५१ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली खांदा कॉलनी (पनवेल, जिल्हा रायगड) येथील कु. शरण्या मयूर उथळे (वय १ वर्ष ८ मास) !
उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली दैवी (सात्त्विक) बालके म्हणजे पुढे हिंदु राष्ट्र (सनातन धर्म राज्य) चालवणारी पिढी ! कु. शरण्या उथळे ही या पिढीतील एक आहे !
‘सनातनमध्ये आलेल्या दैवी बालकांमुळे ‘मी साधकांना तयार केले’, असा अहंभाव माझ्यात निर्माण झाला नाही.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
पालकांनो, हे लक्षात घ्या !‘तुमच्या मुलात अशा तर्हेची वैशिष्ट्ये असली, तर ‘ते उच्च लोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले आहे’, हे लक्षात घेऊन ते मायेत अडकणार नाही, उलट त्याच्यावर साधनेला पोषक होतील, असे संस्कार करा. त्यामुळे त्याच्या जन्माचे कल्याण होईल आणि तुमचीही साधना होईल.’ – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले |
खांदा कॉलनी (पनवेल, जिल्हा रायगड) येथील चि. शरण्या मयूर उथळे हिच्या कुटुंबियांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये खाली दिली आहेत.
१. गर्भारपणात
१ अ. ‘गर्भधारणा झाल्यानंतर ९ मास माझ्या शरिरामध्ये एक वेगळी शक्ती कार्यरत आहे’, असे मला जाणवत होते.
१ आ. मी ‘गर्भाला रामनाथी आश्रमात घेऊन जाणे आणि गुरुदेवांच्या चरणांजवळ ठेवणे’, असे भावजागृतीचे प्रयोग करत असे.
१ इ. नामजप, भजने आणि क्षात्रगीते ऐकतांना गर्भाची हालचाल होत असल्याचे जाणवणे आणि ‘जिवामध्ये क्षात्रवृत्ती अधिक आहे’, असे जाणवणे : आरंभी नामजप करतांना, तसेच भक्तीसत्संग आणि प.पू. भक्तराज महाराज यांची भजने ऐकतांना मला पोटात गर्भाची हालचाल जाणवत असे. काही दिवसांनी ‘धर्मसभेचे चलचित्र (रेकॉर्डिंग) पहातांना, तसेच पोवाडे, हनुमान चालीसा आणि क्षात्रगीते ऐकतांना गर्भाची हालचाल अधिक होत आहे’, असे मला जाणवले. तेव्हा ‘गर्भातील जिवामध्ये क्षात्रवृत्ती अधिक आहे’, असे मला जाणवले.
१ ई. बालसत्संगाच्या वेळी ‘गर्भाची हालचाल होत आहे’, असे जाणवणे : माझी भाची कु. प्रार्थना महेश पाठक (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) काही दिवस आमच्या घरी रहायला आली होती. ती बालसाधकांचा सत्संग घेत असे. सत्संग चालू झाल्यानंतर गर्भ पुष्कळ जोरजोरात हालचाल करत असे. त्यामुळे कु. प्रार्थनाचा सत्संग होईपर्यंत मी तिच्या बाजूला जाऊन बसले. त्यानंतर गर्भाची हालचाल उणावली. त्या वेळी ‘बाळ सत्संग ऐकत आहे’, असे मला वाटले. ही अनुभूती प्रार्थना आमच्या घरी असेपर्यंत, म्हणजेच सलग ४ दिवस येत होती.’
१ उ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी दिलेला प्रसाद ग्रहण केल्यावर तिरुपती बालाजीचा प्रसाद ग्रहण करण्याची इच्छा पूर्ण झाल्याचे जाणवणे : एकदा मला तिरुपती बालाजीचा प्रसाद ग्रहण करण्याची तीव्र इच्छा झाली; परंतु तो मला मिळणे शक्य नव्हते. ही इच्छा पुष्कळ दिवस माझ्या मनामध्ये होती. त्याच वेळी माझी मोठी बहीण पू. (सौ.) मनीषा पाठक देवद आश्रमात आली होती. तिने मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी तिच्यासाठी दिलेला प्रसाद दिला. तो प्रसाद ग्रहण केल्यावर ‘माझी तिरुपती बालाजीचा प्रसाद ग्रहण करण्याची इच्छा पूर्ण झाली’, असे मला वाटले. तेव्हा ‘गर्भाला विष्णुतत्त्व हवे होते आणि ते त्याला प्रसादाच्या माध्यमातून मिळाले’, असे मला जाणवले.
१ ऊ. प.पू. दास महाराज यांची पुष्कळ आठवण येऊन दास्यभावात रहाण्याची इच्छा होणे : गर्भारपणात भावजागृतीचा प्रयोग करतांना ‘अखंड दास्यभावात रहावे’, असे मला वाटत असे. त्या वेळी प.पू. दास महाराजांची पुष्कळ आठवण येऊन माझी भावजागृती होत असे आणि ‘पोटातील बाळ हे प.पू. दास महाराजांप्रमाणे अखंड दास्यभावात असावे’, असे मला वाटत असे.
२. जन्मानंतर
२ अ. ‘जन्मलेले बाळ हे श्री भवानीदेवीचे रूप आहे’, असे वाटणे : ‘मला मुलगी झाली आहे’, हे कळल्यावर रामनाथी आश्रमातील श्री भवानीदेवीची मूर्ती माझ्या डोळ्यांसमोर आली. ‘जन्मलेले बाळ हे श्री भवानीदेवीचे रूप आहे’, असे मला वाटले. त्या दिवशी प्रत्यक्षात तिथीनुसार श्री भवानीदेवीचा उत्पत्ती दिन होता.
२ आ. गर्भारपणात शरणागतभावाने राहिल्यामुळे बाळाचे नाव ‘शरण्या’ असे ठेवणे : ‘बाळाचे नाव काय ठेवावे ?’, याविषयी माझी बहीण पू. (सौ.) मनीषा महेश पाठक हिला विचारल्यानंतर तिने आणि सद्गुरु स्वातीताई (सद्गुरु स्वाती खाडये यांनी) यांनी बाळाचे नाव ‘शरण्या’ असे ठेवले. तेव्हा ‘मला गर्भारपणात शरणागतभावात रहावे’, असे वाटत होते’, याचे स्मरण झाले.
३. वय – जन्म ते ३ मास
३ अ. क्षात्रगीत म्हटल्यानंतर बाळ शांत होणे : शरण्याला ३ मासांपर्यंत पोटाचे त्रास व्हायचे. त्यामुळे ती सारखी रडत असे. तेव्हा ‘आदिशक्ती तू’ हे स्फूर्तीगीत म्हटल्यानंतर ती लगेच शांत होत असे. जन्मापासून आतापर्यंत प्रत्येक वेळी ती झोपतांना, तसेच रडत असतांना तिला शांत करण्यासाठी क्षात्रगीत म्हणावे लागते.
४. वय – ३ ते ६ मास
४ अ. देवाची ओढ
१. पोटदुखीमुळे शरण्या पुष्कळ रडत असे; परंतु पू. मनीषाताईने तिला मांडीवर घेऊन ‘श्रीराम जय राम जय जय राम ।’ हा नामजप केल्यावर ती लगेच झोपत असे.
२. जन्मापासूनच ती श्रीराम आणि प.पू. गुरुदेव यांच्या छायाचित्रांकडे पाहून हसत असे, तसेच ती ३ मासांची असल्यापासून प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राकडे पाहून खेळत असे.
३. शरण्या नेहमी श्रीकृष्णाचे चित्र हातात धरून झोपते.
४. खांदा कॉलनी, पनवेल येथील ‘खांदेश्वर’ हे जागृत देवस्थान आहे. आम्ही तिला आठवड्यातून एकदा खांदेश्वर मंदिरात नेतो. तेव्हा ती एकाग्रतेने शिवपिंडीकडे पहाते आणि तिच्या भाषेत काहीतरी बोलत असते. तेव्हा ‘ती अनुसंधानात आहे’, असे मला वाटते.
४ आ. अन्नप्राशन विधीसाठी पनवेल येथील सनातनच्या देवद आश्रमात नेले असता जाणवलेली सूत्रे
१. शरण्या ६ मासांची असतांना आम्ही तिला अन्नप्राशन विधीसाठी देवद आश्रमात नेले होते. तेव्हा पुष्कळ साधकांना पाहून ‘ती रडेल’, असे आम्हाला वाटले होते; परंतु ती सर्व साधकांकडे आनंदाने जात होती.
२. ती आश्रमातील प.पू. भक्तराज महाराज यांच्या छायाचित्राकडे आणि परात्पर गुरु पांडे महाराज यांच्या खोलीकडे सारखी झेप घेत होती. तिला तेथे घेऊन गेल्यावरच ती शांत झाली.
३. शरण्याला पोटाच्या त्रासामुळे बाहेरील दूध पचत नसे; परंतु देवद आश्रमात अन्नप्राशन विधी करतांना तिने खीर खाल्ल्यानंतर तिला कसलाही त्रास झाला नाही. त्यानंतर तिचे पोट दुखणे पुष्कळ प्रमाणात न्यून झाले.
५. वय – ७ ते ९ मास
५ अ. सद्गुरु स्वातीताई यांच्याकडे झेप घेणे : माझी बहीण पू. (सौ.) मनीषा पाठक, मेहुणे श्री. महेश पाठक (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) आणि कु. प्रार्थना पाठक (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के) हे आमच्या घरी आले होते. त्यांच्या समवेत सद्गुरु स्वातीताईही आल्या होत्या. इतर साधक, मी आणि शरण्याचे बाबा समोर असूनही शरण्या सद्गुरु ताईंकडे झेप घेत होती. प्रत्यक्षात तिने सद्गुरु ताईंना प्रथमच पाहिले होते. तेव्हा ‘तिला सात्त्विकता कळते’, असे मला वाटले.
५ आ. ती ‘सच्चिदानंद परब्रह्म जय गुरुदेव’ अशी घोषणा देतांना हात वर करते.
प.पू. गुरुमाऊली, ‘शरण्याच्या रूपात तुम्हीच आम्हाला तुमच्या चरणांचा प्रसाद दिला आहे’, याची जाणीव आमच्या अंतर्मनात अखंड असू द्या. गुरुदेवा, तिच्यावर संस्कार करण्यासाठी आम्ही खरंच असमर्थ आहोत. तुम्हीच तिच्यावर तुम्हाला अपेक्षित असे संस्कार करून घ्या आणि तिला देव, देश आणि धर्म यांचे रक्षण करण्यासाठी शक्ती, बुद्धी अन् बळ द्या, अशी तुमच्या चरणी प्रार्थना आहे.’
– सौ. मानसी मयूर उथळे, (शरण्याची आई), पनवेल. (९.३.२०२३) 0
गुरुदर्शनासाठी जीव होतो व्याकुळ ।मी गर्भारपणात भावप्रयोग करत असतांना मला पुढील कविता सुचली. मोहमाया सोडवेना, षड्रिपू वसती चित्ती माझ्या । दासी म्हणे देवा, कधी दाविसी रे चरण । गुरुचरित्राचा महिमा कसा वर्णू या मुखे । दासी म्हणे, गुरुधाम मम अखंड मनी वसावे । गुरुदर्शनासाठी जीव होतो व्याकुळ । निरपेक्ष प्रेमाचा झरा ज्याचे मनी । मना आवडे मायेतील सुख । दासी म्हणे, असो कितीही सामोरी दुःख । सावळे परब्रह्म उभे विटेवरी । तुळशीहार गळा विराजे आभूषणापरी । – सौ. मानसी मयूर उथळे, पनवेल, जिल्हा रायगड. (९.३.२०२३) |
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |