‘दोषांचा प्रकोप’ हेच सर्व रोगांचे मूळ !

निरोगी जीवनासाठी आयुर्वेद : लेखांक २६४

१. नैसर्गिक शक्तींचा ‘प्रकोप’

वैद्य मेघराज पराडकर

वायू, सूर्य आणि चंद्र या निसर्गातील शक्ती जेव्हा एकोप्याने नांदत असतात, तेव्हा वातावरण प्रसन्न आणि आनंददायी असते; परंतु यांच्यातील एखादा आक्रमक होतो तेव्हा काय होते ? वारा जास्त वेगाने वाहू लागला, तर वादळ येते. सूर्य जास्त तळपू लागला, तर दुष्काळ पडतो. चंद्राची शीतलता जास्त झाली, तर जीव गोठवून टाकणारी थंडी पडते. त्याही पुढे जाऊन एकाच वेळी दोघे किंवा तिघेही आक्रमक झाले, तर महाकाय नैसर्गिक आपत्ती येते. (असे घडते तेव्हा ‘देवाचा ‘कोप’ झाला’, असे म्हटलेले तुम्ही कधीतरी ऐकले असेल. पुढे ‘प्रकोप’ समजून घेण्यास याचा लाभ होईल.)

२. दोषांचा प्रकोप

शरिराच्या संदर्भातही अगदी अस्सेच असते. वात, पित्त आणि कफ शरिरात गुण्यागोविंदाने नांदतात, तोपर्यंत आरोग्य असते. यांतील एखादा आक्रमक झाला, तर रोग चालू होतात. एका वेळी जेवढे जास्त घटक आक्रमक होतील, तेवढे रोग बरे करण्यास कठीण होऊन जाते. ‘दोष (वात, पित्त आणि कफ) आक्रमक होणे’ यालाच म्हणतात ‘प्रकोप’ ! ‘कोप’ म्हणजे ‘राग’. ‘प्र’ म्हणजे ‘प्रकर्षाने’, म्हणजे ‘विशेष करून’. त्रिदोष आपल्यावर विशेष करून रागावले, तर त्याला म्हणायचे ‘दोषांचा प्रकोप’. हेच सर्व रोगांचे मूळ असते.

– वैद्य मेघराज माधव पराडकर, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१०.११.२०२३)

लेखमालिकेतील सर्व लेख एकत्र वाचण्यासाठी मार्गिका : bit.ly/ayusanatan