Indian Navy Day 2023 : भारत सरकारकडून नौदलाला सक्षम करण्याचा प्रयत्न !
४ डिसेंबर २०२३ (उद्या) या दिवशी भारतीय नौदल सेनेचा ‘नौदलदिन’ आहे. त्या निमित्ताने…
४ डिसेंबर २०२३ (उद्या) या दिवशी भारतीय नौदल सेनेचा ‘नौदलदिन’ आहे. त्या निमित्ताने भारत सरकारकडून नौदल सेनेला सक्षम करण्यासाठी करण्यात येणार्या प्रयत्नांचा मागोवा ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त) यांनी या लेखाद्वारे घेतला आहे.
१. भारताच्या सीमेवर जलद चालणार्या होड्या आणि ‘लँडींग क्राफ्ट’ नियुक्त करण्याचे नियोजन !
भारताच्या सीमेवर ६ जलद चालणार्या होड्या आणि ‘लँडिंग क्राफ्ट’ (सैन्य आणि इतर उपकरणे उतरवण्यासाठी कमी उंचीवरील जहाज) नियुक्त करण्याचे नियोजन आहे. भारताच्या सीमेवरील ‘सर क्रीक’, ‘ब्रह्मपुत्रा नदीचे पात्र’ आणि ‘सुंदबन डेल्टा’ भागामध्ये या होड्या नियुक्त केल्या जातील. या होड्या अतिशय मजबूत आणि विविध कामे करणार्या आहेत. या होड्यांवर विविध कामगिरी करण्यासाठी सशस्त्र सैनिक नियुक्त करण्यात येतील. ‘लँडिंग क्राफ्ट’मधून एकाच वेळी ३५ सैनिक आणि त्यांची आयुधे नेता येतील.
२. भारतीय नौदलात स्वदेशी बनावटीची ‘इंफाळ’ युद्धनौका समाविष्ट03 !
‘माझगाव डॉक शिपबिल्डर्स लिमिटेड’ या आस्थापनाने ‘प्रॉजेक्ट १५ बी क्लास गायडेड मिसाईल डिस्ट्रॉयर’ या वर्गातील ‘इंफाळ’ ही युद्धनौका भारतीय नौदलाला नियोजित वेळेच्या ४ मास आधीच सिद्ध करून दिली आहे. या युद्धनौकेवर पहिल्यांदाच महिला अधिकारी आणि खलाशी यांची रहाण्याची व्यवस्था असेल. या युद्धनौकेवर ‘ब्रह्मोस’ आणि ‘बराक-८’ ही ‘सुपरसोनिक’ क्षेपणास्त्रे, तसेच पाणबुड्यांच्या विरोधातील ‘सेन्सर्स’ आणि शस्त्रास्त्रे असतील. या युद्धनौकेच्या समुद्रातील कामाची रंगीत तालीम पूर्ण झाली असून त्यावर अत्याधुनिक ‘ऑटोमेशन यंत्रणा’ बसवण्यात आली आहे. सरकारचा ‘आत्मनिर्भर भारत’ हा हेतू लक्षात घेऊन ‘पी १५ बी’ दर्जाच्या या युद्धनौकेवरील जवळजवळ ७२ टक्के यंत्रणा भारतीय बनावटीची आहे.
– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे.
नौदल दिवस साजरा करण्यामागील उद्देश आणि महत्त्व !
१. भारतीय सैन्याचे सामर्थ्य कळण्यासाठी साजर्या होणार्या नौदल दिवसाच्या सोहळ्यात ७० हून अधिक जहाजे सहभागी होणार असणे
‘४ डिसेंबर या दिवशी सिंधुदुर्ग गडावर ‘नौदल’ दिवस साजरा करण्यात येणार आहे. या दिवशी भारतीय नौदलाने क्षेपणास्त्रांच्या साहाय्याने कराची बंदरावर आक्रमण करून ते नष्ट केले होते. ही पाकिस्तान विरोधातील लढाईत महत्त्वाची कामगिरी समजली जाते. पूर्वी नौदल दिवस, हवाई दिवस आणि सैन्य दिवस केवळ देहलीत साजरा होत असे. भारताच्या इतर जनतेलाही भारतीय सैन्याचे सामर्थ्य कळावे, तसेच ते देशाचे रक्षण कशा प्रकारे करू शकते ?, हे समजावे, यासाठी आता असे दिवस देशातील विविध भागांमध्ये साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. यापूर्वी ‘सैन्य दिवस’ हा लक्ष्मणपुरी (उत्तरप्रदेश) येथे साजरा झाला होता, तर ‘हवाई दल’ दिवस जोधपूरला साजरा झाला होता. त्याचप्रमाणे ‘नौदल दिवस’ हा महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग गडाच्या जवळ साजरा होत आहे. या सोहळ्यात ७० हून अधिक जहाजे सहभागी होणार आहेत.
२. पहिले नौदल स्थापन करणारे आणि सिंधुदुर्ग गड बांधणारे छत्रपती शिवाजी महाराज होते !
मागील वर्षी नौदलाच्या ध्वजावर पालट करून त्यावर छत्रपती शिवाजी महाराजांची मुद्रा स्थापित करण्यात आली. छत्रपती शिवाजी महाराज हे असे शासनकर्ते होते की, ज्यांना सागरी सुरक्षेचे महत्त्व समजले होते आणि त्यांनी पहिले नौदल स्थापन केले होते ! सिंधुदुर्ग गड त्यांनीच बांधला होता. त्यामुळे हा सोहळा विशेष महत्त्वाचा ठरणार आहे.
प्रशिक्षण नौका बांधणीसाठी ‘माझगाव डॉक’ आस्थापनाला कंत्राट‘इंडियन कोस्ट गार्ड’साठी प्रशिक्षण देणारी नौका बांधण्यासाठी भारतीय संरक्षण खात्याने ‘माझगाव डॉक’ या आस्थापनाशी करार केला आहे. या जहाजावर पाळत ठेवण्यासाठी अत्याधुनिक अशी आणि नियंत्रण ठेवण्याविषयी यंत्रणा बसवण्यात येणार आहे. त्यावर ७० समुद्र सुरक्षा अधिकारी आणि आंतरराष्ट्रीय प्रशिक्षणार्थींना प्रशिक्षण देण्यात येईल. भारताची नौका सिद्ध करण्याची क्षमता वाढवणे, हे ध्येय समोर ठेवून या नौकेवर बसवण्यात येणारी बहुतांश आयुधे आणि यंत्रणा भारतीय उत्पादकांकडून सिद्ध करण्यात येतील. हे कंत्राट २ सहस्र ३१० कोटी रुपयांचे आहे. |
३. सक्षमीकरणाकडे वाटचाल करणारे भारतीय नौदल !
भारतीय नौदलात भूपृष्ठावर काम करणारी जहाजे आणि पाण्याच्या आत काम करणार्या पाणबुड्या आहेत. जहाजांवर तोफा, क्षेपणास्त्रे, रडार आदी असते. तेथे २ ते ३ सहस्र नौसैनिक असू शकतात. भारताकडे साधारण डिझेल आणि अणूशक्ती यांवर चालणार्या पाणबुड्या आहेत. सध्या भारतीय नौदल अणूशक्तीवर चालणार्या पाणबुड्या अधिक प्रमाणात घेत आहे. भारताकडे स्वत:च्या ‘आयएन्एस् विक्रमादित्य’ वगैरे विमानवाहू युद्धनौका आहेत. तसेच नौदलाचे स्वत:चे ‘फायटिंग नेविगेशन’ आहे. त्यात विविध हेलिकॉप्टर्स आणि विमाने असतात. भारताकडे अंदमान-निकोबार आणि लक्षद्वीप असे चांगले द्वीपसमूह आहेत. यासमवेतच समुद्रकिनारे सुरक्षित ठेवणारे भारतीय तटरक्षक दल, सागरी पोलीस, ड्रोन आहेत. शत्रूवर लक्ष ठेवण्यासाठी भारतीय नौदल दिवसेंदिवस अधिक सक्षम होत आहे. याचे दर्शन या सोहळ्यातून होणार आहे.’
– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त) पुणे.