Indian Navy Day 2023 : सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी सुवर्णक्षण !
मालवणमध्ये आज नौदलदिन सोहळा !
लष्करी सामर्थ्याचे प्रदर्शन आणि शिवछत्रपतींच्या पुतळ्याचे होणार अनावरण !
मालवण : भारतीय आरमाराचे जनक असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांनी बांधलेल्या सिंधुदुर्ग किल्ल्याच्या परिसरात तारकर्ली, मालवण येथे ४ डिसेंबर या दिवशी भारतीय नौदलाचा २३ वा नौदलदिन साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराज यांचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह नौदलाचे प्रमुख हरि कुमार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह केंद्र आणि राज्य सरकारमधील काही मंत्री, नौदलाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित रहाणार आहेत.
भारतीय नौदलाच्या इतिहासात प्रथमच नौदलदिन सोहळा नौदलाच्या तळापासून अन्य ठिकाणी साजरा होत आहे. याचा बहुमान सिंधुदुर्ग जिल्ह्याला मिळाला असून जिल्ह्यासाठी हा सोहळा सुवर्णक्षण ठरणार आहे. या सोहळ्यासाठी नौदल आणि जिल्हा प्रशासन यांनी जय्यत सिद्धता केली आहे. या सोहळ्याच्या निमित्ताने युद्धनौका, लढाऊ जहाजे, लष्करी विमाने आणि मरीन कमांडो सहभागी होणार आहेत.
राजकोट किल्ल्याकडे आणि तारकर्लीकडे जाणार्या रस्त्यांचे आणि शासकीय विश्रामगृहांचे नूतनीकरण करण्यात आले आहे. राजकोट किल्ल्याला पुन्हा एकदा गतवैभव प्राप्त झाले असून येथे भव्य प्रवेशद्वार, तटबंदी, बुरुज आणि मधोमध शिवछत्रपतींचा भव्य पुतळा उभारण्यात आला आहे. नौदलदिनानिमित्त सिंधुदुर्ग किल्ल्यासह राजकोट किल्ला आणि सिंधुदुर्ग जिल्हा यांचे नाव पुन्हा एकदा जागतिक नकाशावर झळकणार आहे.
हा सर्व सोहळा ‘याची देही, याची डोळा’, पहाण्याची संधी सिंधुदुर्गवासियांना प्राप्त झाली आहे !