रत्नागिरी जिल्ह्यातील २७९ गावे ‘हर घर जल’ गाव म्हणून घोषित
केंद्रशासनाच्या ‘जलजीवन मिशन’ला प्रारंभ !
रत्नागिरी – ‘जलजीवन मिशन’च्या अंतर्गत प्रत्येक नागरिकाला शुद्ध पिण्याचे पाणी मिळावे, यासाठी ‘हर घर जल योजना’ राबवण्यात येत आहे. या योजनेच्या माध्यमातून जिल्ह्यातील ३ लाख ३२ सहस्र ६९ कुटुंबांना नळजोडणी देण्यात आली आहे. त्यामुळे ग्रामीण भागांतील महिलांची उन्हाळ्यात पाण्यासाठी होणारी वणवण आता थांबणार आहे. जिल्ह्यातील २७९ गावे ‘हर घर जल’ गाव म्हणून घोषित करण्यात आली आहेत.
प्रत्येक कुटुंबाला घरामध्ये नळाद्वारे नियमित, शुद्ध आणि ५५ लिटर प्रतिमाणसी पाणी उपलब्ध करण्यासाठी केंद्रशासनाने ‘जलजीवन मिशन’चा प्रारंभ केला आहे. या अभियानांतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक गावातील १०० टक्के कुटुंबांना वर्ष २०२४ पर्यंत नळजोडणी देऊन शाश्वत पाणीपुरवठा करण्यासह गावातील सर्व शाळा, अंगणवाडी, संस्था, सार्वजनिक ठिकाणी यांना नळाद्वारे पाणीपुरवठा करावयाचा आहे. या निकषानुसार पाणीपुरवठा करण्यात येणार्या गावांना शासनाच्या निर्देशानुसार ‘हर घर जल’ गाव म्हणून घोषित करण्यात येणार आहे. त्यानुसार जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागांतर्गत ‘जलजीवन मिशन’च्या माध्यमातून जिल्ह्यातील गावांमध्ये पाणीपुरवठा योजनांचे काम चालू करण्यात आले आहे. हे काम ७३.८५ टक्के पूर्ण झाले आहे.
जिल्ह्यातील १ सहस्र ३४३ गावांतील ४ लाख ४९ सहस्र ६६७ कुटुंबांना ‘हर घर जल’ योजनेतून नळजोडणी देण्याचे उद्दिष्ट समोर ठेवण्यात आले आहे. त्यापैकी आतापर्यंत ९७५ गावांतील पाणीयोजनांची कामे चालू आहेत. उर्वरित १ लाख १७ सहस्र ५९८ कुटुंबांना मार्च २०२४ च्या शेवटी नळजोडणी देण्यात येणार आहे. जिल्ह्यात प्रतिवर्षी टंचाईग्रस्तांना टँकरने पाणीपुरवठा करण्यावर लाखो रुपये खर्च करण्यात येतात. आता ‘हर घर जल’ योजनेअंतर्गत जिल्ह्यातील प्रत्येक कुटुंबाला नळजोडणी देण्यात येणार आहे.