मराठी पाट्यांसाठी ५५ सहस्र १६ दुकानदारांना नोटिसा !
मराठी पाट्या न लावणार्यांना २ सहस्र रुपयांचा दंड !महापालिका आयुक्तांनी पडताळणी आणि सक्तवसुली यांचे दिले आदेश ! |
नाशिक – सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार इंग्रजी नामफलकासमवेत मराठी नामफलक लावण्यासाठी महापालिकेने शहरातील ५५ सहस्र १६ दुकानदारांना नव्याने नोटिसा बजावण्याचे आदेश आयुक्त डॉ. अशोक करंजकर यांनी दिले आहेत. जे दुकानदार मराठी फलक लावणार नाहीत, त्यांना २ सहस्र रुपयांचा दंडही करण्याच्या कठोर सूचनाही त्यांनी दिलेल्या आहेत; ‘इंग्रजी पाट्या लावणार्या दुकानदारांवर दंडात्मक कारवाईसाठी प्रतिव्यक्ती २ सहस्र रुपयांचा दंड लावण्याविषयी स्पष्टता नसल्यामुळे शासनाकडून मार्गदर्शन मागवले जाणार आहे’, असे उपायुक्त श्रीकांत पवार यांनी सांगितले.
सर्वोच्च न्यायालयानेच आता राज्यात अन्य भाषेसोबत मराठी फलकांसाठी सर्व आस्थापनांना २५ नोव्हेंबरपर्यंतची समयमर्यादा दिली होती; मात्र न्यायालयाच्या आदेशानंतरही बर्याच सरकारी आणि खासगी आस्थापनांवर इंग्रजी नामफलक कायम आहेत. सर्वोच्च न्यायालयाचे आदेश उघडपणे डावलले जात असतांना महापालिकेसारखी संस्थाही कारवाई करत नसल्याने मनसेच्या वतीने आंदोलन करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले.
दुकानांवरील मराठी पाट्यांसंदर्भात राज ठाकरे यांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा !
मुंबई – मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी २ डिसेंबर या दिवशी वर्षा निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. राज ठाकरे यांच्यासमवेत मनसेचे आमदार राजू पाटील उपस्थित होते. राज ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीत दुकानांवरील मराठी पाट्यांसंदर्भात चर्चा करण्यात आली आहे. ऑक्टोबर मासात राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची पथकराच्या सूत्रावरून भेट घेतली होती.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सामाजिक माध्यमांवर राज ठाकरे यांच्यासमवेतची छायाचित्रे पोस्ट केली आहेत. या पोस्टमध्ये मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज वर्षा या निवासस्थानी येऊन माझी भेट घेतली. या भेटीत राज्यातील पथकर नाक्यांचा प्रश्न आणि दुकानांवरील मराठी पाट्या लावण्याविषयी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाची कार्यवाही आणि दंडात्मक कारवाईविषयी प्रामुख्याने चर्चा करण्यात आली. या भेटीच्या वेळी मनसेचे आमदार राजू पाटील उपस्थित होते.
काही दिवसांपूर्वी राज ठाकरे राज्य सरकारवर टीका करतांना म्हणाले होते की, मनसेने मुंबई, ठाणे, नाशिकसह इतर शहरांत दुकानांवरील इंग्रजी पाट्या हटवल्या. राज्य सरकार बाळासाहेबांच्या विचारांविषयी बोलतात; मग कारवाई का करत नाहीत ?