Shivaji Maharaj : शिवरायांच्या काळातील समुद्री सामर्थ्य आपल्याला परत मिळवायचे आहे ! – पंतप्रधान मोदी
मालवण – एखाद्या देशासाठी समुद्री सामर्थ्य किती महत्त्वाचे असते, ते छत्रपती शिवाजी महाराजांनी सर्वांत प्रथम जाणले. त्यांनीच भारतीय नौदलाचा पाया रचला. समुद्री शक्ती वाढवण्यासाठी त्यांनी काम केले. ‘समुद्रावर ज्याचे वर्चस्व तो सर्वशक्तीमान’ हे छत्रपती शिवाजी महाराजांनी ओळखले. शिवाजी महाराजांनी हिरोजी इंदुलकर, कान्होजी आंग्रे यांच्यासारखे लोक उभे केले. सिंधुदुर्गचा ऐतिहासिक किल्ला हे शिवाजी महाराजांच्या शक्तीचे प्रतीक आहे. शिवरायांनी कमावलेली ती नौदलाची शक्ती आपण नंतर गमावली. आता ती पुन्हा मिळवायची आहे, असे विधान पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथे केले. नौदलदिनानिमित्त येथे आयोजित नौदलाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. ‘यंदाचा नौदलदिन हा सिंधुदुर्गवर साजरा होत आहे, ही आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट आहे’, असेही पंतप्रधान मोदी या वेळी म्हणाले.
पंतप्रधान मोदी यांनी मांडलेली सूत्रे –
१. सिंधुदुर्ग किल्ला आपल्याला आशीर्वाद देत आहे. सिंधुदुर्ग किल्ला, मालवण, तारकर्लीचा सुंदर किनारा या सर्व परिसरांत छत्रपती शिवाजी महाराजांचा प्रताप सर्वत्र पसरलेला आहे. शिवाजी महाराजांच्या विशाल पुतळ्याचे अनावरण प्रत्येक भारतियाला शक्ती प्रदान करत आहे. जेथे नौदलाचा जन्म झाला तेथे नौदलदिन साजरा होत आहे. आगामी काळात सिंधुदुर्गप्रती तीर्थक्षेत्राचा भाव निर्माण होईल. ज्या नौदलाचा आपण गर्व करतो, त्याचा प्रारंभ छत्रपती शिवाजी महाराजांपासून झाला आहे. त्यामुळे विदेशी पाहुण्यांना लक्षात येईल की, नौदलाची संकल्पना ही आताची नाही, तर शेकडो वर्षांची आहे. ही संकल्पना आता जगाने स्वीकारली आहे.
२. देशात विविध प्रकारचे अनेक लोक रहात आहेत; पण आज ते राष्ट्रभावनेने जोडलेले आहेत. देश आहे, तर आपण आहोत. देश पुढे गेला, तर आपण पुढे जाऊ. हीच भावना आज प्रत्येक नागरिकाच्या मनात आहे.
३. भारताचा इतिहास केवळ १ सहस्र वर्षांचा गुलामीचा नाही आहे, तर तो इतिहास विजयाचा आणि शौर्याचा इतिहास आहे. आजसारखी आधुनिकता नसतांना समुद्राला पार करून सिंधुदुर्ग किल्ल्याप्रमाणे अनेक किल्ले बनवले गेले. त्यामुळे भारताच्या सामुद्रिक सामर्थ्याचा इतिहास शेकडो वर्षांचा आहे. भारताची हरवलेली शक्ती पुन्हा मिळवण्याचा आपला प्रयत्न आहे. त्यासाठी सरकार सर्व क्षेत्रांत काम करत आहे. आता प्रत्येक क्षेत्रात ‘मेड इन इंडिया’ची चर्चा होत आहे. देश स्वयंपूर्ण तंत्रज्ञानाने विकसित होत आहे.
Navy Day : नौदलातील सैनिकांची सेवा आणि बलीदान यांसाठी आम्ही सदैव कृतज्ञ राहू ! – पंतप्रधान मोदी
नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभेच्छा !
नवी देहली – नौदल दिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४ डिसेंबरच्या सकाळी भारतीय नौदलातील सर्व सैनिकांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. त्यांनी ‘एक्स’वरून दिलेल्या शुभेच्छा संदेशात म्हटले की, आपल्या समुद्राचे रक्षण करण्याप्रती भारतीय नौदलातील सैनिकांची वचनबद्धता, कर्तव्याप्रती त्यांची असलेली अतूट नि समर्पित वृत्ती आणि देशाप्रती प्रेमाचा दाखला आहे. प्रत्येक परिस्थितीत त्यांची भावना आणि संकल्प अतूट रहातो. त्यांची सेवा आणि बलीदान यांसाठी आम्ही सदैव कृतज्ञ आहोत.
On Navy Day, best wishes to all the personnel of the Indian Navy. Their commitment to safeguarding our seas is a testament to their unwavering dedication to duty and love for our nation. In every circumstance, their spirit and resolve remain unshakable. We are forever grateful…
— Narendra Modi (@narendramodi) December 4, 2023
मोदी पुढे म्हणाले की, आज महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग येथे नौदल दिनाच्या कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी मी उत्सुक आहे. या ठिकाणाचे छत्रपती शिवाजी महाराजांशी जवळचे नाते आहे. एक सशक्त नौदल उभारण्यासाठी महाराजांनी केलेले प्रयत्न सर्वश्रुत आहेत’, अशा शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ‘एक्स’वरून सिंधुदुर्ग जिल्ह्यात झालेल्या मुख्य कार्यक्रमाच्या ३ घंट्यांपूर्वी सर्वांना शुभेच्छा दिल्या.
छत्रपती शिवाजी महाराजांनी आरमाराचे महत्त्व ओळखून तसे आरमार उभे केले ! – राजनाथ सिंह, संरक्षणमंत्री
छत्रपती शिवाजी महाराजांचे जीवन सर्वांसाठी प्रेरणादायी आहे. त्यांनी दूरदृष्टीने शत्रूंपासून देशाचे रक्षण करण्यासाठी आरमाराचे महत्त्व ओळखले आणि तसे आरमार उभे केले. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेऊन वाटचाल करणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नौदलाचे महत्त्व लक्षात घेऊन त्याला विकासित करण्यावर भर दिला आहे. आता भारत आत्मनिर्भर होत आहे. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखाली जगात देशाची प्रतिष्ठा वाढली आहे.
जगाला भारताच्या समार्थ्याचे दर्शन घडवण्याची वेळ आली आहे ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
केंद्र सरकारच्या साहाय्याने महाराष्ट्राचा विकास होत आहे. नौदलाच्या ध्वजात छत्रपती शिवाजी महाराजांची राजमुद्रा समाविष्ट केली, यासाठी मी त्याचे अभिनंदन करतो. हा महाराष्ट्राचा अभिमान आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी आपल्याला आरमार दिले, सिंधुदुर्गसारखे अनेक जलदुर्ग दिले. अशाच सिंधुदुर्ग किल्ल्याच्या ठिकाणी आज देशाच्या बलशाली नौसेनेचे वैभव आपण पाहू शकत आहोत. छत्रपती शिवाजी महाराज अनेक गुणांनी युक्त होते. या गुणांचा जगात अभ्यास चालू आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे हिंदवी स्वराज्य आणि सुराज्य निर्माण करण्याचा ध्यास पंतप्रधान मोदी यांनी घेतला अहे. आत्मनिर्भर भारताचा वसा महाराजांनी दिला. तो वसा आपण पुढे नेत आहोत. आता जगाला भारताच्या समार्थ्याचे दर्शन घडवण्याची वेळ आली आहे. बलशाली भारत हीच आपली नवी ओळख आहे.