राजस्थान आणि छत्तीसगड राज्यांमध्ये काँग्रेसचा पराभव !
|
नवी देहली – देशातील ४ राज्यांत झालेल्या विधानसभांच्या निवडणुकांमध्ये काँग्रेसचा राजस्थान आणि छत्तीसगड या २ राज्यांत पराभव होऊन त्याला सत्ताच्युत व्हावे लागले असून तेथे भाजपने विजय मिळवला आहे. त्याच वेळी तेलंगाणा येथे काँग्रेसला विजय मिळाला असून सत्ताधारी भारत राष्ट्र समितीचा पराभव झाला आहे. मध्यप्रदेशमध्ये सत्ताधारी भाजपला सत्ता राखण्यात यश मिळाले आहे. मिझोराम येथे ४ डिसेंबर या दिवशी मतमोजणी होणार आहे.
राजस्थानमध्ये काँग्रेसचा राजकीयदृष्ट्या ‘सर तन से जुदा’ !
(‘सर तन से जुदा’ म्हणजे शिर धडापासून वेगळे करणे)
‘राजस्थानमध्ये पुन्हा काँग्रेसची सत्ता येणार’ अशा प्रकारचे मतदानोत्तर चाचण्यांमध्ये (‘एक्झीट पोल’मध्ये) सांगण्यात येत होते; मात्र प्रत्यक्षात मतमोजणीनंतर राजस्थानमध्ये काँग्रेसचा पराभव होऊन भाजप सत्तेवर येत असल्याचे दिसून आले. राजस्थानमध्ये प्रत्येक ५ वर्षांनंतर सत्तेत पालट होत असल्याची परंपरा या खेपेलाही कायम राहिल्याचे दिसून आले आहे. यातून कोणताही एक पक्ष जनतेच्या मनाप्रमाणे आणि अपेक्षेप्रमाणे कारभार करत नसल्याचे दिसून येत आहे. राज्यात भाजप आणि काँग्रेस यांना तिसरा सक्षम पर्याय असता, तर कदाचित् तेथील जनतेने त्यालाही संधी दिली असती, असेच निदर्शनास येते. दुसरीकडे काँग्रेसमध्ये मुख्यमंत्री अशोक गेहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील मुख्यमंत्रीपदावरून चालू असलेल्या भांडणाचा अन् जिहाद्यांनी कन्हैयालाल यांचा गळा चिरून केलेल्या हत्येचाही निवडणुकीत काँग्रेसला तोटा झाल्याची चर्चा आहे. राजस्थानमध्ये मुख्यमंत्री म्हणून वसुंधरा राजे आणि दीया कुमारी यांच्या नावाची चर्चा चालू झाली आहे.
मध्यप्रदेशमध्ये ‘लाडली बहना’ योजनेमुळे भाजपला लाभ मिळाल्याचा दावा !
मध्यप्रदेशमध्ये मागील विधानसभेत सत्ताधारी भाजपचा पराभव होऊन येथे काँग्रेसचे सरकार स्थापन करण्यात आले होते; मात्र दीड वर्षानंतर येथील आमदारांनी बंडखोरी करून भाजपला पाठिंबा दिल्याने पुन्हा येथे भाजचे सरकार स्थापन झाले होते. येथे भाजपला पुन्हा सरकार स्थापन करता येणार नाही, असे म्हटले जात असतांना भाजपने पंतप्रधान मोदी यांच्या चेहर्यावर येथील निवडणूक लढवली. पंतप्रधान मोदी यांनीही स्वतःच्या नावावर येथे मते मागितली. भाजपने या वेळी मुख्यमंत्री म्हणून पुन्हा शिवराजसिंह चौहान यांना घोषित केले नाही. यामुळेच भाजपला पुन्हा सत्ता राखता आली, असे म्हटले जात आहे. याव्यतिरिक्त ‘लाडली बहना’ या भाजप सरकारच्या योजनेमुळेही लोकांना भाजपला मतदान केल्याचे म्हटले जात आहे. या योजनेनुसार राज्यातील प्रत्येक २१ वर्षांखालील तरुणीला प्रत्येक महिन्याला सरकारकडून १ सहस्र रुपये दिले जातात. शिवराजसिंह चौहान यांच्या जागेवर मुख्यमंत्री म्हणून ज्योतिरादित्य शिंदे यांना बसवण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
छत्तीसगडमध्ये भाजपचा अनपेक्षित विजय !
छत्तीसगडमध्ये मागील निवडणुकीत सत्ताधारी भाजपचा पराभव होऊन काँग्रेसला सत्ता मिळाली होती. गेल्या ५ वर्षांत काँग्रेस सरकारचे मुख्यमंत्री भूपेश बघेल यांनी केलेल्या कार्याचे कौतुक होत असतांना काँग्रेसचे सरकार गेल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. मतदानोत्तर चाचणीतही काँग्रेसला सर्वाधिक जागा मिळत असल्याचे दिसून येत असतांना भाजपने सत्ता मिळवली आहे. यामागे नेमके कारण काय, याचा आता शोध घेतला जात आहे.
तेलंगाणामध्ये काँग्रेसचा विजय आश्चर्यकारक !
तेलंगाणामध्ये गेल्या १० वर्षांपासून म्हणजे २०१४ मध्ये तेलंगाणा राज्याची निर्मिती झाल्यापासून तेलंगाणा राष्ट्र समिती म्हणजे आताच्या भारत राष्ट्र समितीची (‘बी.आर्.एस्.’ची) सत्ता आहे. या वेळी तिची सत्ता जाऊन काँग्रेस सत्तेवर येणार, हे मतदानोत्तर चाचणीतून समोर आले होते. प्रत्यक्षात मतमोजणीनंतर हेच स्पष्ट झाले आहे. मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांना ते पुन्हा सत्तेवर येणार असल्याचा अतीआत्मविश्वास असल्याने त्यांनी देशपातळीवर आघाडी निर्माण करण्यासाठी तेथील विरोधी पक्षांशी बोलणी चालू केली होती. यामुळेच त्यांनी पक्षाच्या नावात ‘तेलंगाणा’ हटवून ‘भारत’ केले होते; मात्र राज्यातील जनतेला पालट हवा असल्याने त्यांनी काँग्रेसला निवडल्याचे दिसत आहे. राज्यात भाजपचे अस्तित्व तितकेसे नसल्याने तो पर्याय होऊ शकला नाही; मात्र भाजपने १ जागेवरून ८ जागांवर आघाडी मिळवल्याने हीसुद्धा मोठी गोष्ट म्हटली जात आहे.
टी. राजा सिंह यांचा विजय
प्रखर हिंदुत्वनिष्ठ टी. राजा सिंह यांनी तिसर्यांदा आमदारकीची निवडणूक जिंकली आहे. भाग्यनगर येथील त्यांच्या गोशामहल मतदारसंघातून त्यांनी पुन्हा विजय मिळवला आहे. महंमद पैगंबर यांचा कथित अवमान केल्याच्या प्रकरणी भाजपने त्यांना पक्षातून ६ वर्षांसाठी निलंबित केले होते; मात्र विधानसभा निवडणुकीच्या काही दिवसांपूर्वी भाजपने टी. राजा सिंह यांना पुन्हा पक्षात घेतले होते.
‘इंडी आघाडी’चा पराभव
गेल्या काही महिन्यांपासून भाजपच्या विरोधातील पक्ष भाजपचा पराभव करण्यासाठी संघटित होत आहेत. त्यांनी यासाठी ‘इंडी आघाडी’ची स्थापना केली आहे; मात्र या विधानसभा निवडणुकीत या इंडी आघाडीचा कोणताही प्रभाव किंवा संघटितपणा कुठेच दिसून आला नाही, ही वस्तूस्थिती आहे. लोकसभेसाठी म्हणून या आघाडीची स्थापना झाली आहे. त्यामुळे राज्यात त्याचा प्रभाव दिसणार नाही, असेही म्हटले जात आहे. काँग्रेस या आघाडीतील मुख्य पक्ष असला, तरी त्याने त्यांच्या आघाडीतून अन्य पक्षांना या निवडणुकीत महत्त्व दिले नसल्याचेही म्हटले जात आहे आणि काही राजकीय पक्षांनी हे सार्वजनिकरित्या बोलूनही दाखवले आहे.
राजस्थान (एकूण जागा २००)
पक्ष | आघाडी |
भाजप | ११७ |
काँग्रेस | ६७ |
मध्यप्रदेश (एकूण जागा २३०)
पक्ष | आघाडी |
भाजप | १६७ |
काँग्रेस | ६१ |
छत्तीसगड (एकूण जागा ९०)
पक्ष | आघाडी |
भाजप | ५३ |
काँग्रेस | ३५ |
तेलंगाणा (एकूण जागा ११९)
पक्ष | आघाडी |
काँग्रेस | ६४ |
बी.आर्.एस्. | ३९ |
भाजप | ८ |