रुग्णाईत व्यक्तीची सेवा साधना म्हणून कशी करावी ?
२ डिसेंबर या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण ‘रुग्णाईत व्यक्तीची शारीरिक आणि मानसिक स्तरावर कशी काळजी घ्यावी ?’, याविषयीची सूत्रे पाहिली. या लेखात आपण ‘रुग्णाची आध्यात्मिक स्तरावर घ्यायची काळजी आणि रुग्णसेवेतून साधना कशी होते ?’, ही सूत्रे जाणून घेऊया.
(भाग २)
या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/742532.html
२. रुग्णाला होणार्या त्रासांचे प्रकार आणि त्या अनुषंगाने त्यांची घ्यावयाची काळजी
२ इ. आध्यात्मिक
२ इ १. रुग्णाला आध्यात्मिक त्रास होत असल्यास त्याच्या नामजपादी उपायांकडे लक्ष देऊन त्याच्याकडून उपाय करून घ्यावेत ! : रुग्णाला आध्यात्मिक त्रास होत असल्यास त्याच्या नामजपादी उपायांकडे लक्ष देऊन त्याच्याकडून उपाय करून घ्यावे लागतात. त्या वेळी रुग्णाची चिडचिड झाल्यास आपण शांत राहून उदबत्ती लावणे, खोके लावणे, रुग्णाला शरिराच्या ज्या भागात त्रास होत असेल, त्या भागावर त्याच्याकडून न्यास करून घेणे’, असे उपाय करवून घ्यावेत. रुग्णाला अधिक त्रास होत असल्यास उत्तरदायी साधकांना तशी कल्पना देऊन रुग्णासाठी नामजपादी उपाय विचारावेत.
२ इ २. रुग्णाला प्रार्थनेची आठवण करून द्यावी आणि नामजप करायला सांगून नामाचे महत्त्व मनावर बिंबवण्यास साहाय्य करावे ! : रुग्णाईत व्यक्तीला वेळोवेळी प्रार्थनेची आठवण करून द्यावी. रुग्णाला प्रार्थना करणे शक्य नसल्यास आपण आधी प्रार्थना म्हणावी आणि त्याला आपल्या मागून प्रार्थना म्हणायला सांगावी. रुग्णाला थकवा किंवा दम लागत असल्यास त्याला नामजप किंवा प्रार्थना म्हणण्यासाठी बळजोरी करू नये. रुग्णाला मनात नामजप करायला सांगून नामाचे महत्त्व त्याच्या मनावर बिंबवण्यासाठी साहाय्य करू शकतो.
२ इ ३. ‘परात्पर गुरु डॉ. आठवले किंवा देव यांचा प्रसाद आहे’, असे सांगून रुग्णाला औषध द्यावे ! : कधी कधी रुग्णाला दिवसातून १० ते १२ किंवा त्यापेक्षाही अधिक गोळ्या घ्याव्या लागतात. त्या वेळी रुग्णाला ते नकोसे वाटते. तेव्हा त्याला प्रेमाने समजावून सांगावे. ‘परात्पर गुरु डॉक्टरांनी तुम्हाला हा प्रसाद पाठवला आहे. प्रसाद म्हणून एकेक गोळी घ्यायची आहे. ‘तुम्ही गोळी घेत आहात कि नाही ?’, हे सर्व देव पहात आहे’, असे सांगितल्याने रुग्णाला प्रोत्साहन मिळते आणि तो गोळ्या घेण्यास सिद्ध होतोे. रुग्णाला ‘आवडत्या देवाचा प्रसाद आहे’, असेही सांगू शकतो. आपला उद्देश ‘त्याने सहजतेने गोळ्या घेणे’, हा असायला हवा. देवाचे साहाय्य घेऊन प्रयत्न केल्यास गोळ्या देणारा आणि घेणारा, अशा दोघांनाही त्याचा लाभ होतो.
२ इ ४. एक ठराविक वेळ ठरवून ‘आपला सत्संग आहे’, असे रुग्णाला सांगावे आणि त्याच्याकडून साधनेविषयीच्या कृती करून घ्याव्यात ! : रुग्णाच्या जवळ बसल्यावर त्याला मायेतील काही सांगायचे असल्यास २ – ३ मिनिटांत सांगून नंतर अध्यात्माविषयी बोलावे. काही कालावधीनंतर मायेतील विषय आपोआपच बंद होऊन आध्यात्मिक विषय चालू रहातात. ‘आपला सत्संग आहे’, असे सांगून प्रथम प्रार्थना आणि जयघोष करावा. या वेळी कोणताही एखादा श्लोक म्हणू शकतो. नंतर रुग्णाला सनातन संस्थेच्या ग्रंथातील, तसेच दैनिक ‘सनातन प्रभात’मधील लिखाण वाचून दाखवावे. ‘भाव जागृत होईल’, अशी गुरूंची भजने लावावीत. ‘एखाद्या साधकाने आजारावर कशी मात केली ?’, याविषयीचे लिखाण आवर्जून वाचून दाखवावे. ‘मोठ्या आवाजात नामजप लावणे, रुग्णाकडून नामजप म्हणून घेणे, जेवण भरवतांना गुरुपरंपरेचे नाव घेणे’ इत्यादी कृती कराव्यात. ‘सनातनच्या साधकांनी जलद गतीने साधना करून संतपद गाठले. आपणही तसे प्रयत्न करूया’, असे सांगून रुग्णाच्या मनाला उभारी देण्याचा प्रयत्न करावा. यामध्ये रुग्ण आणि सेवा करणारी व्यक्ती, अशा दोघांनाही त्याचा लाभ होऊन त्यांचे देवाशी अनुसंधान वाढल्याचे लक्षात येते.
२ इ ५. खोलीत रुग्णाला दिसेल असे देवाचे चित्र ठेवावे ! : खोलीत रुग्णाला दिसेल असे परात्पर गुरु डॉक्टरांचे छायाचित्र किंवा तो ज्या देवतेची उपासना करतो, त्या देवतेचे चित्र ठेवावे. रुग्णाला देवाचे चित्र सतत समोर दिसल्याने त्याचे देवाशी अनुसंधान वाढायला साहाय्य होईल.
२ इ ६. रुग्ण एखादा नामजप करत असल्यास तो नामजप भ्रमणभाषवर लावून ठेवू शकतो. त्यामुळे खोलीतील वातावरण सात्त्विक रहाण्यास साहाय्य होईल.
३. रुग्णाच्या खोलीतील त्याचा पलंग आणि अन्य साहित्य कसे ठेवावे ?
अ. रुग्णाच्या खोलीतील स्वच्छता व्यवस्थित करावी लागते. प्रतिदिन रुग्णाच्या गादीवरील चादर पालटावी. ‘गादी आणि चादर मल-मूत्र विसर्जनामुळे खराब होऊ नये’, यासाठी गादीवर मेणकापड घालावे. गादीवरील चादर अगदी मऊ असावी. रुग्ण सतत झोपून असल्याने जाड किंवा नक्षीकाम केलेली चादर वापरल्यास त्याला त्रास होऊ शकतो.
आ. रुग्णाच्या जवळ एक लहानसा रुमाल ठेवावा.
इ. एखादा रुग्ण ‘वॉकर’ घेऊन चालत असल्यास ‘वॉकर’ जिथे हातांनी धरतो, तिथे लहान मऊ ‘नॅपकीन’ दोन्ही बाजूंना लावून ठेवावेत; म्हणजे सतत तिथे हात धरल्यामुळे रुग्णाच्या हातांना त्रास होणार नाही.
ई. रुग्णाजवळ वाटी-चमचा किंवा एखादी घंटा (बेल) ठेवावी. त्यामुळे त्याला कुणाला बोलवण्यात अडचण येणार नाही.
उ. रुग्णाला प्रतिदिन लागणारे साहित्य त्याच्या जवळच ठेवावे, उदा. पाणी पिण्यासाठी तांब्या आणि भांडे, उपनेत्र (चष्मा), दैनिक ‘सनातन प्रभात’, रुग्ण एखादे अन्य नियतकालिक वाचत असल्यास ते नियतकालिक इत्यादी.
४. कुटुंबातील व्यक्तीच्या आजारपणात स्वतःचे स्वभावदोष आणि अहं यांच्या अडथळ्यांवर मात कशी करावी ?
४ अ. शारीरिक दुखणे आणि आध्यात्मिक त्रास, यांमुळे रुग्णाची पुष्कळ चिडचीड होऊन त्याने एखादी अयोग्य कृती करणे अन् त्यामुळे सेवा करणार्या व्यक्तीची चिडचिड होणे : शारीरिक दुखणे आणि आध्यात्मिक त्रास यांमुळे काही वेळा रुग्ण व्यक्तीची पुष्कळ चिडचिड होते. त्यामुळे त्या व्यक्ती काही अयोग्य कृती करतात. उदा. अंगावरील चादर काढून टाकणे, उशी खाली फेकून देणे, सतत काहीतरी मागणे. यांमुळे रुग्णाची सेवा करणार्या व्यक्तीला कंटाळा येतो किंवा नकोसे वाटते आणि तिला रुग्णाचा राग येऊन तिचीही चिडचिड होते. ‘रुग्ण व्यक्तीने आपले ऐकावे’, असे आपल्याला वाटते; परंतु त्या वेळी रुग्णही ऐकण्याच्या मनस्थितीत नसतो.
४ आ. ‘ही रुग्णसेवा ईश्वराने दिली असून ती गुरुसेवा म्हणून भावपूर्ण केल्यासच त्यातून साधना होणार आहे’, हा दृष्टीकोन ठेवावा ! : त्या वेळी सेवा करणार्या व्यक्तीने ‘ही रुग्णसेवा ईश्वराने मला दिली आहे. ती शांतपणे आणि स्थिर राहून केल्यासच मला तिचा लाभ होणार आहे. ही सेवा न कंटाळता गुरुसेवा म्हणून भावपूर्ण केल्यासच माझी त्यातून साधना होणार आहे’, असा दृष्टीकोन ठेवावा. राग आल्यास किंवा चिडचिड झाल्यास त्यावर स्वयंसूचना द्यावी. असे प्रयत्न केल्यामुळे रुग्ण दीर्घ काळ झोपून असला, तरी कुटुंबातील कुणाची चिडचिड न होता वातावरण आनंदी रहाण्यास साहाय्य होते.
५. गुरुसेवा म्हणून रुग्णसेवा केल्याने होणारे लाभ
अ. रुग्णाईत व्यक्तीची सेवा गुरुसेवा म्हणून केल्यास त्याचा लाभ घरातील सर्वांनाच आणि त्या रुग्णालाही होतो. ‘सर्व जण माझे प्रेमाने करत आहेत’, या विचाराने रुग्णाला आधार वाटतो.
आ. आपण नामजप करत सेवा केल्यास रुग्णही नामजप करण्याचा प्रयत्न करतो. त्यामुळे दोघांचेही अनुसंधान वाढून ईश्वरावरील श्रद्धा दृढ होण्यास साहाय्य होते. अशा रितीने रुग्णाईत व्यक्तीची सेवा केल्यास आपल्याला देव आणि गुरु यांचे मन जिंकता येते.
इ. रुग्णाला काही हवे असल्यास आणि आपण रुग्णाजवळ नसल्यास देवच आपल्याला त्याला काही हवे असल्याची जाणीव करून देतो. देवाने साहाय्य केल्याची आपल्याला अनुभूती घेता येते. यातून मन सकारात्मक होऊन आपल्याला पुष्कळ आनंद मिळतो आणि आपण देव अन् गुरु यांच्या चरणी नतमस्तक होतो.
ई. घरात बाहेरची कुणीही व्यक्ती आली, तरी तिला ‘घरात कुणी इतके रुग्णाईत आहे’, असे वाटत नाही. घरात चांगली स्पंदने जाणवतात. घरात दाब न जाणवता हलकेपणा जाणवतो. घरातील व्यक्तींवरही अनिष्ट शक्तीचे आवरण जाणवत नाही. सर्व जण सकारात्मक असल्याने घरात गेल्यावर चैतन्य अनुभवता येते.
‘परात्पर गुरु डॉक्टर, ‘या लेखातून रुग्णाईत व्यक्ती आणि तिची काळजी घेणारे तिचे कुटुंबीय किंवा साधक या सर्वांना शक्ती अन् प्रेरणा मिळू दे. ‘या सेवेतही आनंद असतो’, हे सर्वांना अनुभवता येऊ दे. त्यांच्याकडून रुग्णसेवा भावपूर्ण अन् परिपूर्ण होऊ दे’, अशी आपल्या चरणी शरणागतीने आणि आर्ततेने प्रार्थना करते. आपणच सर्व सुचवलेत आणि लिहूनही घेतलेत. इदं न मम । आपल्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
(समाप्त)
– श्रीमती मनीषा गाडगीळ (आध्यात्मिक पातळी ६७ टक्के, वय ६१ वर्षे), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.