जनतेने नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांना पाठिंबा दिला ! – एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री
मुंबई – देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा करिश्मा आहे. देशासाठी भाजपने केलेले काम आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांचे नियोजन यांमुळे भाजपप्रणीत ‘एन्.डी.ए.’ला ३ राज्यांत विधानसभेच्या निवडणुकीत घवघवीत यश मिळाले आहे. जनतेने मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून त्यांना पाठिंबा दिला. आतापर्यंत ‘घर घर मोदी’, असे म्हटले जात होते; पण यापुढे ‘मन मन मे मोदी’, अशी घोषणा द्यावी लागेल, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकारांशी बोलतांना दिली.
ते पुढे म्हणाले की,
१. ५ राज्यांच्या निवडणूक प्रचारात पंतप्रधान मोदी यांच्यावर बरीच टीका केली गेली; पण आता सत्य समोर आले आहे.
२. इंडिया आघाडी द्वेष आणि मत्सर यांनी भरलेली आहे. मोदी यांच्यावर नको नको ते आरोप लावले, तरी जनतेने मतपेटीतून इंडिया आघाडीला उत्तर दिले आहे.
३. परदेशात जाऊन ‘भारत तोडो’ची भाषा काँग्रेसचे नेते राहुल गांधी वापरत होते. लोकांनी त्यांना धडा शिकवला असून त्यांची जागा दाखवून दिली.
४. राजस्थानमध्ये राहुल गांधी यांनी ‘१० दिवसांत शेतकर्यांची कर्जमाफी करू’, असे आश्वासन देऊन ते पूर्ण केलेले नाही, असे मला तेथील शेतकरी प्रचाराच्या वेळी सांगत होते. त्याचप्रकारे कर्नाटकातही काँग्रेसच्या नेत्यांनी मोठमोठी आश्वासने देऊन सत्ता तर मिळवली; पण ती पूर्ण करण्यासाठी त्यांच्याकडे निधी नसल्याचे आता ते सांगत आहेत.