साधकांच्या मनातील शंकांचे पूर्ण समाधान करून आणि अध्यात्मातील सिद्धांत वैज्ञानिक भाषेत मांडून साधकांना साधनेत अग्रेसर करणारे अद्वितीय महान परात्पर गुरु डॉ. आठवले !
‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी जिज्ञासूंना ‘साधना का, कुठली आणि कशी करायची ?’, ते सांगून त्यामागील शास्त्रही समजावून सांगितले. जिज्ञासूंच्या मनातील शंकांचे पूर्ण निरसन केल्यामुळे जिज्ञासू साधना करायला उद्युक्त झाले. जिज्ञासू साधना करू लागल्यावर त्यांना अनुभूती येऊन आनंद मिळू लागला. परात्पर गुरु डॉक्टरांनी साधकांना काळानुसार ‘व्यष्टी साधनेच्या (वैयक्तिक साधनेच्या) समवेत समष्टी साधनेचे (समाजात अध्यात्मप्रचार करून समाजाला साधना करायला उद्युक्त करणे) महत्त्व शिकवले. त्यांनी स्वतःच्या कृतीतून साधकांना अनेक गुण अंगी बाणवायला शिकवले. त्याच समवेत साधनेत ‘स्वभावदोष आणि अहं’ यांचा मुख्य अडथळा आहे’, हे लक्षात आणून देऊन ते दूर करायचा मार्गही दाखवला. त्यामुळे सनातनचे साधक पुष्कळ जलद गतीने साधनेत प्रगती करत आहेत.
या साधनामार्गावर मार्गक्रमण करतांना अनेक साधकांना गुरुदेवांचे दिव्यत्व आणि देवत्व यांच्या अनुभूती आल्या आहेत, तरी प्रथमपासूनच गुरुदेवांनी कधी स्वतःचे प्रस्थ निर्माण होऊ दिले नाही. सर्व करून नामानिराळे रहाणारे गुरुदेव सर्वथैव एकमेवाद्वितीय आहेत. ‘ते आम्हाला गुरु म्हणून लाभले’, हे आमचे अहोभाग्य ! त्यांच्या मार्गदर्शनाखाली साधना करतांना त्यांनी मला कसे घडवले आणि माझी प्रगती करून घेतली ? ते येथे दिले आहे.
१. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी साधकांना स्वतःच्या स्थूल रूपात अडकू न देणे
१ अ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जाहीर सभेच्या भित्तीपत्रकावर त्यांचे छायाचित्र नसणे : ‘मे १९९८ मध्ये ठाणे येथे परात्पर गुरु डॉक्टरांची एक जाहीर सभा होणार होती. तिची भित्तीपत्रके अनेक ठिकाणी लावली होती; परंतु एकाही भित्तीपत्रकावर प.पू. डॉक्टरांचे छायाचित्र नव्हते. भित्तीपत्रकावर भगवान परशुरामाचे चित्र होते आणि भगवान परशुरामाचे वर्णन करणारा श्लोक होता. ते पाहून माझ्या मनात पुष्कळ कुतुहल जागृत झाले; कारण बहुतेक सभांच्या भित्तीपत्रकावर मुख्य वक्ते किंवा संत यांचे छायाचित्र असतेच.
१ आ. सनातनच्या सत्संगात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र नसणे : त्यानंतर एकदा एका वृत्तपत्रात सनातनच्या सत्संगांची सूची आली होती. ती पाहून मला परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या जाहीर सभेची भित्तीपत्रके आठवली. माझ्या मनात त्यांच्याविषयीचे कुतूहल पुन्हा जागृत झाले आणि जून १९९८ पासून मी सनातन संस्थेच्या सत्संगांना जाऊ लागलो. सत्संगात परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र ठेवले जात नव्हते किंवा त्यांच्या नावाने जप किंवा आरतीही करण्यास सांगितली जात नव्हती.
१ इ. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी जिज्ञासूंना स्वतःमध्ये अडकू न देता तत्त्वनिष्ठ राहून साधना करायला शिकवणे : मी सनातन संस्थेने सांगितलेली गुरुकृपायोगानुसार साधना करू लागल्यावर काही वर्षांनी वरील दोन्ही सूत्रे आठवून माझ्या लक्षात आले, ‘अगदी आरंभापासूनच गुरुदेवांनी स्वतःच्या आदर्श वर्तनातून स्वतःचे महत्त्व न वाढवता आणि जिज्ञासूंना स्वतःमध्ये अडकू न देता तत्त्वनिष्ठ राहून साधना करायला शिकवले.’ याचा मला पुढे साधनेत पुष्कळ लाभ झाला. अनेक संप्रदायांमधील साधक त्यांचे गुरु किंवा संत यांच्या स्थूल रूपात अडकतात. त्यामुळे त्यांची पुढील प्रगती गतीने होत नाही.
१ ई. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी जिज्ञासूंना सत्संग घेणार्या साधकांमध्येही अडकू न देणे : सत्संग घेणारे साधक काही कालावधीनंतर पालटत होते. नवीन साधकांना सत्संग घेण्याची संधी मिळत होती. कुठलाही साधक सत्संग घेत असला, तरी सर्वांची सत्संग घेण्याची पद्धत सारखीच होती. त्यामुळे कुणीही सत्संग घेणार्या साधकांमध्ये, म्हणजेच कुठल्याही व्यक्तीमध्ये अडकले नाही.
२. ‘योगः कर्मसु कौशलम् ।’, याप्रमाणे प्रत्येक कृती बिनचूक आणि परिपूर्ण करायला कृतीतून शिकवणे
२ अ. सत्संगाची पूर्वसिद्धता व्यवस्थित केली जाणे आणि सत्संगानंतर पुन्हा सर्व स्वच्छ आवरले जाणे : सत्संग नेहमी अगदी वेळेवर चालू व्हायचा आणि वेळेवर संपवण्याचा प्रयत्न असायचा. सत्संग घेणारे किंवा आधीपासून सत्संगाला येणारे साधक सत्संगाच्या काही वेळ आधी येऊन सत्संगाच्या जागेची स्वच्छता करायचे. सत्संगाला येणार्यांसाठी बैठका घालून सत्संगाचा कापडी फलक लावायचे आणि सत्संग संपल्यावर सर्व आवरून स्वच्छ करून जायचे.
२ आ. प्रत्येक कृती परिपूर्ण केली जाणे : सत्संगाचा ‘कापडी फलक वाकडा-तिकडा लावलाय’, असे कधीही व्हायचे नाही. ‘फलक’ लावणारा फलक लावतांना इतरांना ‘फलक सरळ लागला आहे ना ?’, असे विचारत असे. बैठकाही अगदी रांगेत आणि व्यवस्थित लावल्या जायच्या. आलेल्या जिज्ञासूंनाही रांगेत व्यवस्थित बसवले जायचे.
हे सर्व ‘योगः कर्मसु कौशलम् ।’ (श्रीमद्भगवद्गीता, अध्याय २, श्लोक ५०), म्हणजे ‘प्रत्येक कर्म चांगल्या प्रकारे करणे, म्हणजे योग साधणे’, या तत्त्वानुसार होत असे.
२ इ. सच्चिदानंद परब्रम्ह डॉ. आठवले यांनी प्रत्येक कृती परिपूर्ण करण्यास शिकवणे : प.पू. डॉक्टरांनी साधकांना ही जी काही शिस्त साधना म्हणून शिकवली होती, त्या शिस्तीचा आमच्यावर अप्रत्यक्षरित्या चांगला परिणाम व्हायचा. यातून आपोआपच ‘प्रत्येक गोष्ट परिपूर्ण कशी करायची ?’, हे मला शिकता आले.
३. सत्संगात येणार्या जिज्ञासूंना ‘कुठल्या मार्गाने साधना केल्यास जलद आध्यात्मिक उन्नती होते ?’, हे समजावून सांगितल्यामुळे त्यांच्या मनाचा संघर्ष न होता गुरुकृपायोगानुसार साधना चालू होणे
सत्संगात येण्यापूर्वी जिज्ञासू काही ना काही उपासना करत असायचे, उदा. वेगवेगळ्या संप्रदायानुसार साधना करणे, ध्यान लावणे, कर्मकांडानुसार पूजा-अर्चा करणे इत्यादी. सत्संगात सनातन संस्थेने सांगितलेली गुरुकृपायोगानुसार साधना सांगितल्यावर जिज्ञासूंच्या मनात ‘आता आपण पूर्वी करत असलेली साधना सोडून सनातनने सांगितल्याप्रमाणे साधना चालू केल्यास ‘ते योग्य होईल का ?’, असा प्रश्न निर्माण होई. तेव्हा सत्संगसेवक जिज्ञासूंना वेगवेगळ्या साधनामार्गांचा तुलनात्मक अभ्यास सांगत, तसेच कर्मकांड आणि उपासनाकांड यांतील भेद समजावून सांगत. ते ‘कुठल्या मार्गाने साधना केल्यास आपण जलद आध्यात्मिक उन्नती करू शकतो ?’ याचे अभ्यासपूर्ण विवेचन करत. त्यामुळे जिज्ञासूंच्या शंकेचे निरसन होऊन कुठलाही संघर्ष न होता त्यांची गुरुकृपायोगानुसार साधना चालू होत असे. परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी हा अभ्यास साधकांना ‘अध्यात्माचे प्रास्ताविक विवेचन’ या ग्रंथात उपलब्ध करून दिला आहे.’
– (सद्गुरु) श्री. राजेंद्र शिंदे, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१६.१२.२०२२) (क्रमश:)