दिवसभरातील घडामोडींवर एक दृष्टीक्षेप : शिकवणीवर्गाच्या शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग; कांदिवली येथे दगडाने ठेचून एकाची हत्या….
शिकवणीवर्गाच्या शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा विनयभंग
मुंबई – खासगी शिकवणीच्या शिक्षकानेच १६ वर्षीय मुलीचा विनयभंग केल्याचा गुन्हा ॲन्टॉपहिल पोलिसात नोंदवला आहे. १ ते १४ नोव्हेंबर या काळात शिक्षकाचे अश्लील चाळे वाढल्याने विद्यार्थिनीने शिकवणीला जाणे बंद केले. अखेर मुलीने याविषयी घरी सांगितले. मुलीच्या तक्रारीवरून पोलिसांनी विनयभंगाचा गुन्हा नोंदवला आहे.
कांदिवली येथे दगडाने ठेचून एकाची हत्या
मुंबई – कांदिवली पूर्व येथे दगडाने ठेचून एकाची हत्या करण्यात आल्याचे उघड झाले असून ३४ वर्षीय आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. प्रेमसंबंधात अडचणीचा ठरत असल्याच्या कारणावरून आरोपीने संबंधित व्यक्तीला दारू पाजून तिची हत्या केली. आरोपीचे मृत व्यक्तीच्या पत्नीवर प्रेम होते. त्यातून ही हत्या झाल्याचे समजते.
२ अमली पदार्थ धर्मांध महिला तस्करांना अटक
नवी मुंबई – दोन महिलांना अमली पदार्थ तस्करीच्या आरोपाखाली येथून नुकतीच अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून ३ लाख ६६ सहस्र ९६० रुपये किमतीचे प्रतिबंधित औषध मेफेड्रोन जप्त करण्यात आले आहे. गुप्त माहितीच्या आधारे कारवाई करत ए.पी.एम्.सी. पोलिसांनी ही कारवाई केली. मंजू फारूक आणि रशिदा शेख अशी आरोपींची नावे आहेत.
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर १० ठिकाणी पादचारी पूल होणार
वसई – मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वर्सोवा पुलापासून ते पालघरच्या अच्छाडपर्यंत १० ठिकाणी पादचारी पूल बांधण्यात येणार आहेत. मुंबई, ठाणे, वसई विरार, मीरा भाईंदर, पालघर यांसह गुजरातला जोडणारा मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गालगतच अनेक छोटी गावे असल्याने येथील ग्रामस्थांना दळणवळण करण्यासाठी महामार्गाचा वापर करावा लागतो. त्यामुळे या महामार्गावर रस्ते ओलांताना अपघाताच्या घटना घडतात. हे पूल बांधले गेल्याने नागरिकांना सुविधा होणार आहे. या कामाला विरार येथून आरंभ झाला आहे. हे पूल मुख्य रस्त्यापासून साडेपाच मीटर उंचीवर असणार आहेत.
गिरगाव येथे लागलेल्या आगीत एका दांपत्याचा मृत्यू
मुंबई – गिरगाव चौपाटी येथे ३ डिसेंबरच्या रात्री विलंबाने लागलेल्या आगीत एका ज्येष्ठ पती दांपत्याचा होरपळून मृत्यू झाला. निवासी इमारतीत लागलेली ही आग विझवण्यात पहाटे अग्नीशमन दलाला यश आले. नलिनी शाह (८२ वर्षे) आणि हिरेन शाह (६० वर्षे) अशी त्यांची नावे आहेत.
तिसर्या मजल्यावरील एका घरात ही आग लागली होती. ही आग काही मिनिटांतच पसरली. विद्युत् पुरवठा बंद करून अग्नीशमन दलाने इमारतीत अडकलेल्या ९ जणांना बाहेर काढले. पहाटे साडेतीनच्या सुमारास आग विझवण्यात अग्नीशमन दलाला यश आले.