संपादकीय : फालतू फेमिनिझम् !
मागील अनेक वर्षे अभिनयाच्या क्षेत्रात स्वतःचा ठसा उमटवणार्या नीना गुप्ता यांनी एका मुलाखतीमध्ये ‘फेमिनिझम् (स्त्रीवाद) ही फालतू गोष्ट आहे’, असे म्हटल्यामुळे ‘स्त्रीवाद’ हा विषय पुन्हा चघळला जात आहे. बरं, नीना गुप्ता यांच्यावर ‘स्त्रीद्रोही’ किंवा ‘स्त्रीविरोधी’ असा शिक्का मारू शकत नाही; कारण आयुष्यात घेतलेल्या अनेक स्फोटक निर्णयांमुळे त्या स्त्रीस्वातंत्र्याचा पुरस्कार करणार्यांच्या गळ्यातील ताईत आहेत. त्यामुळे स्त्रीमुक्तीवाल्यांची पंचाईत झाली आहे. तसे पाहिले तर स्त्रीमुक्तीवाद हा चावून चोथा झालेला विषय आहे. ‘स्त्रीकडे स्त्री म्हणून नको, तर व्यक्ती म्हणून पहा’, ‘स्त्रीला पायातील चप्पल समजणे सोडून द्या’, असे संवाद आता जुने झाले असून सध्या ‘माय बॉडी, माय चॉईस’च्या (माझे शरीर, माझी निवड) घोषणा दिल्या जात आहेत. असे असले, तरी मागील काही वर्षांत स्त्रीमुक्तीवादाचा फोलपणा समोर येऊ लागला आहे. ही पाश्चात्त्य देशांतून भारतात आयात झालेली चळवळ आहे. अमेरिकेत या चळवळीला वर्ष १८४८ मध्ये प्रारंभ झाला. भारतात काय किंवा जागतिक पातळीवर स्त्रीला पुरुषांएवढाच समान अधिकार मिळवून देण्यासाठी राबवलेली चळवळ आज भरकटलेली आणि समाजविघातक झाली आहे. या चळवळीमुळे पुरुष वर्चस्ववादाची जागा आता स्त्री वर्चस्ववादाने घेतली आहे. कुठल्याही सामाजिक किंवा अन्य चळवळींवर साम्यवाद्यांचा प्रभाव पडल्यावर ती चळवळ समाजाच्या मुळावर उठते, हा आतापर्यंतचा इतिहास आहे. स्त्रीमुक्ती चळवळीचेही तसेच झाले आहे. ही चळवळ म्हणजे मार्क्सवादाचे पिल्लू ! अमेरिकेत या चळवळीच्या आधी काही प्रमाणात कुटुंबसंस्था शेष होती; मात्र या चळवळीमुळे ती कोलमडली. या चळवळीने तेथील स्त्रीला स्वतंत्र नाही, तर स्वैर, विकृत आणि स्वार्थी बनवले.
हे निरीक्षण तेथील स्त्रीविरोधी मंडळींचे नसून अमेरिकेतील स्त्रीमुक्ती चळवळीच्या आद्यप्रवर्तक केट मिलेट यांच्या भगिनी मॅलरी मिलेट यांचे आहे. स्त्रीमुक्तीवाल्यांसाठी केट मिलेट हे दैवत आहे. केट मिलेट केवळ अमेरिकेतच नव्हे, तर जगभरात स्त्रीमुक्ती चळवळीचा शक्तीशाली आवाज होत्या. त्यांचे ‘सेक्शुअल पॉलिटिक्स’ हे पुस्तक तर समस्त स्त्रीमुक्तीवाल्यांसाठी पवित्र ग्रंथ मानला जातो. मॅलरी मिलेट याही स्त्रीवादी. केट मिलेट यांनी अमेरिकेत स्त्रीमुक्ती चळवळ चालू केल्यावर काही काळ मॅलरी मिलेटही त्यांच्यासमवेत होत्या; मात्र या चळवळीचा फोलपणा आणि त्याहून अधिक समाजविघातक स्वरूप समोर आल्यावर त्यांनी या चळवळीच्या विरोधात आवाज उठवला. त्यामुळेच त्यांची मते ही समस्त स्त्रीमुक्तीवाल्यांच्या डोळ्यांत अंजन घालणारी आहेत.
स्त्रीमुक्ती चळवळीचा पराभव !
मॅलरी मिलेट यांनी दिलेल्या मुलाखती किंवा त्यांनी मांडलेले विचार हे मुळासकट वाचणे आवश्यक आहे. यामुळे स्त्रीमुक्ती चळवळीने धारण केलेले अक्राळविक्राळ स्वरूप आपल्या लक्षात येईल. त्यांनी मांडलेल्या विचारांमध्ये केट मिलेट यांच्याविषयी कटुता किंवा आकस नाही. ते विचार परखड असून त्यातून त्यांची वैचारिक सुस्पष्टता लक्षात येते. ‘जगात सर्व कायदे हे पुरुषांनी केले असल्यामुळे त्यांचे पालन करू नका. ते झिडकारण्यासाठी अनीतीने वागा’, अशी विघातक शिकवण केट मिलेट यांनी दिली. यामुळे समाजात स्वैराचार बोकाळला’, असे मॅलरी मिलेट यांचे प्रांजळ मत ! ‘केट मिलेट यांच्या स्त्रीमुक्ती चळवळीने कुटुंबातील आई हिरावून घेतली’, या त्यांनी मांडलेल्या मतावरून या चळवळीने समाजावर किती मोठ्या प्रमाणात आघात केला आहे, हे आपल्या लक्षात येईल.
कुफरमन यांना वाटणारी काळजी !
आता वळूया १९६० च्या दशकातील स्त्रीमुक्तीवादी ब्रिटीश लेखिका जेनेट कुफरमन यांनी मांडलेल्या विचारांकडे ! त्यांनी स्त्रीमुक्ती चळवळीमुळे महिलांमध्ये निर्माण झालेल्या अनेक समस्यांवर प्रकाश टाकला आहे. या चळवळीमुळे स्त्रियांमध्ये भावनिक रितेपणा आल्याचे त्यांचे म्हणणे आहे. ‘समानतेसाठी मी जो लढा दिला, त्याची किंमत माझ्या नातीला भोगावी लागणार का ?’, अशी चिंता कुफरमन यांना भेडसावत आहे. ‘स्त्रीवादामुळे आजच्या मुलींच्या जीवनात जी उलथापालथ झाली आहे, ती पाहून मनाला हादरे बसतात. समानतेच्या लढ्यामुळे आजच्या तरुण मुलींना लाभ झाला कि हानी ?’, हे आता पडताळणे आवश्यक वाटू लागले आहे. स्त्रीमुक्ती चळवळीने आजच्या महिलांना अधिकार दिले; मात्र त्यांचे जीवन हे किचकट, वेदनादायी बनले आहे. यामुळे समानतेमुळे मिळालेल्या संधी खुज्या ठरल्या आहेत’, असे कुफरमन यांना वाटते.
मॅलरी मिलेट किंवा जेनेट कुफरमन यांचे विचार हे स्त्रीमुक्तीचा पुरस्कार करणार्या प्रत्येक व्यक्तीला विचार करायला लावणारे आहेत. स्त्रियांना न्याय मिळवून देणे आवश्यकच आहे; मात्र स्त्रियांना अधिकार मिळवून देतांना अन्यांचे अधिकार आपण हिरावून घेत नाही ना ? हेही पहायला हवे. स्त्रीमुक्ती चळवळीचे नेमके इथेच चुकले. स्त्रीला सबला बनवतांना पुरुषांना ‘खलनायक’ रंगवण्यात आले. मनोरंजन सृष्टी, साहित्य आदी विविध माध्यमांतून सातत्याने हे समाजावर बिंबवण्यात आले. त्यामुळे समानतेचा हा लढा भरकटला आणि स्त्रीवर्चस्वाची लढाई चालू झाली. ‘स्त्री-पुरुष समानता नसून स्त्रिया या पुरुषांपेक्षा बर्याच गोष्टींत उजव्या आहेत’, हे सांगण्याची स्पर्धा स्त्रीमुक्तीवाल्यांमध्ये निर्माण झाली. त्यामुळे समाजात जी दुफळी माजली, त्याचा फटका सर्वांनाच बसला आहे. या पार्श्वभूमीवर नीना गुप्ता यांनी ‘फेमिनिझम्’ला फालतू म्हटले, तर त्यामुळे स्त्रीमुक्तीवाल्यांना मिर्च्या झोंबण्याचे काही कारण नाही. ‘स्त्रीला कशापासून मुक्तता मिळवून द्यायची आहे’, या संदर्भात सध्या स्त्रीमुक्तीवाल्यांमध्ये संभ्रम असल्याचे दिसून येते. त्यामुळे स्त्रीमुक्तीचा ठेका घेणार्यांनी या चळवळीला विरोध करणार्यांवर आगपाखड करण्याऐवजी आत्मपरीक्षण करावे. ‘स्त्रियांचे हित आणि त्यांचा उत्कर्ष कशात आहे ? आणि हा उत्कर्ष अशा चळवळींमुळे साध्य होणार का ?’, याचा विचार करण्याची वेळी आली आहे.
समाजहिताच्या दृष्टीने घातक असलेल्या सर्वच चळवळींचा वैचारिक विरोध होणे आवश्यक ! |