मंदिरांवर आधारित हिंदूंची अद्भुत दैवी अर्थव्यवस्था !
ओझर (पुणे) येथे चालू असलेल्या ‘महाराष्ट्र राज्य मंदिर महासंघा’च्या राज्य परिषदेच्या निमित्ताने…
भारतात शेती व्यवसाय हा पूर्वापार प्रमुख उपजीविकेचे साधन आहे. जेथे नदी आहे, तेथे शेती आहे आणि जेथे शेती आहे, तेथे लोकांची वस्ती आहे. म्हणजे नदीच्या किनारीच गावे, नगर वसत असत. मोहंजोदडो, हडप्पा अशा काही संस्कृती नदी किनारी, म्हणजे पाण्याच्या स्रोताच्या ठिकाणी विकसित झाल्या, सहस्रो वर्षे त्यांची व्यवस्था होती, हे आपण इतिहासाच्या पुस्तकात वाचलेले आहे; मात्र त्याही आधीपासून भारतात एक महत्त्वाची व्यवस्था कार्यरत होती, ती म्हणजे मंदिर आधारित अर्थव्यवस्था किंवा मंदिरांवर आधारित संस्कृतीची व्यवस्था ! ही व्यवस्था आताही आहे. केवळ त्या दृष्टीने त्याची ओळख नाही. या ईश्वरदत्त व्यवस्थेविषयी केलेला ऊहापोह…
१. भारतातील मंदिरांची व्याप्ती
भारतभरात हिंदूंची सहस्रो नव्हे, तर ३० लाखांहून अधिक मंदिरे आहेत. या मंदिरांपैकी काही सहस्रो मंदिरे तर अतीप्राचीन आहेत. ५१ शक्तीपिठे, १२ ज्योतिर्लिंगे, ४ धाम भारतात प्रसिद्ध आहेत. त्यांच्या नावावरूनच काही ठिकाणी नगर, शहर, तर जिल्हे यांची नावे आहेत. मंदिरांची संख्या प्रति काही दिवसांनी वाढतच असते.
२. मंदिरांवर अवलंबून असणारे हिंदू !
सहस्रो ते कोट्यवधी हिंदू या तीर्थक्षेत्रांच्या ठिकाणी एकत्र येतात. मंदिरात भक्त, भाविक श्रद्धेने अर्पण, धर्मदान देतात. त्या धर्मदानातून मंदिराची व्यवस्था, मंदिर परिसराचा विकास, भक्तांना सुविधा देण्यासाठी निधी उपलब्ध होतो. मंदिरात देवतेची प्रतिदिन पूजा करणारे पुजारी, स्वच्छता करणारे कर्मचारी-सेवेकरी, मंदिरासाठी प्रसाद, महाप्रसाद बनवणारे सेवेकरी, मंदिरातील निधीचा जमा-खर्च ठेवणारे, म्हणजे न्यासावरील सेवेकरी, मंदिराच्या परिसरातील व्यवस्था पहाणारे सेवेकरी असे अनेक लोक सहभागी असतात. काही धार्मिक विधी करणार्या मंदिरांच्या ठिकाणी पूजेचे साहित्य आणणारे स्थानिक ग्रामस्थ, त्र्यंबकेश्वरसारख्या ज्योतिर्लिंगांच्या ठिकाणी विविध प्रकारचे श्राद्ध करण्यासाठी लागणारे पिंडादी साहित्य मिळण्यासाठी स्थानिक ग्रामस्थांवर अवलंबून रहावे लागते. श्राद्धासाठी लागणारे जेवणही ग्रामस्थच पुरवतात. यातून ग्रामस्थांचा सहभाग रहातो. या व्यतिरिक्त पूजेतील फुले, हार, फळे, प्रसाद, वस्त्र, पूजासाहित्य यांच्या विक्रीसाठी असणार्यांची उलाढाल काही कोटी रुपयांची असते.
३. मंदिरांशी संबंधित कराव्या लागणार्या व्यवस्था
मंदिरातील देवतेच्या भाविकाला आलेल्या अनुभूतीनुसार, मंदिराच्या ख्यातीनुसार मंदिरात येणार्या भाविकांची संख्या अल्प-अधिक असू शकते. मंदिरात भाविक येतात, तेव्हा त्यांच्या रहाण्याची व्यवस्था करण्यासाठी स्थानिक ठिकाणी लॉज, धर्मशाळा, मोठी हॉटेल्स यांची व्यवस्था करावी लागते. त्या माध्यमातून अनेक स्थानिकांना रोजगार मिळतो. मंदिरात येण्या-जाण्यासाठी रिक्शा, चारचाकी, बस, टांगा, काही ठिकाणी घोडी यांची व्यवस्था असते. गिरनार सारख्या काही उंच मंदिरांच्या ठिकाणी ‘रोप-वे’च्या सुविधा निर्माण करण्यात आल्या आहेत. सरकारला त्या ठिकाणी रस्ते, पिण्याचे पाणी या मूलभूत सुविधा निर्माण कराव्या लागतात. रेल्वेमार्ग उभारावे लागतात आणि काही ठिकाणी विमान वाहतूक चालू करावी लागते. त्या क्षेत्राचा अशा प्रकारे भौतिक विकासही साध्य होतो.
४. मंदिरांकडून हिंदूंचे पालनपोषण
मंदिराच्या ठिकाणी असलेली अनेक उपमंदिरे, धार्मिक आणि पवित्र ठिकाणे पहाण्यासाठी, त्यांना भेट देण्यासाठी स्थानिक व्यवस्था उभ्या कराव्या लागतात. त्यांची माहिती सांगणारे (गाईड), या ठिकाणांची व्यवस्था करणार्या शेकडो लोकांना रोजगार उपलब्ध असतो. द्वारकेतील द्वारकाधीश मंदिराचा विचार केला, तर या मंदिरावर स्थानिकांच्या म्हणण्यानुसार २ लाख लोकांची उपजीविका अवलंबून आहे. यातून मंदिराच्या अंतर्गत आणि बाहेर चालणार्या एका अद्भुत व्यवस्थेची कल्पना येऊ शकते. द्वारकेत आसपासच्या नदीतही खारट पाणी आहे. खारट पाण्यामुळे तेथे काही पिकत नाही, तर तेथे धान्याचा शिधा अर्पण म्हणून भाविकांकडून दिला जाण्याची परंपरा आहे. भक्त यथा शक्ती दान-धर्म करतो. त्यातील मंदिराचा हिस्सा मंदिराला दिल्यानंतर एक भाग गरीब ब्राह्मण कुटुंबांची व्यवस्था करण्यासाठी वेगळा केला जातो.
अशा प्रकारे एक मंदिर केवळ धार्मिक ठिकाण, हिंदूंची धार्मिक आस्था सांभाळणारे केंद्र न रहाता हिंदूंचे पालनपोषण करणारी ईश्वरनिर्मित व्यवस्थाच आहे. मोठ्या मंदिरांवर जवळपास एवढेच लोक अवलंबून असू शकतात, तर लहान मंदिरांवर अल्प !
आळंदी येथे कीर्तनाचे प्रशिक्षण देणार्या पाठशाळा आहेत. हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासाठी मंदिरांमध्ये अद्याप व्यवस्था नाही. धर्मशिक्षणाची केंद्रे प्रत्येक मंदिरात चालू होणे आवश्यक आहे. त्यातूनही अनेक नव्या व्यवस्था उभ्या करता येऊ शकतात.
५. मंदिरांच्या अर्थव्यवस्थेची व्याप्ती
‘नॅशनल सँपल सर्व्हे ऑफीस’कडून (एन्.एस्.एस्.ओ.) करण्यात आलेल्या सर्वेक्षणात हिंदु मंदिरांची अर्थव्यवस्था ही ३.०२ लाख कोटी रुपयांची आहे. म्हणजे ती भारताच्या सकल राष्ट्रीय उत्पन्नाच्या ३ टक्के आहे. ही आकडेवारी केवळ मंदिरांशी संबंधित होणार्या थेट व्यवहारांची आहे, मंदिराबाहेर होणार्या व्यवहारांची तर यात गणतीच नाही, तो आकडा तर अनेक पटींनी मोठा असेल.
मंदिरांना राजे-महाराजे यांनी शेकडो एकर भूमी दान दिल्या आहेत. या भूमींवर शेती करून अथवा त्या लागवडीखाली आणून त्यातून मिळणारे उत्पन्नही मंदिरासाठी वापरणे अपेक्षित आहे. शेतीतून आलेले उत्पन्न मंदिरासाठी फुले, फळे विकणारे, मंदिरात विविध सेवा करणारे यांच्यामध्ये वाटून घेण्याची पद्धत होती. परिणामी त्यांचा उदरनिर्वाह होत असे. मंदिराला अर्पण केलेली शेती कसण्याच्या माध्यमातूनही शेकडोंना रोजगार मिळू शकतो. दुर्दैवाने मंदिरांना दान दिलेल्या भूमीची सध्याच्या सरकारी विश्वस्तांनी देखभाल न केल्याने काही भूमींवर अतिक्रमण झाले आहे, काहींना नेमकी भूमी कुठे आहे ? याचीच कल्पना नाही. काही ठिकाणी भूमी पडून आहे.
६. कुणाला काही न्यून पडू न देणारी हिंदूंची मंदिरे !
तिरुपतीला वर्ष २०२२ मध्ये १ सहस्र ४५० कोटी रुपयांचे दान मिळाले, तर शिर्डी येथे गत वर्षी ९०० कोटी रुपयांचे दान मिळाले. ही भारतातील मोजक्या २ मंदिरांची अर्पण मिळालेली आकडेवारी आहे. मिळालेल्या या दानातून मंदिराच्या व्यवस्था सुधारणे, स्थानिक अल्प अर्पण मिळालेल्या मंदिरांना साहाय्य करणे, जुन्या मंदिरांचा जीर्णोद्धार करणे, भक्तांसाठी सुविधा निर्माण करणे अशी अनेक धर्मकार्ये करता येऊ शकतात; मात्र तसे घडतांना दिसत नाही. काशी विश्वनाथ मंदिराच्या नुकत्याच केलेल्या जीर्णोद्धारामुळे तेथे प्रतिदिन २ लाख भाविक येतात. पूर्वी हाच आकडा ४० ते ५० सहस्र इतकाच होता. वाराणसीच्या डी.ए.व्ही. पिजी महाविद्यालयाने वर्ष २०२१-२२ च्या केलेल्या सर्वेक्षणानुसार वाराणसी येथील हॉटेलांच्या मिळकतीत ६५ टक्के, दुकानदारांच्या मिळकतीत ४५ टक्के आणि ई-रिक्शा चालकांच्या मिळकतीत ३० टक्के एवढी वाढ झाली आहे. महाकालेश्वर मंदिराच्या जीर्णोद्धारापूर्वी तेथे १५ सहस्र लोक पोचू शकायचे.
आता जीर्णोद्धार केल्यावर आणि परिसरात सुविधा निर्माण केल्यानंतर दीड ते २ लाख भाविक प्रतिदिन मंदिरात येऊन दर्शन घेऊ शकतात. हिंदूंची मंदिरेच सर्वांची उपजीविका करतात. खर्या अर्थाने धर्म, संस्कृती लोकांना टिकवून ठेवतात. श्रद्धाळूला जिवंत ठेवतात. हिंदूंच्या मंदिरांच्या या धनावरच शेकडो वर्षांपासून धर्मांध मोगल आणि अन्य परदेशी आक्रमक यांची वक्रदृष्टी असायची आणि ते सातत्याने आक्रमणे करून त्यांची लूट करत. या आक्रमकांनी स्थुलातून मंदिरांचे सोने, नाणे, अगणित संपत्ती लुटून नेली, तरीही ते तेथील चैतन्य अल्प करू शकले नाहीत. हेच चैतन्य अबाधित असल्याने या मंदिरांना त्यांचे गतवैभव पुन:पुन्हा प्राप्त व्हायचे. सहस्रो मंदिरे पडून पुन:पुन्हा उभी राहिली आहेत. ही मंदिरे हिंदूंना पुन:पुन्हा संघर्ष करत उभे रहाण्याची, अढळ निश्चयाने भगवंताच्या अनुसंधानात रहाण्याची जाणीव करून देत आहेत. स्वत:च्या उदाहरणातून हिंदु समाजाचे पालकत्व स्वीकारत आहेत.
७. भारतातील मंदिरांचे सरकारीकरण !
वर्ष १९६० मध्ये भारत सरकारने डॉ. सी.पी. रामस्वामी अय्यर आयोग आणला. या आयोगाचा उद्देश हिंदु धार्मिक स्थळांच्या सूत्रांची चौकशी करणे हा होता. त्यांनी असे सूत्र मांडले की, भारतातील मंदिरांवर सरकारी नियंत्रण ठेवणे आवश्यक आहे. परिणामी स्वातंत्र्यापूर्वी वर्ष १९२५ मध्ये ईस्ट इंडिया कंपनीने लागू केलेला मद्रास ‘हिंदु रिलीजिअस इनडोव्हमेंट अॅक्ट’ स्वातंत्र्यानंतरच्या निधर्मी शासनकर्त्यांनी केवळ नाव पालटून हिंदु मंदिरांना लागू केला. त्यामुळे स्वातंत्र्योत्तर काळात अनेक मंदिरांचे सरकारीकरण झालेले पहावयास मिळते. वास्तविक केवळ मंदिरांचे सरकारीकरण करण्यात आले. अन्य धर्मियांच्या धार्मिक स्थळांचे आणि त्यासंबंधी मालमत्तांचे मात्र नाही. भारतभरातील अनुमाने ४ लाख मंदिरांचे सरकारीकरण झाले आहे. यात हिंदूंची जवळपास सर्वच प्रमुख मंदिरे आहेत. मंदिरांवर, त्याच्या सर्व मालमत्तेवर त्या ठिकाणच्या देवतेचाच पूर्ण अधिकार आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने मंदिराच्या संपत्तीवरील अधिकाराविषयी सांगून ठेवले आहे. तरी या निधीचा अन्य म्हणजे सामाजिक कामांसाठीही उपयोग होऊन त्यात अपहारही होत आहे.
८. हिंदु मंदिरांविषयी छत्रपती शिवाजी महाराज आणि पेशवे यांची दूरदृष्टी !
हिंदु मंदिरांचे हे महत्त्व साडेतीनशे वर्षांपूर्वी छत्रपती शिवाजी महाराज यांनी जाणले होते. त्यांनी त्यांच्या मोहिमेवर गेल्यावर मोहिमेच्या मार्गावरील अनेक मंदिरांच्या ठिकाणी व्यवस्था पुन्हा उभ्या केल्या होत्या. त्यासाठी भूमी दान केल्या होत्या, पुजार्यांची व्यवस्था केली होती. त्यामुळे भारतभरातील मंदिरांतील अनेक मंदिरांच्या ठिकाणी मराठी पुजारी आहेत, हे लक्षात येते. दक्षिणेत रामेश्वरम् येथे करण्यात येणार्या मुख्य धार्मिक विधींचे पौरोहित्य करणार्या पुजार्यांचे आडनाव आहे रानडे, उत्तरेत महाकालेश्वराचे पुजारी आहेत कराडकर, तर प्रयागराज येथील श्राद्धादी धार्मिक विधी करणार्या पुजार्यांचे आडनाव आहे पित्रे ! त्यांच्या येथे १० हून अधिक पिढ्या झाल्या आहेत. छत्रपतींनी दक्षिणेत, तर पेशव्यांनी उत्तरेत महाराष्ट्रातून केवळ सरदारांना नेऊन तेथे स्थायिक केले नाही, तर महाराष्ट्रीय पुजार्यांनाही नेऊन मंदिरांची व्यवस्था करण्यासाठी त्यांना तेथे वसवले. यातून त्यांची दूरदृष्टी आणि हिंदु मंदिरांविषयी आत्मीयताही लक्षात येते.
हिंदु समाजाची आधारशिला असणारी, हिंदु समाजाचे कामधेनूप्रमाणे पालनपोषण करणारी, हिंदूंना ऊर्जा, चैतन्य आणि शक्ती प्रदान करणारी, अनेक आघात सोसूनही हिंदूंना भक्ती करायला शिकवणारी मंदिरे सरकारीकरणातून मुक्त करून खर्या भक्तांच्या हाती त्यांची व्यवस्था सोपवण्यासाठी प्रयत्न करणे हे हिंदु समाजाच्या धर्माविषयीच्या कर्तव्याविषयी मुख्य कर्तव्य बनले पाहिजे. सद्य:स्थितीत मंदिरांतील अपप्रकार, मंदिराचा गैरकारभार दूर करण्यासाठी हिंदु समाजाने कृतीशील झाल्यास मंदिरांच्या ठिकाणीच नव्हे, तर मंदिर परिसर आणि मंदिर असलेले गाव, तालुका आणि जिल्हा येथे रामराज्याची अनुभूती आल्यावाचून रहाणार नाही.
– श्री. यज्ञेश सावंत, सनातन आश्रम, देवद, पनवेल. (२६.११.२०२३)