योग हा व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग ! – द्रौपदी मुर्मू, राष्ट्रपती
पुणे येथील ‘कैवल्यधाम योग संस्थे’च्या शताब्दी सोहळ्यास राष्ट्रपतींची उपस्थिती !
पुणे – योग हा व्यक्तीच्या सर्वांगीण विकासाचा मार्ग असून शारीरिक, मानसिक, भावनिक, सामाजिक आणि आध्यात्मिक उन्नतीचे माध्यम म्हणून योगप्रणाली प्रभावी मानली जाते, असे प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ३० नोव्हेंबर या दिवशी येथे केले. लोणावळा येथील ‘कैवल्यधाम योग संस्थे’चा शताब्दी सोहळा आणि ‘शालेय शिक्षणात योगाचे एकत्रीकरण’ या विषयावरील राष्ट्रीय परिषदेच्या उद्घाटन समारंभात राष्ट्रपती मुर्मू बोलत होत्या. या वेळी कैवल्यधाम प्रकाशनाच्या पुस्तकांचे प्रकाशन राष्ट्रपतींच्या हस्ते करण्यात आले. तत्पूर्वी राष्ट्रपतींनी कैवल्यधामचा इतिहास चित्ररूपाने मांडणार्या दालनाला भेट देऊन पहाणी केली.
कार्यक्रमास महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस, महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे, माजी केंद्रीय मंत्री, तसेच शताब्दी समितीचे अध्यक्ष सुरेश प्रभु, कैवल्यधामचे अध्यक्ष डॉ. ओमप्रकाश तिवारी आदी उपस्थित होते.
राष्ट्रपती मुर्मू पुढे म्हणाल्या की, भारताच्या पुढाकाराने संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेने २१ जून ‘आंतरराष्ट्रीय योग दिन’ म्हणून साजरा करण्याचा निर्णय घेतला. वर्ष २०२० मध्ये भारतीय ज्ञान परंपरेत असलेल्या योग ज्ञानाला शिक्षण व्यवस्थेत महत्त्वाचे स्थान देण्यात आले आहे. प्राचीन भारतातील गुरुकुलामध्ये शिकणारे विद्यार्थी, बौद्धिक ज्ञान, तसेच आध्यात्मिक ज्ञानाच्या मार्गावर मार्गक्रमण करत असत. आपल्या विद्यार्थ्यांना भारताच्या प्राचीन परंपरेच्या उपयुक्त घटकांशी जोडणे, हा राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाचा एक महत्त्वाचा पैलू आहे.
कैवल्यधाम हे येणारी सहस्रो वर्षे विश्वाला ऊर्जा देणारे स्थान ठरेल ! – सुरेश प्रभु, शताब्दी समितीचे अध्यक्षसुरेश प्रभु या वेळी म्हणाले की, लोणावळा या पुण्यभूमीत देशाच्या स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच राष्ट्रपती आले आहेत. योग ही विद्या आहे, त्यामुळे त्याचा अभ्यास व्हावा. शास्त्र आणि कला असल्यामुळे त्याचे आकलन, तसेच संस्कृतीचा एक हिस्सा असल्यामुळे त्याचे जतन व्हावे. आस्था असल्यामुळे स्मरण व्हावे, अध्यात्म असल्यामुळे चिंतन व्हावे आणि विश्लेषणही झाले पाहिजे. हे सर्व कैवल्यधाम येथे एकाच ठिकाणी मिळते. कैवल्यधाम हे येणारी सहस्रो वर्षे विश्वाला ऊर्जा देणारे स्थान ठरेल. |
देशातील नागरिकांना योगासह त्यांचे मानसिक स्वास्थ्य चांगले रहाण्यासाठी साधना शिकवणे आवश्यक आहे !