काळानुरूप अपेक्षित अशी प्रसिद्धीमाध्यमे वापरून मंदिरांनी त्यांचा विषय समाजापर्यंत पोचवला पाहिजे ! – श्री. नीलेश खरे, संपादक ‘झी २४ तास’
ओझर, ३ डिसेंबर (वार्ता.) – अधिकाधिक लोकापर्यंत पोचण्यासाठी आम्ही ‘जत्रा, यात्रा यांची वृत्ते वाहिनीवर कशी प्रसारित करता येतील ?’, याचा विचार करून त्याचे वृत्त देण्याचा प्रयत्न केला. उत्सवरूपी अनुष्ठानांच्या माध्यमातून अनेक लोक जोडले जातात. सनातन धर्माचा विचार जर सर्वांपर्यंत पोचायचा असेल, तर ते प्रसिद्धीमाध्यमांद्वारे अधिक सुलभ होईल. आताच्या काळात जी माध्यमे तरुण पिढीला आकर्षित करू शकतात, त्यांचा वापर आपण केला पाहिजे. त्यामुळे काळानुरूप अपेक्षित अशी प्रसिद्धीमाध्यमे वापरून मंदिरांनी त्यांचा विषय समाजापर्यंत पोचवला पाहिजे, असे आवाहन ‘झी २४ तास’चे संपादक श्री. नीलेश खरे यांनी केले. ते ‘मंदिर आणि मिडिया मॅनेजमेंट’ या विषयावर २ डिसेंबरला दुपारच्या सत्रात उपस्थितांना मार्गदर्शन करतांना बोलत होते.
श्री. नीलेश खरे पुढे म्हणाले की,
१. मंदिर संस्था किंवा कार्यकर्ते यांच्या माध्यमातून ३ मिनिटांपर्यंतचे एक चलचित्र बनवून जर ते दूरचित्रवाणी माध्यमांपर्यंत पोचवले, तर जनजागृतीसाठी लाभ होऊ शकतो.
२. प्रसिद्धीमाध्यमांचे प्रतिनिधी तुमच्यापर्यंत पोचत नसतील, तर तुम्ही प्रतिनिधीपर्यंत जा; कारण बातमीची आवश्यकता ही प्रत्येकाला आहे. वर्तमानपत्रांमध्ये जागेची मर्यादा असते; मात्र ‘स्पीड न्यूज’च्या (वेगवान बातम्या देण्याच्या) माध्यमातून आपण अल्प कालावधीत अधिकाधिक लोकांपर्यंत विषय पोचवू शकतो. विश्वस्त मंडळातील वाद, भूमीचे वाद, देणगीतील घोटाळा अशा विषयांची प्रसिद्धीमाध्यमांमध्ये मोठी वृत्त दिली जातात. याउलट आपणही आपल्याकडे होणार्या उपक्रमांची वृत्ते पोचवण्याचे कार्य केले पाहिजे.
त्यासाठी संस्थेतील कोणताही एक प्रतिनिधी किंवा कार्यकर्ता जो अशा पद्धतीने लिखाण अथवा ‘व्हिडिओ’ सहज उपलब्ध करून देऊ शकेल, याची व्यवस्था करावी.
३. सनातन धर्माचा, हिंदु धर्माचा विचार जगासमोर पोचवणे आज आवश्यक आहे. ‘झी मीडिया’च्या माध्यमातून आम्ही भारतीयत्वाचा, हिंदुत्वाचा विचार हा जगातील लोकांपर्यंत पोचवण्याचा विचार केला आहे.
मूर्तीत चूक राहिली असल्यास, ती मंदिरात कधीही स्थापित करू नये ! – श्री. प्रमोद कांबळे, उपाध्यक्ष आणि शिल्पकार, संस्कार भारती, महाराष्ट्र
व्यक्तीचे मुख हे तिच्या तळहाताएवढेच असते. मूर्ती घडवतांना हे सूत्र शिल्पकाराने ध्यानात घ्यायला हवे. चेहर्याच्या साडेसात पट शरीराची उंची असते. मूर्ती बनवतांना डोळ्यांतील अंतर अनेक वेळा अल्प-अधिक होते. मूर्तीचे कान, नाक, डोळे हेही एकाच रेषेमध्ये असावेत. मूर्ती अचूक बनवण्यासाठी शिल्पकार एकाग्र असणे आवश्यक आहे. या गोष्टी लक्षात घेतल्यास मूर्ती बनवण्यातील त्रुटी अल्प होतील. कलाकृती साकार करतांना कलाकाराने एकाग्र व्हायला हवे. सध्याचे कारागीर पुरेसे शिक्षित नसल्याने अनेकदा मंदिरांमध्ये पाश्चात्य शैलीतील रचना वापरली जाते. मूर्ती अनेक पिढ्यांना आशीर्वाद देण्याचे कार्य करत असल्याने ती बनवतांना काही चूक राहिली असल्यास अशी मूर्ती मंदिरामध्ये कधीही स्थापित करू नये.