छत्रपती संभाजीनगर येथील माध्यान्ह भोजनात अंडी नकोच; ठाकरे गटासह जैन संघटनेचा कडाडून विरोध !
छत्रपती संभाजीनगर – केंद्र सरकारने माध्यान्ह भोजनात शालेय विद्यार्थ्यांना आठवड्यातून दोनदा अंडी देण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय शाळेत भेद निर्माण करणारा आहे. सर्व विद्यार्थ्यांनी भेद विसरून एकत्र जेवण करावे, हा माध्यान्ह भोजनाचा मुख्य हेतू आहे. असे असतांना जैन समाज, वारकरी संप्रदाय, श्री स्वामी समर्थ केंद्रासह अनेकांनी या निर्णयाला विरोध दर्शवला आहे. हा निर्णय तात्काळ मागे घेण्यात यावा, यासाठी ठाकरे गटाने १ डिसेंबर या दिवशी महापालिकेचे आयुक्त जी. श्रीकांत यांची भेट घेतली. महापालिकेच्या शाळेत हा निर्णय लागू करण्यात येऊ नये. त्याऐवजी फळे आणि चिक्की असे पदार्थ देण्याची मागणीही केली.
महापालिकेच्या आयुक्तांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, महापालिका शाळांमधील विद्यार्थी हे बहुतांश वारकरी आणि इतर अनेक संप्रदायातील आहेत, तसेच काही विद्यार्थी शाकाहारी असल्यामुळे शाळेमध्ये अंडी वाटप केली, तर शाकाहारी विद्यार्थ्यांची वेगळी रांग आणि अंडी खाणार्यांची वेगळी रांग करावी लागेल. असे केल्यास मुलांमध्ये लहानपणापासूनच वेगळेपणाची भावना निर्माण होईल. अंड्यामध्ये प्रोटीन मिळते म्हणून माध्यान्ह भोजनात ते देण्याचा आग्रह आहे. आधुनिक वैद्यांच्या मते सोयाबीन, फळे, चिक्की, शेंगदाणे, गूळ, उडीद डाळ यांतूनही तेवढीच प्रथिने मिळतात. त्यामुळे प्रोटीनसाठी हा पर्याय निवडता येऊ शकतो, असेही तज्ञांनी सांगितले.