सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन अनिरुद्ध राजंदेकर (वय ५ वर्षे) यांना ‘हिंदु राष्ट्रा’चा लागलेला ध्यास !
१. सर्वसामान्य साधक ‘हिंदु राष्ट्रा’विषयी साशंक असतांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ‘हिंदु राष्ट्र स्थापने’च्या कार्याचा सातत्याने ध्यास असणारे सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन !
‘हिंदु राष्ट्रा’चा विचार सर्वसामान्य साधक आणि समाज यांना करायला इतकी वर्षे लागली. अजूनही आमच्यापैकी अनेकांना त्याची स्पष्टपणे जाणीव किंवा कल्पना आलेली नाही. ‘हिंदु राष्ट्र कसे असणार ? हिंदु राष्ट्र कसे येणार ? कधी येणार ? ते खरेच येणार का ?’, असे असंख्य प्रश्न साधकांच्याही मनात असतात; मात्र प.पू. गुरुदेवांचे (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे) अद्वितीय कार्य पुढे चालू ठेवण्यासाठी जनलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले सनातनचे दुसरे बालसंत पू. वामन यांना ५ वर्षे वयातच ‘हिंदु राष्ट्रा’चा अखंडपणे ध्यास लागला आहे.
२. पू. वामन यांनी ‘हिंदु राष्ट्रा’चा ध्यास घेऊन युद्धाचे खेळ खेळणे
‘पू. वामन यांना ‘हिंदु राष्ट्रा’चा ध्यास लागला आहे’, याची जाणीव मला मागील काही दिवसांपासून सतत होत आहे. पू. वामन हे सतत ‘युद्ध-युद्ध’, असे खेळत असतात. ‘सर्वत्र आग लागली आहे. प्राणी, पक्षी आणि माणसे यांना त्रास होत आहे’, असे म्हणून ते विविध मार्गांनी ती आग विझवतात. ‘बालसंतांचे वागणे आणि त्यांचे सूक्ष्मातील कार्य समाजापर्यंत पोचावे’; म्हणून त्यांतील काही प्रसंग येथे दिले आहेत.
२ अ. ‘पृथ्वीवर ब्रह्मांडातील पुष्कळ दगड धडकणार आहेत’, असे सांगणे : दोन दिवसांपूर्वी रात्री पू. वामन मला म्हणाले, ‘‘आई, तू पृथ्वी हो. मी पृथ्वीवर धडकणारा दगड होतो. पृथ्वीवर ब्रह्मांडातील पुष्कळ दगड धडकणार आहेत.’’ मी त्यांना म्हटले, ‘‘कशाला इतके दगड धडकणार आहेत. नको इतके.’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘नाही आई, हे दगड पृथ्वीवर धडकायलाच पाहिजेत, तरच पृथ्वी स्वच्छ होऊन ‘हिंदु राष्ट्र’ येईल ! ‘हिंदु राष्ट्रा’त सगळे साधकच असतील.’’ इतके बोलून ते पुन्हा त्यांचा खेळ खेळायला लागले.
२ आ. पू. वामन यांनी खेळातील विमानांच्या युद्धात जिंकल्यावर ‘हिंदु राष्ट्र आले’, असे म्हणणे : २६.३.२०२३ या दिवशी पू. वामन त्यांच्या खेळण्यांतील २ छोट्या विमानांशी खेळत होते. खेळता खेळता त्यांनी त्या विमानांचे युद्ध चालू केले. पुष्कळ वेळ त्या विमानांचे युद्ध चालू असलेले पाहून मी त्यांना विचारले, ‘‘हे युद्ध का चालू आहे आणि हे कधी संपेल ?’’ तेव्हा ते म्हणाले, ‘‘हे युद्ध ‘हिंदु राष्ट्रा’साठी चालू आहे. वाईट विमान नष्ट झाल्यावर हे युद्ध थांबेल. असे आकाशात विमानांचे युद्ध होणार आहे आणि त्यानंतरच ‘हिंदु राष्ट्र’ येणार आहे !’’ काही वेळाने त्यांच्या हातातील लाल-पांढर्या रंगाचे विमान खाली पडले. तेव्हा ते मला म्हणाले, ‘‘हिंदु राष्ट्र आले. आपण जिंकलो !’’
२ आ १. पू. वामन यांनी ‘हिंदु राष्ट्रा’चा ध्वज म्हणून हातात एक काठी धरायला सांगून जिंकलेले विमान अनेक वेळा त्या ध्वजाच्या काठीवरून फिरवून त्यावर सूक्ष्मातून पुष्पवृष्टी करणे आणि त्यांचा हा खेळ पहातांना खरेच ‘हिंदु राष्ट्र आले’, असा आनंद अनुभवता येणे : पू. वामन यांनी मला ‘हिंदु राष्ट्रा’चा ध्वज म्हणून एक छोटी काठी हातात धरायला सांगितली. ते म्हणाले, ‘‘आता सर्व लोक ‘जयतु जयतु हिन्दुराष्ट्रम् ।’, असे म्हणतील. विमानातून ‘हिंदु राष्ट्रा’च्या ध्वजावर पुष्पवृष्टी होणार आहे.’’ असे म्हणत त्यांनी खेळण्यातील विमान त्या खेळण्यातील ‘हिंदु राष्ट्रा’च्या ध्वजावरून फिरवले. त्यांनी असे अनेक वेळा केले. तेव्हा पू. वामन यांना शब्दातीत आनंद झाला होता. ते पुनःपुन्हा सूक्ष्मातून ‘हिंदु राष्ट्रा’च्या ध्वजावर पुष्पवृष्टी करत ‘हिंदु राष्ट्रा’चा जयजयकार करत होते. त्यांना झालेला आनंद आणि खेळातील हा सोहळा पाहून मला वाटले, ‘खरोखरच मी ‘हिंदु राष्ट्र’ अनुभवत आहे.’
३. पू. वामन यांनी खेळतांना आपत्काळातील दृश्ये सांगून ‘केवळ साधना करणार्यांचेच रक्षण झाले असून आता त्यांनी एकत्र नामजप करावा’, असे सांगणे
दिवसभर खेळतांना पू. वामन अनेक वेळा म्हणतात, ‘‘आज इथे या जंगलात आग लागली आहे. आज या इमारतीला आग लागली आहे. इथे भूकंप झाला आहे.’’ असे म्हणत असतांना ते त्यांच्या खेळण्यातील इमारती पाडतात. असे खेळ खेळत असतांनाच ते सहजपणे या आपत्कालीन परिस्थितीत अडकलेल्या सर्वांना खेळातील अग्निशमन दल, रुग्णवाहिका किंवा पोलीस यांचे साहाय्य देतात. तेव्हा ते म्हणतात, ‘‘जे साधना करतात, त्यांचेच रक्षण झाले आणि तेच वाचले. आता त्यांनी एकत्र नामजप करावा.’’
४. पू. वामन यांना लागलेला ‘हिंदु राष्ट्रा’चा ध्यास पाहून ‘ते सूक्ष्मातून काय कार्य करत आहेत ?’, हे केवळ सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले आणि पू. वामन यांनाच ठाऊक असावे’, असे वाटणे
पू. वामन यांना प.पू. गुरुदेवांच्या ‘हिंदु राष्ट्र’ स्थापनेच्या संकल्पाची सतत जाणीव असते. त्यांना त्याची केवळ जाणीवच असते, असे नसून ते अखंडपणे त्याचाच ध्यास घेऊन ‘ते कार्य होण्यासाठी अंतर्मनातून काय करत आहेत ?’, हे केवळ प.पू. गुरुदेव आणि पू. वामन यांनाच ठाऊक असावे’, असे मला वाटले. ते समजणे सोपे नाही.
५. ‘गुरुसेवा करण्यासाठी वय किंवा शारीरिक क्षमता यांचे बंधन नसून केवळ गुरुचरणी समर्पित होण्याचा ध्यास असायला हवा’, हे अनुभवता येणे
पू. वामन यांना या बालवयात सतत असलेला ‘हिंदु राष्ट्र’ स्थापनेचा ध्यास अनाकलनीय आहे. प.पू. गुरुदेव नेहमी म्हणतात, ‘‘संतच ‘हिंदु राष्ट्र’ आणू शकतात.’’ याची ही प्रत्यक्ष अनुभूती आहे. मला पू. वामन यांच्याकडून ‘गुरुसेवेची तळमळ कशी असावी ? त्यासाठी ध्यास कसा असायला पाहिजे ?’, हे शिकायला मिळाले. त्याच समवेत ‘गुरुसेवा करण्यासाठी वय किंवा शारीरिक क्षमता यांचे बंधन नसून आवश्यक असतो, तो केवळ गुरुचरणी समर्पित होण्याचा ध्यास’, हे मला शिकता आणि अनुभवता आले.
प.पू. गुरुदेव आणि पू. वामन यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’
– सौ. मानसी अनिरुद्ध राजंदेकर (पू. वामन यांची आई, आध्यात्मिक पातळी ६० टक्के), फोंडा, गोवा. (२६.३.२०२३)