पुणे येथील श्री. दादासाहेब वळकुंदे (वय ६० वर्षे) यांचा साधनाप्रवास !

श्री. दादासाहेब वळकुंदे

१. साधनेत येण्यापूर्वी

‘मी अभियंता महाविद्यालयात (इंजिनीयरींग कॉलेजमध्ये) नोकरी करत होतो. तेव्हा माझ्या घरच्या भौगोलिक आणि कौटुंबिक परिस्थितीमुळे देवाची भक्ती करण्यासाठी वातावरण पूरक नव्हते.

२. सनातन संस्थेशी संपर्क

वर्ष २००० मध्ये आमच्या महाविद्यालयात ‘सनातन संस्थेचा’ गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम घेण्यासाठी अनुमतीपत्र दिले होते. त्या वेळी सनातन संस्थेच्या उत्तरदायी साधकाने मला ‘संध्याकाळी या कार्यक्रमाला थांबणार का ?’, असे विचारले. तेव्हा मी त्यांना ‘हो’, असे सांगितले. त्या वेळी ते उत्तरदायी साधक मला म्हणाले, ‘‘तुम्ही भाग्यवान आहात. तुम्हाला सेवेची संधी मिळत आहे.’’ मला त्या वेळी ‘सेवा’ म्हणजे काय ?’ ते कळले नव्हते. त्यांनी मला सनातन संस्थेचे कार्य आणि माहिती सांगितली. नंतर त्यांनी मला ‘नामसंकीर्तनयोग’ आणि ‘गुरुकृपायोगानुसार साधना’ हे दोन लघुग्रंथ दिले.

३. सनातन संस्थेने प्रकाशित केलेले लघुग्रंथ वाचून नामजप करू लागणे 

संध्याकाळी मी घरी गेलो. हात पाय धुतले आणि देवासमोर आसन घालून दोन्हीही पुस्तिका वाचून काढल्या. त्यामुळे ‘नामजप कसा करायचा ?’, ते मला समजले. नंतर मी कुलदेवी आणि दत्त यांचा प्रत्येकी १५ मिनिटे नामजप केला. त्यामुळे मला पुष्कळ आनंद मिळाला. तेव्हापासून मी पहाटे ४ वाजता उठून स्नान करून १ घंटा नामजप करू लागलो.

४. सत्संगाला जाणे

गुरुपौर्णिमेचा कार्यक्रम संपल्यानंतर ८ दिवसांनी सनातन संस्थेचे एक साधक मला भेटले. त्यांनी मला विचारले, ‘‘तुमच्या घरी यायचे आहे.’’ मी त्यांना लगेच ‘हो’, असे म्हटले. त्यानंतर ते आमच्याकडे अधून-मधून येत राहिले. ६ मासांनंतर त्यांनी आमच्या इमारतीत प्रवचन ठरवले. हा कार्यक्रम सर्वांना फार आवडला. तेव्हा आमच्या घराजवळ सत्संग चालू झाला. तेव्हापासून मी सत्संगाला जाऊ लागलो.

५. विविध सेवा करणे 

वर्ष २००० पासून इंद्रायणी नगर, भोसरी, पुणे येथे सत्संग चालू झाला. सत्संग घेणारे साधक जी सेवा सांगतील, ती मी करत गेलो. दैनिक ‘सनातन प्रभात’चे वर्गणीदार करणे, त्यांना दैनिक नेऊन देणे, गुरुपौर्णिमेसाठी अर्पण आणणे, विशेषांकांसाठी विज्ञापने (जाहिरात) आणणे, जिज्ञासूंना संपर्क करणे इत्यादी सेवा मी करत असे.

६. साधना करू लागल्यावर आलेल्या अनुभूती

अ. मी जसजसा नामजप, सत्संग आणि सेवा करू लागलो, तशी आमच्या घरातील कौटुंबिक भांडणे न्यून होत गेली.

आ. माझा चिडचिडेपणा अल्प झाला.

इ. माझे तंबाखूचे व्यसन न्यून झाले आणि आमच्या कुटुंबियांचे आजार उणावले.

७. स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवल्यावर झालेले लाभ 

माझ्यामध्ये ‘न्यूनगंड असणे, पूर्वग्रह असणे, अतिविचार करणे, भीती वाटणे, मोठ्याने बोलणे’, हे स्वभावदोष होते. वर्ष २००३ पासून गुरुदेवांच्या कृपेने मी स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया राबवत आहे. आता स्वभावदोषांचे प्रमाण पुष्कळ अल्प झाले आहे. त्यामुळे माझ्याकडून सेवा चांगली होऊ लागली आणि मला त्यातून आनंद मिळत गेला, तसेच मला समाजातील लोकांमध्ये मिसळता येऊ लागले.

८. ‘दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करणे 

या काळात मी ‘दैनिक ‘सनातन प्रभात’ हे कृष्णाचे पत्र आहे’, या भावाने प्रत्येक वाचकापर्यंत पोचवत होतो. इंद्रायणी नगर, भोसरी येथे मी प्रतिदिन सकाळी ७ वाजेपर्यंत दैनिक ‘सनातन प्रभात’चे वितरण करायचो. या काळात दैनिक आणि साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ यांचे वर्गणीदार वाढले. गुरुपौर्णिमेच्या विशेषांकांचे वितरण वाढले. ग्रंथ वितरण चांगले झाले आणि वाचकसंख्या वाढली. तेव्हा ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांचे वितरण करणे’, हीच माझी व्यष्टी आणि समष्टी साधना होती. नियतकालिकांतील प.पू. डॉक्टरांच्या छायाचित्रातून मला रामदर्शन व्हायचे. माझ्या साधनाप्रवासात सनातन प्रभातच्या नियतकालिकांचा फार मोलाचा वाटा आहे. ‘प.पू. गुरुदेव नियतकालिकांच्या माध्यमातून नेहमी माझ्या समवेत आहेत’, असे मला जाणवायचे.

९. सत्संग घेणे

गुरुदेवांच्या कृपेने मला सत्संग घेण्याची संधी मिळाली. त्यातून माझा न्यूनगंड निघून गेला. या सेवेच्या माध्यमातून प.पू. गुरुदेवांनी मला ‘जिज्ञासूंशी कसे बोलावे ?’, ते शिकवले.

आतापर्यंत २२ वर्षे प.पू. गुरुदेव माझ्याकडून साधना करवून घेत आहेत. त्यांनी माझ्यासारख्या क्षुद्र जिवाकडून भावपूर्ण सेवा करून घेतली. त्याबद्दल मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’

– श्री. दादासाहेब वळकुंदे (वय ६० वर्षे), पिंपरी, चिंचवड, पुणे. (२७.३.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक