वर्ष २०२४ मध्ये भाजप हॅटट्रिक करील ! – भाजपचे माजी आमदार बाळ माने
रत्नागिरी – मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थान या तीन राज्यांची विधानसभेची उपांत्य फेरी जिंकत भाजपने बाजी मारली आहे. आता लोकसभा महाविजय २०२४ ची अंतिम फेरी नक्कीच जिंकून भाजप हॅटट्रिक (सलग तिसर्यांदा केंद्रात भाजपचे सरकार स्थापन होईल) करील आणि पंतप्रधानपदी नरेंद्र मोदी शपथ घेतील. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी भाजपचे कोकणातील सर्व कार्यकर्ते सज्ज झाले आहेत. गेले दोन महिने रत्नागिरी मतदारसंघात ‘संपर्क अभियान’ राबवण्यात येत आहे. त्याला रत्नागिरीकरांचा उदंड प्रतिसाद मिळत आहे, असे वक्तव्य भाजपचे रत्नागिरी विधानसभा क्षेत्राप्रमुख बाळ माने यांनी केले.
श्री. माने पुढे म्हणाले की, तीनही राज्यांतील निवडणूक भाजपने परिश्रमाने जिंकली आहे. महिला आरक्षण, युवा, गरिबांसाठी योजना आदींमुळे भाजपला या राज्यांत उत्तुंग यश मिळाले आहे. प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रशेखर बावनकुळे, विनोद तावडे, खासदार नारायण राणे, नीलेश राणे, मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली कोकणातील जागा जिंकू, असा विश्वास आहे.