संपादकीय : नौदलदिनाचा अन्वयार्थ !
भारतात गेल्या काही वर्षांत सांस्कृतिक राष्ट्रवादाचे वारे वहात असले, तरी सार्वत्रिक राष्ट्रोत्थानाचे कार्य राष्ट्राच्या शौर्याचे पुनर्जागरण झाल्याखेरीज अपूर्ण आहे. या सूत्राला दृष्टीत ठेवून भारतीय नौदलदिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारतीय नौदलाचे पितामह छत्रपती शिवाजी महाराज यांचा जागर केला. महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग किल्ला हा भारतीय नौदलाचा एक ऐतिहासिक वारसा होय ! छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदुर्ग किल्ल्याच्या रक्षणार्थ पहारा देण्यासाठी उभारलेल्या राजकोट किल्ल्यावर महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले. येथे हे लक्षात घेणे आवश्यक आहे की, हा सोहळा केवळ आपल्या इतिहासाचे जतन नि संवर्धन यांचा संदेश देण्यापुरता सीमित नाही. या माध्यमातून भारताच्या संरक्षणाला आव्हान ठरणार्या शत्रूंशी दोन हात करण्यासाठी भारतीय नौदल आणि त्या ओघाने सार्वभौम नि आसेतुहिमाचल अशी भारतभू सिद्ध असल्याची चेतावणी देणारा आहे. शत्रू कितीही बलाढ्य असला आणि आपली शक्ती त्याच्या तुलनेत अल्प असली, तरी भारतीय अशा शत्रूला नमवण्याची क्षमता ठेवतात. भारताच्या गौरवशाली इतिहासात याच्या साक्षी ठायीठायी सापडतात.
छत्रपती शिवाजी महाराज यांचे त्यांतील अग्रेसर उदाहरण ! पाच पातशाह्यांना लाथाडून महाराजांनी मूठभर मावळ्यांसह हिंदवी स्वराज्य स्थापिले आणि त्यांच्यानंतर २-३ पिढ्यांत संपूर्ण भारतावर भगवा स्थापन केला. असे उदाहरण जगात दुसरे नाही. नौदलदिनाच्या निमित्ताने झालेले हे इतिहासाचे पुनर्जागरण त्यामुळेच भारताला स्वरक्षणार्थ उठाव करण्यास म्हणजेच ‘ऑफेन्सिव डिफेन्स’ साधण्यास साहाय्यभूत ठरणार आहे.
काही दिवसांपूर्वी स्वदेशी बनावटीची दुसरी विमानवाहू युद्धनौका उभारण्यासाठी सरकारकडून हिरवा कंदिल मिळाला आहे. या निमित्ताने चीनचे पित्त खवळले असून त्याने थेट भारताला न्यून लेखण्याचा पोरखेळ चालवला. तसे पाहिले, तर स्वदेशी बनावटीची युद्धनौका उभारणे आजपर्यंत केवळ अमेरिका, ब्रिटन, रशिया, फ्रान्स, जपान, चीन आणि भारत या देशांनाच शक्य झाले आहे. असे असले, तरी चिनी सरकारचे मुखपत्र ‘ग्लोबल टाइम्स’ने भारतीय नौदलाच्या क्षमतेच्या मर्यादा मोजण्याचा नि स्वत:च्या अत्युच्च क्षमतेचा पाढा वाचून दाखवला आहे.
चीनने हे लक्षात ठेवावे की, आज त्याची अर्थव्यवस्था भारतापेक्षा पाच पट असली, त्याची सैन्य क्षमता भारतापेक्षा पुष्कळ सरस असली, तरी या कुख्यात आशियाई गुंडाला शह देण्याची क्षमता भारतीय रक्तात आहे. ३ वर्षांपूर्वी भारताने डोकलाम संघर्षाच्या माध्यमातून ते सिद्धही केले. भारतीय नौदल दिनाच्या निमित्ताने पंतप्रधान मोदी यांनी केलेल्या छत्रपतींच्या पुतळ्याचे अनावरण हा त्याचाच संदेश जगताला देत आहे. हे केवळ चीनच नव्हे, तर भारतावर डोळे वटारून पहाणार्या प्रत्येक देशाने लक्षात ठेवणे त्याच्या हिताचे असणार आहे !
सिंधुदुर्गातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण हे सार्वत्रिक राष्ट्रोत्थानास ठरणार साहाय्यभूत ! |