आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर समाज आक्रमक !
सातारा, २ डिसेंबर (वार्ता.) – खंडाळा तालुका धनगर समाजाच्या वतीने आरक्षणाच्या मागणीसाठी १६ दिवसांपासून लोणंद पंचायतीसमोर उपोषण चालू आहे. या उपोषणाला पाठिंबा देण्यासाठी १ डिसेंबर या दिवशी धनगर समाजाने आक्रमक होत पुणे-बेंगळुरू महामार्गावरील खंडाळा येथे रस्ताबंद आंदोलन केले.
सौजन्य न्यूज 18 लोकमत
या वेळी खंबाटकी घाट ५ घंटे अडवून धरण्यात आला. यामुळे महामार्गावर १५ किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या होत्या. पोलिसांनी मध्यस्ती करण्याचा प्रयत्न केला; मात्र आंदोलक आक्रमक झाल्यामुळे पोलीसही हतबल झाले. काही वेळाने जिल्हा पोलीस अधीक्षक घटनास्थळी पोचले. त्यांनी आंदोलकांना शांत करण्याचा प्रयत्न केला; मात्र आंदोलकांनी जोपर्यंत मुख्यमंत्री येथे येत नाहीत, तोपर्यंत आंदोलन चालूच ठेवण्याचा पवित्रा घेतला. शेवटी मुख्यमंत्र्यांना दूरभाषद्वारे संपर्क साधण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.