Ram Mandir Ayodhya : रामलला प्राणप्रतिष्ठा महोत्सवासाठी ४ सहस्र संत-महंतांना पाठवण्यात आले निमंत्रण !
अयोध्या (उत्तरप्रदेश) – रामलला प्राणप्रतिष्ठा महोत्सव २२ जानेवारी २०२४ या दिवशी होणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या शुभहस्ते मंदिराची प्राणप्रतिष्ठा होणार आहे. या मंगल सोहळ्याला उपस्थित रहाण्यासाठी ‘श्रीराम जन्मभूमी तीर्थक्षेत्र न्यासा’च्या वतीने देशभरातील ४ सहस्रांहून अधिक संत-महंतांना निमंत्रणे देण्यात येत आहेत.
१. या निमंत्रणपत्राचे छायाचित्र समोर आले असून त्यानुसार कार्यक्रमाच्या आरंभ अभिषेक आणि आरती याने होईल. २२ जानेवारी २०२४ या दिवशी अभिजीत मुहुर्तावर दुपारी १२ वाजून २० मिनिटांनी हा सोहळा होईल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प.पू. सरसंघचालक डॉ. मोहनजी भागवत, उत्तरप्रदेशच्या राज्यपाल आनंदीबेन पटेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि इतर विशेष अतिथी या सोहळ्याला उपस्थित रहाणार आहेत.
२. पत्रात पुढे म्हटले आहे की, तुम्हाला ठाऊक आहे की, प्रदीर्घ संघर्षानंतर श्री रामजन्मभूमी येथील मंदिराचे बांधकाम चालू आहे. या मंगलप्रसंगी आपण अयोध्येत उपस्थित राहून पवित्र घटनेचे साक्षीदार व्हावे आणि या महान ऐतिहासिक दिवसाची शोभा वाढवावी, अशी आमची प्रबळ इच्छा आहे. २१ जानेवारीपूर्वी अयोध्येला येण्याचे नियोजन करावे, अशी विनंती आहे. तुम्ही जितक्या लवकर अयोध्येत याल, तितकीच तुम्हाला अधिक सुविधा मिळेल. उशिरा पोचल्यास समस्यांना सामोरे जावे लागू शकते. २३ जानेवारी २०२४ नंतरच परत जाण्याचे नियोजन करावे.