छत्रपती संभाजीनगर येथील स्वस्त धान्य दुकानदारांचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा !
स्वस्त धान्य दुकाने बंद, १ जानेवारी २०२४ पासून दुकाने बेमुदत बंद ठेवण्याची चेतावणी !
छत्रपती संभाजीनगर – वितरण व्यवस्थेतील अनेक अडचणी आणि स्वस्त धान्य दुकानदारांना मिळणारे शुल्क अद्याप मिळाले नसल्यामुळे १ डिसेंबर या दिवशी दुपारी १२ वाजता ‘ऑल इंडिया फेअर प्राईज शॉप डिलर फेडरेशन नवी दिल्ली’, या संघटनेशी संलग्न असलेल्या महाराष्ट्र राज्य स्वस्त धान्य दुकानदार आणि केरोसीन परवानाधारक महासंघ पुणे यांच्या वतीने येथे धरणे आंदोलन करण्यात आले. मागण्या मान्य न झाल्यास १ जानेवारी २०२४ पासून बेमुदत वितरण बंद करण्याची चेतावणी संघटनेच्या वतीने देण्यात आली आहे. (सर्वांच्या अडचणी आणि शुल्क रोखून धरणारे प्रशासन नकोच ! – संपादक)
या आंदोलनात सरकारच्या विरोधात घोषणा देण्यात आल्या, त्यानंतर जिल्हा प्रशासनाला निवेदन देण्यात आले. संघटनेद्वारे देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, स्वस्त धान्य दुकानदारांच्या विविध अडचणी आणि मागण्या याविषयी वेळोवेळी निवेदने देऊन धरणे आंदोलने केली; परंतु अद्याप याकडे राज्य आणि केंद्र सरकार यांनी लक्ष दिले नाही. त्यामुळे संघटनेच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले आहे.
नागपूर येथील हिवाळी अधिवेशन काळात आंदोलन करण्यात येणार आहे. मागण्या मान्य न झाल्यास १ जानेवारी २०२४ पासून राज्य आणि केंद्र सरकार यांच्या विरोधात राज्यातील सर्व स्वस्त धान्य दुकाने बेमुदत बंद ठेवण्यात येणार आहेत. या निवेदनावर अध्यक्ष डी.एन्. पाटील, सचिव चंद्रकांत यादव, उपाध्यक्ष राजेश अंबुसकर, जिल्हा आणि तालुक्यातील पदाधिकारी यांच्या स्वाक्षर्या आहेत.