाने ७ जागा खिशात घातल्या.
२ वेळा मुख्यमंत्री राहिलेले के.सी. राव यांच्यासाठी हा मोठा धक्का आहे. के.सी. राव यांच्या झालेल्या दारूण पराभवाच्या कारणांची आता चर्चा चालू झाली आहे. वर्ष २०१८ मधील विधानसभेच्या निवडणुकीत के.सी. राव यांच्या ‘बी.आर्.एस्.’ला ८८ जागांवर विजय मिळाला होता, तर काँग्रेसला केवळ १९ जागा मिळाल्या होत्या. यंदा मात्र ‘बी.आर्.एस्.’च्या जागा अर्ध्याने खाली आल्याचे चित्र आहे.
२. काय आहेत के. चंद्रशेखर राव यांच्या पराभवाची कारणे ?
२ अ. लांगूलचालनाच्या राजकारणाला जनता कंटाळली ! : तेलंगाणामध्ये मुसलमानांची मते निर्णायक आहेत. तेथे ‘एम्.आय.एम्.’सारखा कट्टर इस्लामी पक्षही आहे. त्यामुळे काँग्रेस, बी.आर्.एस्. आणि एम्.आय.एम्. यांच्यात मुसलमानांच्या लांगूलचालनासाठी स्पर्धा चालू असते. त्यातही राज्यात सत्ताधारी असल्यामुळे ‘बी.आर्.एस्.’ने शासकीय स्तरावर तुष्टीकरणात आघाडीच घेतली होती. तेलंगाणा सरकार गेल्या काही वर्षांपासून राज्यातील ७ सहस्र इमामांना ५ सहस्र रुपये मानधन देत आहे. जुलै २०२२ मध्ये इमाम आणि मौलवी यांचे ३ मासांचे प्रलंबित मानधन देण्यासाठी तेलंगाणा सरकारने १७ कोटी रुपये संमत केले. तेलंगाणामध्ये रमझान मासाच्या काळात सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेद्वारे प्रवास करणार्यांना २५ टक्के सवलत दिली गेली होती. के. चंद्रशेखर राव यांनीच गेल्या वर्षी ‘भाजपमधील नेते हे मूर्खांचा समूह असून भगवा ध्वज बंगालच्या खाडीत बुडवायला हवा’, असे संतापजनक विधान केले होते.
२ आ. मोदीद्वेष नडला ! : पंतप्रधान नरेंद्र मोदी तेलंगाणाच्या दौर्यावर असतांना राजशिष्टाचारानुसार के. चंद्रशेखर राव यांनी त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित रहाणे अपेक्षित होते; परंतु मोदी यांच्या द्वेषापोटीच के. चंद्रशेखर राव हे ३ वेळा अनुपस्थित राहिले. हिंदुत्वनिष्ठ आमदार टी. राजासिंह यांनाही तेथील सरकारकडून मोठ्या प्रमाणात विरोध होत असतो. भाजप नेत्यांवरही अनेक आक्रमणे होत आहेत.
२ इ. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला सत्ताधार्यांनी केलेल्या विरोधामुळे जनतेत अप्रसन्नता ! : बोधन (तेलंगाणा) येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा स्थापन करण्यास सत्ताधारी ‘बी.आर्.एस्.’च्या कार्यकर्त्यांनी हिंसक विरोध केला होता. त्यामुळे तेथील जनतेत सत्ताधार्यांविषयी तीव्र अप्रसन्नता निर्माण झाली होती.
२ ई. हिंदूंचा पूर्णपणे विसर ! : तेलंगाणा राष्ट्र समितीच्या राजकारणाचा पाया पहिल्यापासूनच मुसलमानांच्या तुष्टीकरणावर आधारलेला आहे. तेलंगाणामध्ये मुसलमानांचे वर्चस्व आहे. वास्तविक तेलंगाणामध्ये हिंदूंची लोकसंख्या ८५ टक्के, तर मुसलमान लोकसंख्या १२.६ टक्के आहे. याचा के. चंद्रशेखर राव यांना विसर पडला. त्यामुळे यंदा जनतेने मतपेटीद्वारेच हिंदूंच्या टक्केवारीची आठवण त्यांना करून दिली, असेही म्हणता येईल.
३. राष्ट्रीय राजकारणाकडे असलेला कल भोवला ?
गेल्या वर्षापासून के. चंद्रशेखर राव हे राष्ट्रीय राजकारणात प्रवेश करण्याचा प्रयत्न करत आहेत. राष्ट्रीय मंचावर येण्यासाठी ऑक्टोबर २०२२ मध्ये के.सी. राव यांनी त्यांच्या पक्षाचे ‘तेलंगाणा राष्ट्र समिती’ हे नाव पालटून ‘भारत राष्ट्र समिती’ केले. तेव्हा तेलंगाणाच्या निवडणुकीला वर्षभरापेक्षा अल्प कालावधी शेष होता. त्याच कालावधीत काँग्रेस आणि भाजप यांनी भ्रष्टाचाराच्या सूत्रावरून मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांच्या विरोधात रान उठवले. दुसरीकडे के.सी. राव मात्र ७०० ते ८०० वाहनांच्या ताफ्यासह महाराष्ट्रात आले आणि महाराष्ट्रात त्यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करून स्वत:ची राष्ट्रीय प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न केला. या वेळी राव यांच्यासमवेत त्यांचे संपूर्ण मंत्रीमंडळही होते. राष्ट्रीय राजकारणाकडे असलेला कल आणि तेलंगाणा सोडून इतर राज्यांत घालवलेला वेळ यांची के.सी. राव यांना मोठी किंमत चुकवावी लागली, अशी चर्चा आता राजकीय विश्लेषकांमध्ये चालू आहे. मुळात तेलंगाणा राज्याची स्थापना कट्टर प्रांतीय अस्मितेतून झाली आहे. अशा राज्याचा ‘प्रांतीय मुकुट’ राव यांनी स्वतः धारण केला; परंतु कालांतराने त्यांना ‘राष्ट्रीय मुकुटा’चा मोह आवरला नाही आणि त्यांनी तो धारण करण्याचा हास्यास्पद आटापिटा चालू केला. प्रांतीय अस्मिता जपणार्या तेलंगाणावासियांच्या हे पचनी पडले नाही आणि त्यामुळेच त्यांनी राव यांना थेट घरचा रस्ता दाखवला, असेही काही राजकीय विश्लेषकांचे म्हणणे आहे.
– श्री. भूषण कुलकर्णी, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (३.१२.२०२३)