बीड येथील आमदार प्रकाश सोळंके यांच्या रुग्णालयाचा परवाना कायमस्वरूपी रहित !
रत्नसुंदर मेमोरियल रुग्णालय अस्तित्वातच नसल्याचे चौकशीत आले समोर !
बीड – जिल्ह्यातील माजलगाव येथील अजित पवार गटाचे आमदार प्रकाश सोळंके यांच्या ‘रत्नसुंदर मेमोरियल रुग्णालया’चा परवाना कायमस्वरूपी रहित करण्यात आला आहे. हे रुग्णालय अस्तित्वातच नसल्याचे चौकशीत लक्षात आले आहे. प्रकाश सोळंके यांच्या पत्नी या रुग्णालयाच्या अध्यक्षपदावर आहेत.
माजलगाव येथील बायपास रस्त्यावर रत्नसुंदर मेमोरियल रुग्णालयाला वर्ष २०२१ मध्ये परवाना देण्यात आला होता. १०० खाटांचे हे रुग्णालय आहे; पण वास्तविक पहाता या ठिकाणी कोणत्याही प्रकारचे रुग्णालय अस्तित्वाच नाही, अशी तक्रार सुभाष नाकलगाकर यांनी बीड जिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. अशोक बडे यांच्याकडे केली. त्यानंतरच्या केलेल्या चौकशीत रुग्णालय अस्तित्वात नाही, हे लक्षात आल्यामुळे परवाना रहित करण्यात आला.
माजलगाव विकास प्रतिष्ठानच्या माध्यमातून शहरातील सर्वे क्रमांक ३७२ ही जागा वादग्रस्त असूनही त्या ठिकाणी या रुग्णालयाचे बांधकाम करण्यात आले. या इमारतीला माजलगाव नगरपालिकेचा बांधकाम परवाना हा ६ जानेवारी २०२३ चा आहे, तसेच बॉम्बे नर्सिंग ॲक्टनुसार २१ जून २०२१ या दिवशी १०० खाटांच्या या रुग्णालयाला परवाना देण्यात आला होता; पण या इमारतीचे बांधकाम अपूर्ण असल्याची गोष्ट या वेळी निदर्शनास आली आहे.