बेछूट आरोप करण्यापूर्वी या प्रश्नांची उत्तरे द्या !
ठाणे येथे राष्ट्रवादी काँग्रेसचे आनंद परांजपे यांचे जीतेंद्र आव्हाड यांना जाहीर आवाहन !
ठाणे, २ डिसेंबर (वार्ता.) – सुरज परमार आत्महत्या प्रकरणी कुणाच्या दरवाजावर डोके टेकवायला जात होतात, अनंत करमुसे यांच्यावर पोलीस संरक्षणात आक्रमण करण्याचा बालिशपणा का केलात ? आणि वैभव कदम यांच्या आत्महत्येस उत्तरदायी कोण ? , असे प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाचे प्रवक्ते आणि ठाणे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांनी २ डिसेंबरला उपस्थित करत आमदार जीतेंद्र आव्हाड यांना लक्ष्य केले. ‘बेछूट आरोप करण्याआधी या ३ प्रश्नांची उत्तरे द्या’, असे जाहीर आवाहन परांजपे यांनी आमदार आव्हाड यांना येथे पत्रकार परिषदेत केले.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार जीतेंद्र आव्हाड यांनी प्रसार माध्यमांशी बोलतांना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका केली होती, तसेच कृषिमंत्री धनंजय मुंडे यांनाही लक्ष्य केले होते. त्याला परांजपे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते पुढे म्हणाले की, सुरज परमार या विकासकाच्या आत्महत्येप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ठाणे महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्षनेते नजीब मुल्ला, माजी गटनेते हणमंत जगदाळे यांना अटक झाली, तेव्हा स्वतःला वाचवण्यासाठी कुणाकुणाच्या दरवाजावर डोके टेकवायला गेलात ? तत्कालीन अतिरिक्त पोलीस आयुक्त लक्ष्मीनारायण यांच्याकडे का गेलात ? हे एकदा घोषित करा. अनंत करमुसे यांच्यावर केलेल्या अमानुष आक्रमण प्रकरणी, मी ५ ऑगस्ट २०२० या दिवशी रात्री ८ वाजता आव्हाड यांच्या घरी जाऊन त्यांना विनंती केली होती की, ‘असे करू नका’, तरी कॅबिनेट मंत्री असतांनाही पोलिसांसमोरच अनंत करमुसे यांच्यावर आक्रमण करून बालिशपणा दाखवलात आणि पोलिसांची कारकीर्द बर्बाद केलीत, याचे उत्तर द्या.